एक आक्रमक राजकारणी, रोखठोक वक्ते तसंच मनस्वी कलाकार म्हणून राज ठाकरे सर्वत्र प्रचलित आहेत. त्यांच्या विशिष्ट स्टाईल, रुबाब आणि दमदार भाषणासाठी ते नेहमीच चर्चेत असतात. पण अशा या वलयांकित नेत्याचं वैवाहिक आयुष्य कसं आहे? पत्नी शर्मिला आणि राज यांची लव्हस्टोरी कशी आहे? याविषयी अनेकांना माहीत नाही. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊया राज आणि शर्मिला यांच्या लव्हस्टोरी विषयी.
अनेकांची लव्हस्टोरी सुरू होण्यासाठी एक कॉमन मित्र कारण ठरतो. राज आणि शर्मिला यांची लव्हस्टोरी सुरु होण्यासाठी देखील शिरीष पारकर नावाचा त्यांचा मित्र मध्यस्थी होता. त्यावेळी घडलं असं, की शर्मिला या रविवारी आपल्या मित्र मैत्रिणींना कॉलेजजवळ भेटायला जायच्या. त्यावेळेस शिरीष सोबत राज देखील होते. शिरीष यांनी दोघांची ओळख करुन दिली. शर्मिलाला बघूनच राज त्यांच्या प्रेमात हरवून गेले. त्यांना लव्ह अॅट फर्स्ट साईट झालं होतं. काही दिवस असेच गेले पण शर्मिलाचा चेहरा राज यांच्या डोळ्यासमोरून जाईना. शर्मिलाही राज यांच्या प्रेमात पडल्या होत्या. दोघांनाही एकमेकांच्या घरच्या टेलिफोनचे नंबर मिळाले. पण घरी कोणाला कळलं तर? म्हणून फोनवर बोलण्याच्या वेळा ठरल्या. दोघे लपूनछपून एकमेकांना भेटू लागले. हळू हळू त्याचं प्रेम फुलू लागलं.
राज यांचे वडील संगीतकार श्रीकांत ठाकरे आणि शर्मिला यांचे वडील दिग्दर्शक, फोटोग्राफर मोहन वाघ हे दोघेही एकमेकांचे खास मित्र होते. शर्मिला या राजपेक्षा दोन वर्षांनी मोठ्या होत्या. त्यावेळी मुलीचं लग्न लवकर केली जात. शर्मिला चोवीस वर्षाच्या झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या घरी लग्नाची लगबग सुरू होती. पण राज मात्र तेव्हा बावीस वर्षाचेच होते. त्यांचे काका बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे घेत होते. बाळासाहेबांनी नुकतीच विद्यार्थी सेनेची जबाबदारी राज यांना दिली होती. शर्मिला यांनी आपल्या प्रेमाविषयी घरी सांगितले. राज यांची हुशारी, कर्तबगारी, दोघांच्या वडिलांची मैत्री लक्षात घेत त्याचं कोणत्याही अटीशर्ती, अडचणी शिवाय लग्न झालं.
लग्नानंतर राज राजकारणात, पक्षाच्या कामात व्यस्त झाले. विविध दौऱ्यावर जात असल्यामुळे ते दोन तीन महिन्यांनी घरी परतत. इथे शर्मिला मात्र आपल्या संसारात पूर्णपणे गुंतल्या होत्या. राज यांना कामामुळे कुटुंबाकडे, शर्मिलाकडे लक्ष देता येत नव्हतं. मात्र आपल्या पतीचं कार्य लक्षात घेत त्यांनी देखील राज यांच्याकडे कधी वेळेच्या तक्रारी केल्या नाहीत. असं म्हणतात ना की, कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते जी कायम खंबीर होऊन अनेक गोष्टींना हाताळते शर्मिला तशाच आहेत.
राज यांचं बाळासाहेबांसोबत असलेलं घट्ट नातं, बाळासाहेबांप्रमाणेच बोलण्याची ढब, राजकारणातील आक्रमकता या सगळ्या गोष्टींना नजरेसमोर ठेवता राज हेच बाळासाहेबांचा आणि शिवसेनेचा वारसा पुढे नेतील अशी सर्वत्र चर्चा होती. मात्र शिवसेनेचा कार्याध्यक्ष म्हणून जेव्हा उद्धव यांची निवड केली गेली तेव्हा शिवसेना सोडून काही दिवसातच राज यांनी मनसे पक्षाची स्थापना केली. ठाकरे कुटुंबामध्ये मतभेद निर्माण करणारा हा प्रसंग होता. राज याची देखील मानसिक स्थिती डगमगीत झाली होती. या प्रसंगाविषयी राज सांगतात, की मी पक्षातून बाहेर पडल्यानंतर शर्मिलाला सांगितलं होतं. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? असं तिला विचारलं असताना तिने देखील त्यावर कोणतेही प्रश्न न करता मला साथ दिली. मला विश्वास दिला. सोबतच कुटुंबाला वेळोवेळी जोडून ठेवण्याचा प्रयत्न तिने केला. ती सोबत असण्यामुळेच मी अनेक गोष्टीतून पार होऊ शकलो.
शर्मिला सांगतात की राज नेहमीच माणसांनी घेरलेले असायचे. एका मुलाखतीत राज सांगतात, की माझ्या संसारात माझं योगदान हे फार कमी आहे. आम्हाला अमित झाला तेव्हा देखील मी सतत दौऱ्यावर असायचो. घरातले सगळे त्याला माझा फोटो दाखवायचे त्यामुळे फोटोमधला बाबा त्याला माहित होता पण प्रत्यक्ष मी समोर असताना त्याला मीच त्याचा तो बाबा आहे हे ओळखू आलं नव्हतं. पुढे राज सांगतात की माझा अमित आता बाबा झाला आणि मी आजोबा. जो वेळ मला अमितसोबत घालवता आला नाही तो वेळ आता मला माझ्या नातवासोबत घालवता येईल.
दोघांचं ही घराणं मोठं, नावलौकीक पावलेलं असलं तरी ते साध्या पद्धतीनेच राहणं पसंत करतात. त्यामुळे त्यांच्या नात्याविषयी देखील कुठेही अतिरंजकता दिसत नाही. त्यामुळे या दोघांमधलं प्रेम उत्तरोत्तर वाढत जावो हीच प्रार्थना!