बऱ्याचदा बायका आपल्या नवऱ्याच्या बदलेल्या स्वभावाची तक्रार करत असतात. पण त्याचा स्वभाव का बदलला असेल, त्याला काही त्रास असेल का किंवा तो आपल्याशी बोलत नाही म्हणजे आपण कुठे चूकत असू का हा विचार करत नाही. आपल्याला जसं आपल्या नवऱ्याकडून लाड होणं अपेक्षित असतं तसं त्यालाही आपल्या बायकोने कधीतरी लाड करावे आवडनिवड जपावी असं वाटतंच. आपण बायका करतो काय आपल्याला ज्या ज्या वस्तू हव्या त्या त्या नवऱ्याला अगदी लाडीकपणे सांगतो कधी हट्ट करून घेतो. तसंच त्याचं ही असतं. प्रत्येक पुरुषाची साधारण लाडाची, की तिने स्वतःहून माझ्या डोक्याची मालिश करावी, न बोलता एखादा गरम चहा पुढ्यात आणून ठेवावा. माझ्या आवडीचे पदार्थ करावे आणि ते विनातक्रार खाऊ घालावेत पण या साध्याशा गोष्टी अनेकींना समजत नाही आणि इथेच आपली चूक होते. माझ्या मैत्रिणींच्या नवऱ्याने आज तिला हे घेऊन दिलं! ते घेऊन दिलं! याकडे आपण बायका अधिक लक्ष देतो. आपल्या नवऱ्याने ही असं करावं अशी आपली सुप्त इच्छा असते. म्हणून सतत आपल्या नवऱ्यासमोर याचं त्याचं कौतुक करतो. अनेकदा त्याची दुसऱ्याशी तुलना करून तो कसं आपल्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही हे दाखवून देतो. त्यामुळे त्यालाही कुठेतरी आपण कमी पडत आहोत असं वाटत राहतचं.
नात्यात असताना प्रत्येकालाच वेळोवेळी चार प्रेमाच्या शब्दांची गरज असते. पण आपला नवरा काही भावुक नाही तो रफटफ आहे असं ठरवत आपण त्याच्याकडे आपलं प्रेम शब्दात व्यक्त करतचं नाही. ते त्यानेच करावं असं आपल्याला वाटतं. पण कधी दुःखाच्या क्षणी किंवा तो कोणत्यातरी कारणाने नाराज आहे हे ओळखून आपण त्याला माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे हे बोलायला हवं. आपले काही शब्द त्याला सुखावून जातात. भावनिकरित्या त्याला ही आपल्या आधाराची गरज असते हे आपण विसरतोच. म्हणून मग आपली बायको आपल्याला समजून घेत नाही असं त्याला वाटतं आणि तो ही हळूहळू बदलतो. नवरा म्हणून चार चौघात तिने मला योग्य वागणूक द्यावी अशी प्रत्येक नवऱ्याची इच्छा असते. पण अनेक जणी त्याला वाईट वाटेल वगैरे याचा विचार न करता केवळ तो असाच आहे तसाच आहे असं आपल्या कुटुंबात किंवा मित्र मैत्रिणींमध्ये बोलतात. त्याला चुकीची वागणूक देतात. आपल्याला नवऱ्याने अशी वागणूक दिली की आपल्याला ते खपत नाही मग त्याच्या बाबत आपण का असं वागतो हे स्वतःला विचारायला हवं नाही का ?
आज आपण स्त्रिया खूप शिकलेल्या आहोत. स्वावलंबी आहोत पण कधीकधी याच स्वावलंबीपणाचा आपण चुकीच्या पद्धतीने वापर करतो. संसारात जे निर्णय दोघांनी घ्यायला हवेत ते आपण एकटेच घेऊन मोकळे होतो. अगदी स्वतःच्या बाबतही काही गोष्टी ठरवून त्याला सांगणही आपल्याला महत्त्वाचं वाटत नाही. आपण सगळं करु शकतो त्याची इथे गरज नाही असं करत त्याला महत्त्वाचं समजतच नाही. मग त्याला पूर्णपणे दुर्लक्षित केल्याची किंवा तो महत्त्वाचा नाही याची जाणीव होते. तोही लक्ष देणं बंद करतो. आपल्याला वेळोवेळी नवऱ्याकडून कौतुकाची, प्रोत्साहनाची, आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी त्याने साजऱ्या कराव्यात याची खूप आशा असते. पण हेच आपण त्याच्या बाबत किती लक्षात घेतो ? नाही घेत. मुळातच नात्यात असताना आपण स्वतःवरून दुसऱ्याला ओळखण्याची आणि जपण्याची नितांत गरज असते. आपण यातलं काहीही करत नसू तर कधी न कधी समोरच्या व्यक्तीलाही आपण जे करतोय ते व्यर्थ आहे असं वाटतं. तोही आपल्याला तसाच प्रतिसाद देतो म्हणून नवरा पहिल्यासारखा वागत नाही असं जेव्हा वाटेल तेव्हा आपल्या या चूका ओळखून त्यावर आपल्याला काम करायलाचं हवं नाहीतर आपल्या जोडीदाराला आपण कायमचं गमावून बसू.