Bluepad | Bluepad
Bluepad
सासु सून आणि ३६ गुण
प्रगती
15th May, 2022

Share

काय ओ, तुम्हाला काय वाटतं शेजारच्या बायका म्हणत होत्या खरंच तसं.....?"-  सावित्रीबाई काल पासून जरा टेन्शनमध्येच होत्या.
"असं काही नसतं,  तुम्ही एखाद्या व्यक्तीला जाणून घेण्याआधीच तिला जज करणं मला पटत नाही."-  दिनकरराव वर्तमानपत्रातल डोकं वर न काढताच म्हणाले.
" तुम्हाला नका का पटेना, पण मला पटलय गेले चार दिवस मी तिला पाहते जरा खडूसच...... खडूस कशाची घमेंडीच वाटते  "- सावित्रीबाई
" असणारच थोडीफार, मुंबई तिच्या बापाच्या 4 कंपन्या आहेत आणि ती एकटीच एवढा मोठा बिझनेस हँडल करते, कळालं का ?"- दिनकरराव
"घ्या घ्या तुम्हीही तिचीच बाजू घ्या, तो चार दिवसात बायकोचा बैल झालाय, तुम्हीही व्हा मॅडमचे वकील...... किती सुंदर सुंदर मुली दाखवल्या ओ मी त्याला, पण त्याला हीच काय आवडली काय माहित, ना जातीची ना धर्माची,  गोरी गोमटी दिसली की पडल प्रेमात.... डोंबल्याच प्रेम....  सावित्रीबाई नाक मुरडत म्हणाल्या.लग्नानंतर सुन पाहायला आलेल्या बायकांनी टाकलेल्या ठिणगीन आज भलताच पेट घेतला होता.
" आहो ती शिंद्यांची गायत्री माहिती का, तिला पसंत केलंत मी आपल्या विनुसाठी किती गुणाची पोर, बीकॉम झालय तिचं, स्वयंपाकातही सुगरण, स्वभावाला पण मनमिळावू तिला करून आणली असती ना तर, या काल आलेल्या बायका नुसतं बघतच राहिल्या असत्या, पण मेलं माझं नशीबच फुटकं....... सावित्रीबाईंची अजूनही तनतन सुरुच होती.  "अहो बोला ना काहीतरी, मगाचपासून एकटीच बडबड करते मी, तुम्हाला काही घेणेदेणेच नाही, तुम्ही घुसा घुसा त्या पेपरात...... "  -  सावित्रीबाई
" सावित्रीबाई कामासोबत टेंशनही वाटून वाटून घेतलं पाहिजे,  तूम्ही घराच टेन्शन घ्या, मी जगाचा टेन्शन घेतो."-  दिनकराव एवढ्या तनावातही मस्करी करत होते.
       दहा-पंधरा मिनिट पुन्हा शांततेत गेली. एव्हाना सावित्रीबाईंचा राग शांत झाला होता. घड्याळात नऊचे टोल पडले पण अजूनही सुनबाई उठल्या नव्हत्या. सावित्रीबाई कसलासा विचार करत होत्या, घड्याळाच्या ठोक्याच्या आवाजानी त्या भानावर आल्या, त्यांनी पुन्हा एकवार विजयच्या बेडरूमकडे नजर टाकली.
" उशीर झाला असेल रात्री झोपायला, नवीन लग्न झालय आपणही समजून घेतलं पाहिजे, नाही का ?"- दिनकरावं  पेपरातून डोकं वर काढत म्हणाले.
" हा "- सावित्रीबाई
" अहो, तुम्हाला काय वाटतं ... ते तिकडच राहायला जातील का?"-  सावित्रीबाईंना उत्तर माहिती असूनही त्या पुन्हा तोच प्रश्न विचारत होत्या.
"मुंबईचा एवढा मोठा बिझनेस सोडून ती इथं का येईल आणि विनयही त्याच कंपनीत तिच्या हाताखाली कामाला आहे, विसरली का तू सावित्री,  कमाल आहे तुझी काहीही प्रश्न विचारते.... दिनकरराव
" ते इथून निघून गेल्यावर आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहतील का? .....की आपल्याला विसरून जातील....." -  सावित्रीबाई
" बघुयात " - दिनकरराव
" आणि उद्या नातवंडे झाली तर ....ती त्यांना आपल्याकडे येऊ देईल का ......?"- चिडलेल्या सावित्रीबाईंचा आवाज आता जास्तच हळवा झाला होता.
" सावित्री तू उगाच जास्त विचार करते .... आधी त्या मुलीशी बोल,  तिला समजून घे.... प्रत्येकच श्रीमंताघरची मुलगी बिघडलेली आणि घमेंडी असेलच कशावरून.... आणि मी तुला कितीवेळा सांगत आलोय,  लोकांच्या सांगण्यावरून आपली मतं ठरवायची नाहीत समजलं? "-  दिनकरराव हातातला पेपर बाजूला ठेवत सावित्रीबाईंना समजावत होते.
