Bluepad | Bluepad
Bluepad
नशीब म्हणजे काय असतं?
M
Manthan Bidve
15th May, 2022

Share

‘आपल्या नशिबात असेल तर आपल्याला नक्की मिळेल’ अनेकदा हे वाक्य आपण ऐकत असतो. ‘नशीबापेक्षा कमी किंवा नशिबापेक्षा जास्त, कोणालाच मिळत नाही’ असं म्हणतात. काहींना नशिबाशी खुप भांडावं लागतं, संघर्ष करावा लागतो. असे नाही की सर्वच गोष्टी नशिबावर सोडून द्याव्या परंतु जुळून आलेली नशिबाची साथ, इतक्या जोरावरती असते, की हाती घेतलेले प्रत्येक काम, पूर्णत्वास जाते. मग नशीब म्हणजे काय? काहीही न करता सर्व काही मिळणे याला जर तुम्ही नशीब म्हणत असाल, तर तो नशिबाचा दोष आहे. जीवनाच्या प्रवासात जर सर्वच आपलं होत गेलं, तर जगण्यात गंमत आणि देवाला किंमत राहिलीच नसती. मग नशीब म्हणजे काय, वाचा या लेखात..नशीब म्हणजे काय असतं?नशिब फक्त एकमेव गोष्ट नाही. ती विविध आणि वेगवेगळ्या अंगांनी मिळून तयार झालेली रचना आहे. विविध धाग्यांनी बनलेली आहे. त्यात आपले प्रारब्ध, कर्म, कष्ट, मेहनत, चांगुलपणा, आपली विचार प्रक्रिया, थोरामोठ्यांचा आशिर्वाद, गरजवंताला केलेली मदत, आई-वडिलांची पूर्वपूण्याई आहे. आपले नशीब हे सर्वस्वी आपल्या कर्माचा भाग आहे परंतु ते बदलण्यासाठी जर प्रयत्नांमध्ये सातत्यता आणि प्रयत्न दमदार असतील तर नशिबाला सुद्धा झुकावंच लागतं. नशिबाच्या जोराने बर्‍याच जणांना बरंच काही मिळालेले असते. परंतु ते टिकवण्यासाठी तितकी पात्रता अंगी ठेवावी लागते. नाहीतर दैव देते आणि कर्म नेते, अशी परिस्थिती व्हायला वेळ लागत नाही. म्हणून नशिबाच्या जोरावरती नक्की विश्वास ठेवायला हवा, नशीब कधीही बदलणार असते, पण आपल्या कर्माची गती ठरवते की आपल्या नशीबाला सोडायचे कुठे आहे.

वाटेत आलेला दगड हा अडथळा आहे की पायरी, हे समजणे म्हणूनच महत्त्वाचे ठरते. ज्यांना ते नीट समजते ते आनंदात राहतात आणि नाही समजत ते पायरीसमोर उभे राहून ‘माझ्या आयुष्यात अडथळे फार’ असे म्हणत बसतात किंवा अडथळा असताना पायरी समजून चढायचा प्रयत्न करत बसतात. याकरता थोडा मार खाल्ल्यावर प्रयत्न कधी थांबवायचे ही अक्कल आपोआप येऊ लागते. अजगर जसा भक्ष्य टप्प्यात येईपर्यंत सुस्त वाटावा इतपत शांत असतो. पण एकदा टप्प्यात आल्यावर क्षणात झडप घालतो; तशी सजगता सतत आवश्यक असते. निर्णय घेणे आणि तो पूर्ण करणे किंवा नवीन निर्णय घेणे हाही एक निर्णयच असतो, हे समजणे फार गरजेचे असते.

नशिबासंदर्भात स्वामी समर्थ यांनी सांगितलेली एक कथा आठवते. एक भक्त स्वामींना विचारतो, ‘नशीब आधीपासूनच लिहून ठेवलेले असते का स्वामी?’ स्वामी म्हणतात, ‘हो’. भक्त म्हणतो, मला ते पहायला मिळेल का?’’ स्वामी म्हणतात, तू माझा निष्ठवान भक्त असल्यामुळे तुला दाखवतो काय लिहीले आहे.’ ते त्याला एका ठिकाणी घेवून जातात तिथे हजारो मोठी मोठी पुस्तके असतात. त्यातील एक पुस्तक काढून स्वामी भक्ताच्या हातात देतात आणि म्हणतात वाच. त्याला पुस्तकात शेजाऱ्याचे नाव सापडते पण काहीच लिहीलेले नसते. त्याचे नाव दिसते पण तिथेही कागद कोरा असतो. भक्त स्वामींना म्हणतो 'हे असे का?’ त्यावर स्वामी म्हणतात, ‘ती एक खास प्रकारची शाई आहे जी सगळ्यांना दिसत नाही. पण मी तुला सांगतो, यावर काय लिहीलं आहे. त्यावर लिहीलं आहे “तथास्तु!” मी प्रत्येकाच्या नशिबात फक्त हेच लिहून ठेवतो. जी तुझी इच्छा आहे तसेच होईल. म्हणून माणूस हा स्वतःच त्याच्या कर्मासाठी, त्याच्या नशीबासाठी, त्याच्या भविष्यासाठी जबाबदार आहे. जर कोणी सुखी आहे तर तो स्वतःला जबाबदार आहे. जर कुणी दुःखी आहे त्याला पण तो स्वतः जबाबदार आहे. माणूस जसा विचार करतो, तसेच त्यांच्या सोबत नेहमी घडत राहते.’

त्यावर भक्त विचारतो, ‘कोणी माणूस स्वतःहून दुःखी का बनेल?’ यावर स्वामी म्हणतात, ‘एखादा देह कर्माच्या विचारांच्या बिया आधीपासूनच लावून ठेवतो. म्हणून त्या व्यक्तीने लावलेल्या त्या विचाराच्या बियांमधून त्याच्या कर्माचं झाड बनून जातं. नंतर त्या कर्माच्या झाडाचं रूपांतर कालांतराने त्याच्या सवयीमध्ये होत जातं. आणि नंतर त्या सवयीचे रूपांतर त्याच्या नशिबामध्ये होत जातं. म्हणून विचार, कर्म आणि नशीब या मधला जो संबंध असतो तो समजणे महत्त्वाचे आहे.’

म्हणून नशीब कमवावे लागते. आपल्या स्वभावाने, कर्माने, कधीही न ठरवलेल्या आपल्या अंतकरणाने… काही जण नशिबवंत असतात, जीवनाच्या प्रत्येक टप्यावरती, ते आपल्या नशिबाने जिंकतात, आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावरती बरेच जण, आपल्या नशिबाची रचना करताना दिसतात, तर काहींची साधना आणि भक्ती त्यांना खूप मोठ्या उंचीपर्यंत पोहोचवते… तुम्हाला हा लेख कसा वाटला, हे नक्की कळवा.

630 

Share


M
Written by
Manthan Bidve

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad