एक उत्तम कवी, शिक्षक, आदर्श राजकारणी नेता हे गुणांचे त्रिकुट ज्या एकाच व्यक्तीमध्ये पाहायला मिळते असे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे अटलबिहारी वाजपेयी होय. भारतीय राजकारणात आपली वेगळी छाप सोडणारे आणि १० नव्हे, २० नव्हे तर तब्बल ५० वर्षे यशस्वी राजकारण करणारे ते एक उत्तम नेते होते. आपल्या पक्षाचे आधी दोन खासदार निवडून आणणारे आणि नंतर तोच आकडा २०० पर्यंत पोहोचवणारे वाजपेयीजी हे कसलेले राजकारणी होते यात संशयच नाही. वाजपेयी यांनी आपल्या आयुष्यात अनेक कविता लिहिल्या व त्यांचे प्रेरणादायी विचार आजच्या तरुणांसाठी खूपच मौल्यवान असे आहेत. त्यातीलच काही विचार आजच्या या लेखात पाहुयात.
१. तुम्ही मित्र बदलू शकता पण शेजारी नाही.
कोणाशी कितपत संगत ठेवायला हवी हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी ही गोष्ट तरुणपणात कळत नाही. वयाचा परिणाम म्हणून कोण चांगले वाईट यातला फरक कळत नसल्याने कसेही मित्र आपण जोडतो. मात्र शेजारी बदलणे आपल्या हातात नसते. सोयीने वाईट मित्रांची संगत आपण सोडू शकतो. पण शेजारी जर चांगले नसतील तर त्यांच्यापासून आपण केवळ लांबच राहू शकतो. तसेच बाकीच्या गोष्टींचे सुद्धा असते. जी गोष्ट बदलता येते ती वेळीच बदललेली बरी व जी बदलणे शक्य नाही त्यापासून आपणच लांब राहणे हिताचे.
२. जर भारत धर्मनिरपेक्ष नसेल तर भारत 'भारत' नाही.
या भारताचे तरुण नागरिक म्हणून धर्मनिरपेक्षता ही गोष्ट जाणून घेणे व त्याचे महत्व समजणे खूपच गरजेचे आहे. जर आपला भारत धर्मनिरपेक्ष झाला तरच सगळे लोक गुण्यागोविंदाने एकत्र नांदतील व याची सुरुवात ही जर तरुणपणापासूनच झाली तर योग्यप्रकारचे संस्कार त्यांच्यावर होतील व त्यायोगे पुढील पिढीवर सुद्धा. हे विचार आजच्या युवकांनी मनात ठसवणं फार आवश्यक आहे.
३. विजय-पराजय हा जीवनाचा एक भाग आहे, ज्याकडे समभावनेने पाहावे.
जसा ऊन-सावली, सुख-दुःख यांचा खेळ चालू असतो तसेच आयुष्यात हार आणि जीत सुद्धा चालू असते. अनेक जण जिंकले की त्याने हुरळून जातात. गर्व करतात. पण हाच विजय कायम टिकवून ठेवायचा असेल तर प्रयत्न, कष्ट करणे गरजेचे आहे याचा विसर पडतो. त्यातूनच कधीतरी पराभवाला देखील सामोरे जावे लागते. तसेच सतत आपली जीतच होईल अशी भावना देखील चुकीचीच असते. त्यामुळे हार आणि जीत हे आयुष्याचा भाग असून त्या दोघांनाही समान पारड्यातच तोलायला हवे.
४. आपले उद्दिष्ट अथांग आकाशासारखे उंच असू शकते, पण हातात हात घालून पुढे चालण्याचा संकल्प मनात असला पाहिजे, कारण हाच विजयी होण्याचा मंत्र आहे.
आपल्या स्वप्नासाठी झोकून देऊन दुसऱ्यांच्या स्वप्नांना कवडीमोलाची सुद्धा किंमत न देणं असा संकुचित विचार ठेवता कामा नये. कारण जेव्हा आपण आपल्यासोबतच आपल्या परीने दुसऱ्यांना सुद्धा त्यांचे उद्दिष्ट्य पूर्ण करायला मदत करतो तेव्हा नकळतपणे आपली सुद्धा प्रगतीच होत असते. त्यामुळे कधीही एकट्याने नाही तर सगळ्यांना सोबत घेऊन विजयी होण्याची स्वप्ने पाहा.
५. माणूस बना पण फक्त नावाने, रूपाने नाही तर मनाने, बुद्धीने आणि ज्ञानाने सुद्धा.
नाव, प्रसिध्दी, रूप या सगळ्या गोष्टी काही काळासाठी आपल्या सोबत राहू शकतात. कारण वयाची काही वर्षे पार केली की म्हातारपण कोणालाही चुकत नाही. इतकंच काय पण प्रसिध्दी आज आहे तर उद्या असेल नसेल हे सांगता येत नाही. कारण ती टिकवण्यासाठी सुद्धा आपण एक माणूस म्हणून उत्तम होणं गरजेचं आहे. माणसाने परिपूर्ण असायला हवं. मग त्यात जो मनाने निखळ, बुद्धीने धारदार व ज्ञानाने ओतप्रोत भरलेला असेल तो श्रेष्ठ आणि सगळ्या क्षेत्रात अग्रेसर असेल, हे नक्की. पण त्यासाठी सगळ्यात आधी माणूस बनायला हवं.
अगदीच साध्या पण समर्पक भाषेत अटलबिहारी वाजपेयी यांनी सांगितलेले हे विचार तुमच्या आमच्यासारख्या सर्वच तरूणांसाठी प्रेरणादायी ठरतील, हे निश्चित. त्यामुळे जर उद्याचा भारत आपल्याला उज्ज्वलतेने घडवायचा असेल तर आजपासूनच तरुणाईने पुढे पाऊले टाकायला हवीत आणि हो, हे विचार तुम्हाला कसे वाटले हे सांगायला विसरू नका.