"अहो ...पण ,...."-  सावित्रीबाईंचा वाक्य पूर्ण होण्याआधी त्यांच्या कानावर आवाज आला.
" मम्मे...मी कशी दिसते?"-  साडीत उभा राहून मोनिका सावित्रीबाईंना विचारत होती. लहान मुलीन साडी घालावी तशी तिने घातली होती. निऱ्याऐवजी साडीचा बोळा परकरमध्ये खोचल्यान पोट पुढे आल होत.
"सांग ना पहिल्यांदा ट्राय केली स्वतःहून, नीट नाही आली का? परत घालू का ......?"- मोनिका आता जरा टेन्शनमध्येच आली होती, सावित्रीबाई तिच्याकडे फक्त पाहतच होत्या बोलत मात्र काहीच नव्हत्या.
" मम्मे सांग......की .... सॉरी ते मी .....मी तुम्हाला विचारलं.... विचारायलाच..... विसरले की , मी तुम्हाला आई म्हणू का मग मम्मी की मग मॉम ......मी  विनयला तुमच्याशी फोनवर बोलताना 'मम्मे' म्हणताना ऐकलं होतं.... म्हणून... आणि हा अजून एक.... मी तुम्हाला अहोजाहो घालू का मग अरेतुरे...... मला आई नाही ना...... ते मी लहान असतानाच .......आणि बाबाला मी ए बाबा म्हणते..... म्हणून थोडं कन्फ्युजन झालं..... मगाचसाठी खरच सॉरी......"-  मोनिकाला एव्हाना तिची चूक लक्षात आली होती.
" हा ...मम्मी नाही मम्मेच म्हण, अरे तुरे केले तरी चालेल...... तसही विनय कुठे आम्हाला अहो जाहो घालून बोलतो ......आणि तसंही Respect हा मनात असावा लागतो प्रत्येकच वेळेस तो दाखवण्याची गरज नसते बरं,...... आत जा आणि  तो अवतार आधी चेंज करून ये"-  सावित्रीबाई अजूनही जरा सिरीयसच वाटत होत्या
मोनिका चेंज करायला जाणार तसेच सावित्रीबाईंनी तिला पुन्हा आवाज दिला, - "मोनिका अग ते तुझ्यासाठी लग्नाच गिफ्ट आणलं होतं, पण तुला आवडेल की नाही म्हणून दिलं नाही, पण......चल दाखवते " - सावित्रीबाई तिला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन गेल्या.
" बघ म्हणजे तुला आवडलं तर एखाद्या वेळेस घाल" -  सावित्रीबाई तिच्या हातात एक बॉक्स देऊन बाहेर निघून आल्या. ती मात्र तो बॉक्स उघडून पाहत होती त्यामध्ये एक लिंबू कलरची कुर्ती आणि पांढरा रंगाचा प्लाजो होता.
" मम्मी कसा वाटतोय ग?  मी हा कलर याआधी ट्राय नव्हता केला, पण छान वाटतोय ना मला.... बघ नेक्स्ट टाईम मी याच कलरच्या दोन-तीन कुर्ती घेणारे... फ्रेश वाटतो हा कलर.. नाही का ???.....तुझी चॉईस खरच खूप छान आहे गं ....आपल्याला शॉपिंगला गेल्यावर जाम मज्जा येईल....." -  मोनिका तो ड्रेस घालून बाहेर आली होती, तिच्या तोंडाचा पट्टा थांबता थांबत नव्हता.
"चहा "  -  सावित्रीबाईंनी हातातला कप तिच्या तोंडासमोर धरला.
" तु का केला?  मी केला असता ना ...तसंही आज माझी 'पेहली रसोई 'आहे ....मी पाहते ना सिरियल मध्ये.." मोनिका
" हो का?  काय ग, काय काय येत तुला स्वयंपाकातल?"-  सावित्रीबाई  डायनिंग टेबल वरून उठून कीचनकडे जाऊ लागल्या.
" तस तर काहीच नाही ...पण युट्युब आहे ना ...आणि तू कधी कामी येणार... द ग्रेटेस्ट कूक ऑफ द वर्ल्ड ....संजीव कपूरला फाईट...."  -.  मोनिका पुन्हा पूर्ण हातवारे करत बोलत होती.
" असो. तुमच्याच्याने नाश्ता होईल असं वाटत नाही मलाच काहीतरी करावे लागेल,  आणि काय ग कोण म्हणेल तु ४-४  कंपन्यांची मालक आहेस,  किती तो बालिशपना.... अवघडे देवा. ...."-  सावित्रीबाई तिच्या वागण्यावरून खळखळून हसत होत्या.
" मम्मे इथं कामाचं काढायची गरजे का .....ते कामाचं मरू दे आपण शॉपिंग ला कधी जायचं परत आल्यावर पॅकिंगही करावी लागेल...."-  मोनीका नाश्ता बनवणाऱ्या सावित्रीबाईंना हाताखाली लागेल त्या वस्तू देत बडबडत होती.
पॅकिंगच नाव काढतात सावित्रीबाईंच्या डोळयात पुन्हा अश्रू तरळले.
