आपला भारत देश हा नद्या, तलाव, सरोवरे यांनी समृध्द आहे. अनेक नद्या, तलाव याविषयी विविध धार्मिक माहिती, कथा इ. आपण वाचल्या ऐकल्या असतील. मात्र आजच्या लेखात आपण पंपा सरोवराचे पौराणिक संदर्भ आणि महत्त्व याविषयी जाणून घेणार आहोत.
कर्नाटकचा हंप्पी जिल्हा हा पर्यटनासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. इथेच तुंगभद्रा नदी वाहते. तिच्या दक्षिणेच्या भागाला हिंदू धर्मग्रंथामध्ये अतिशय पवित्र मानलं गेलेलं पंपा सरोवर आहे. असं म्हंटलं जातं की भारतातल्या पुष्कर सरोवर, कैलाश मानसरोवर, नारायण सरोवर अशा काही सुप्रसिद्ध पंच सरोवरांपैकी पंपा सरोवर हे एक आहे.
पंपा सरोवराचा सर्वात पहिला पौराणिक उल्लेख सापडतो तो म्हणजे श्रीमद्भागवत पुराणात. त्यात असं नमूद केलं आहे की, सती गेल्यानंतर पार्वतीने जेव्हा पुनर्जन्म घेतला होता. त्यावेळेस 'मी पार्वती आहे' हे शंकरासमोर सिद्ध करण्यासाठी तिने पंपा सरोवराच्यापाशी बसून कठोर तप करत शंकराला प्राप्त केलं होतं. त्यामुळे पार्वतीच्या विविध अवतारांमधील तिच्या एका अवताराला पंपा असंही नाव दिलं गेलं आहे. म्हणून पार्वतीचं रुप समजून पंपा सरोवराची पूजा केली जाते. सोबतच काही पौराणिक कथांमध्ये असाही उल्लेख सापडतो की शंकराने पंपा सरोवरापाशी बसून तपस्या केली होती. त्यामुळे पंपा सरोवर हा कैलास मानसरोवरासमान मानला जातो. हिंदू धर्मांतील लोक इथे शंकराची विशेष पूजा करण्यासाठी दुरुन येतात.
पंपा सरोवरचा संबंध हा रामयणाशी देखील जोडला गेला आहे. अशी मान्यता आहे की रामायण काळातील किष्किंधा हे पंपा सरोवर क्षेत्राच्या आसपासचं येतं. किष्किंधा इथे रामायणातील सुग्रीव म्हणजेच वालीचा धाकटा भाऊ याचं राज्य होतं. रामायणातील पंपा सरोवर हे तेच स्थान आहे जिथे बसून शबरीने रामाची प्रतीक्षा केली होती आणि इथेच तिने आपली उष्टी बोरे रमाला दिली होती. पंपा सरोवरा जवळच्या पर्वतावर एक गृहा आहे. अशी मान्यता आहे की ती गृहा शबरीची होती. तिथे ती राहत होती. त्यामुळे पंपा सरोवराजवळ तिच्या नावे शबरी मंदिर बांधलं गेलं आहे.
ज्यांच्या उपदेशामुळे शबरीने रामाची वाट पाहिली होती ते तिचे गुरु ऋषी मतंग यांच्या नावे 'मतंगवन' देखील आहे. त्याकाळी मतंग ऋषीं ज्या आश्रमात स्थित होते ते आश्रम देखील पंपा सरोवराजवळ आहे. पुराणात असा उल्लेख सापडतो की मतंग ऋषींच्या आश्रमातच हनुमानाचा जन्म झाला होता. त्यामुळे त्याला हनुमानाचं जन्मस्थान म्हणूनही ओळखलं जातं. अशी माहिती मिळते की मेघवाल, किरात नामक जे लोक पंपा सरोवराच्या आसपास स्थित आहेत त्याचे पूर्वज हे मतंग ऋषी होते.
पंपा सरोवराच्या पश्चिमेकडील पर्वतावर अनेक जुनी मंदिरे आहेत ज्यांना विविध कथा, महत्त्व आहे. मात्र आज ही मंदिरे जीर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे इथे येणारे भाविक हे पंपा सरोवरासोबतच इथल्या प्रत्येक मंदिराचं धार्मिक महत्त्व ओळखून दर्शन घेतात. गंगेचं पाणी जसं माणसाचं पाप धुवून त्याला शुद्ध करते तसंच पंपा सरोवरचं पाणी देखील मोक्ष मिळण्यासाठी अत्यंत पवित्र म्हंटलं गेलं आहे. भाविक पंपा सरोवरात पाप मिटविण्यासाठी स्नान करतात. विविध देवतांनी वेढलेलं पंपा सरोवर एखाद्या स्वर्गासमान असल्याचं देखील लोकांमध्ये मान्यता आहे.
पूर्वी पंपा सरोवर त्याच्या नैसर्गिक स्वरूपात होतं. मात्र भाविकांची श्रद्धा, गर्दी लक्षात घेत आज आधुनिक पद्धतीने आयताकृती स्वरूपात पंपा सरोवराची जडणघडण केली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे दुर्घटनेला इथे वाव मिळत नाही. पंपा सरोवराविषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि हंप्पीला भेट देऊ इच्छिणाऱ्या आपल्या मित्रपरिवाराला या पवित्र सरोवराला भेट देण्यास उद्युक्त करण्यासाठी हा लेख नक्की पाठवा.