कायम वादांच्या चक्रव्यूव्हात राहिलेला अँड्रयू सायमंड्स काळाच्या पडद्याआड !
मागचे दोन महिने ऑस्ट्रेलियन क्रिकेट साठी दुःखद राहिले. सेवानिवृत्त धुरंधर यष्टीरक्षक फलंदाज रॉडनी मार्श व जगविख्यात लेगस्पिनर शेन वॉर्न यांना सलग दोन दिवसात कालदेवतेने हिरावून घेतले. त्यानंतर दोन महिनेही झाले नाही तोच माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंडस १४ मे २०२२ रोजी ऑस्ट्रेलियातील टाउन्सविले येथे एका रस्ता अपघातात कालवश झाला. अत्यंत गंभीररित्या जखमी झालेल्याा सायमंड्सला वाचविण्याचे डॉक्टरांचे सर्वप्रयत्न अपयशी ठरले.
सायमंड्स एक आक्रमक फलंदाज, चांगल्या दर्जाचा फिरकी गोलंदाज व त्याचबरोबर अप्रतिम क्षेत्ररक्षक होता. त्यामुळे जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवित असलेल्या तत्कालिन संघात तो चपखल बसत होता. सन २००३ व २००७ च्या विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा तो महत्वाचा सदस्य होता. परंतु मनमानी स्वभाव, बाहेरख्यालीपणा व वादविवाद या गोष्टी त्याच्या पाचवीलाच पुजल्यासारख्या होत्या. त्यामुळे मोठी ठरू शकणारी त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द वेळेच्या आधीच संपली.
सायमंड्सच्या कारकिर्दीला गालबोट लावणाऱ्या काही विवादास्पद घटना घडल्या. त्यापैकी सन २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाविरूध्द खेळलेल्या सिडनी कसोटीचा प्राधान्याने उल्लेख करावा लागेल. वास्तविक सायमंड्सचा वाद भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज हरभजनसिंग याच्याशी झाला आणि ते " मंकीगेट प्रकरण " जगजाहीर झालं होतं. त्याचं असं झालं, हरभजन फलंदाजी करत होता, त्यावेळी दोघांमध्ये अनेकदा शाब्दीक चकमक झडत गेल्या. पुढे त्या घटनेनं विक्राळ रूप धारण केलं. सायमंड्सने हरभजनवर " मंकी " ( माकड ) संबोधल्याचा आरोप लावला. ऑस्ट्रेलियात मंकी या शब्दाला वर्णद्वेषी म्हणून गणलं जातं. त्यामुळे हे प्रकरण चांगलंच चिकदळलं. एक वेळ भारतीय संघ दौरा अर्धवट सोडूण देण्याच्या निर्णयापर्यंत गेला होता. या दरम्यान ऑस्ट्रेलियन संघाने अधिकृत तक्रार नोंदविली. सुनावणी दरम्यान सामनाधिकाऱ्यांनी हरभजनला दोषी ठरविले व त्याच्यावर तीन कसोटी सामन्यांची बंदी जाहीर केली. यानंतर भारतीय संघाने कडक भूमिका घेतल्यानंतर विशेष न्यायलयीन सुनावणी झाली व त्यामध्ये हरभजनवरील गंभीर आरोप हटविले व केवळ पन्नास टक्के मॅच फी दंड म्हणून आकारण्यात आली. या बरोबरच प्रकणारावर पडदा पडला. मात्र हे "मंकीगेट'' प्रकरण आजही सर्वांच्या चांगल्याच लक्षात आहे.
सन २००८ मध्येच एका पब मध्ये त्याने एका चाहत्याला मारहाण केल्याचे प्रकरण चर्चेत आले होते. एक चाहता त्याच्या सोबत अलिंगन देऊन फोटो काढू इच्छीत होता मात्र सायमंड्सला ते आवडलं नाही व त्याची मजल मारहाणी पर्यंत गेली. मात्र हे प्रकरण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गंभिरतेने न घेतल्याने त्याच्यावर होऊ शकणारी मोठी कारवाई टळली.
सन २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया संघ बांगलादेश दौऱ्यावर असताना एका महत्वाच्या टिम मिटींग दरम्यान मालिकेविषयी महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना सायमंड्स मासेमारी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी तत्कालीन कर्णधार मायकेल क्लार्कने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. सायमंड्स व क्लार्क घनिष्ठ मित्र होते परंतु त्यानंतर त्यांच्या मैत्रीत कटूता आली व नंतरच्या भारत दौऱ्यावर जाणाऱ्या संघात सायमंड्सची ऑस्ट्रेलियन संघात निवड काही झाली नाही.
सन २००९ मध्ये सायमंड्सची जिभ जरा जास्तच घसरली. न्यूझिलंडचा प्रमुख खेळाडू ब्रेंडन मॅकलम बद्दल अभद्र भाषेत अक्षपार्ह कथन केले शिवाय आपला संघ सहकारी मॅथ्यू डेहनच्या कौटुंबिक जीवनावर शिंतोडे उडविणारे वक्तव्य करून स्वतःच्या अडचणीत वाढच केली.
सायमंड्स एक खेळाडू म्हणून जितका चांगला होता तितकाच व्यक्ती म्हणून वादग्रस्त ! परंतु आता तो या जगात नाही. त्यामुळे त्याच्या विषयी जास्त काही नाकारत्मक चर्चा न करता त्याच्या अकाली निधनाने क्रिकेट जगताने एक उत्तम खेळाडू गमावला आहे हे मात्र तितकेच सत्य आहे. अँड्रयू सायमंड्सला त्रिवार अभिवादन व भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करूया.
🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com