"विनयला घेऊन जा तू शॉपिंगला "-  सावित्रीबाई
"तो नको , नको ....किती बोर माणूस आहे माहिती? सतत मोबाईलमध्ये बघत ...नाही... नाही ...मी कोणता ड्रेस घेतला ते बघतहि नाही तो ....नुसता घे घे म्हणत असतो ...आणि त्याच काय काम ... ड्रेस तुला घ्यायचे ...तुझ्या मापाची घ्यावे लागतील ना ...त्याला नेऊन काय करू..? "-  मोनिका बेसिनमध्ये भांडी घासता घासता तिच्याच नादात बडबडत होती.
" माझ्या मापाचे का ?"-  सावित्रीबाई आश्चर्यचकित होऊन डोळे मोठे करत विचारत होत्या.
" का काय का... तू काय मुंबईला असं काकूबाई सारखं रोज रोज साड्या घालणार का?"-  मोनिका
"मी.... मुंबईला ....म्हणजे ..?"- सावित्रीबाई
"अग अस काय करतेस, आपण मुंबईला शिफ्ट झाल्यावर तु तिथं ड्रेस नाही घालणार का? "- मोनिका
" आपण म्हणजे ?"- सावित्रीबाई 
"अगं, आपण ...तु , मी,  बाबा आणि विनय.... तुला माहितीये तुला गावाकडची सवय म्हणून आम्ही सिटीएरिया मधून बाहेर, थोड आऊट साईड ला नवीन घर घेतलं, शेजारी गार्डन वगैरे पण आहे. मंदिर आहे तिथं आठवड्यातून एखाद्या वेळेस कीर्तन वगैरे होत असतं. बाबांसाठी 2/ 3 लायब्ररी पण पाहून ठेवल्यात मी. तूच तर म्हणत असतीस ना "त्यांना पुस्तक आणि पेपर असल्यावर स्मशानात ही करमेन" विनय सांगत होता असं ......आणि हो तुझ्यासाठी लेडीज क्लबही जॉईन केलय मी.... कसं वाटलं माझ सरप्राईज ......बोल ना ??? "- मोनिकान हातातली भांडी किचनओट्यावर आपटत सावित्रीबाइंकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं.
"अगं तू रडतेस का? तुला नक्की काय नाही आवडलं? ड्रेसच की घराचं ? अग आपण सगळ तुझ्याच म्हणाण्याप्रमाणे घेऊ मग तर झाल ? ड्रेसही  जास्त मॉडर्न  नकोत...  अगं तुला तिकडे कामही कराव लागणार नाही चपाती आणि घरकामांना बाई असेल .....तू फक्त भाज्या कर... द ग्रेटेस्ट कुक ऑफ द वर्ल्ड...." -  मोनिका
" सावित्रीबाई नाष्टा होईल ना आजच्या दिवसात ?" -दिनकररावांचा आवाज आला.
" थांबा ओ, एखाद्या दिवशी उशीर झाला तर नाही चालणार का ?" सावित्रीबाई जवळजवळ त्यांना जरा ओरडल्याच.
" खरंच तुला चालेल का ग,  आम्ही तुझ्यापाशी राहिलेलं?"-  सावित्रीबाई मोनिकाला विचारत होत्या.
" तुम्ही माझ्यापाशी राहणार नाही,  मी तुमच्यापाशी राहणार, आणि तसंही सासुबाई तुमच्या बोर मुलाला संभाळनं माझ्या एकटीच्यान होणार नाही "- मोनिका सावित्रीबाईनपुढे हात जोडत म्हणाली.
" तुझ आपलं काहीतरी,  तुला माहिती श्रीमंताघरची सून म्हटल्यावर कशी असेल? कशी वागेन ?आम्हाला स्वीकारेन का? खूप टेन्शन आलत गं ,पण..... तू तर ....मला मुलगी नाही म्हणून मुलीच्या सगळ्या आपेक्षा सुनेकडून पूर्ण होतील असं वाटलं होतं, जेव्हा विनयने तुझ्याविषयी सांगितलं तेव्हा वाटलं सगळ्या अपेक्षा, अपेक्षाच राहतील पण आता वाटतंय नाही त्या नक्कीच पूर्ण होतील....."-  सावित्रीबाई डोळ्यातलं पाणी पुसत म्हणत होत्या.
" मम्मी एवढा इमोशनल नको होउ, तू असं रडली तर कसं चालेल ,,सगळ्च गोड गोड होऊन जाईल.. थोडीशी भांडण पण  पाहिजेत ना ....मला माझी सासू कशी ' भाबो' आणि ' कोकिलाबेन'  सारखी तिखट पाहिजे. माझ्यावर जाच करणारी ....मी बिचारी सहन करणारी ...सोशिक बहुरानी " -  मोनिका उगाचच उदास होत म्हणत होती.
" अच्छा म्हणजे मी खडूस, व्वा ग शहाणी "- सावित्रीबाई तिचा कान पिळत होत्या.
एव्हाना  विनय डायनिंग टेबलवर येऊन बसला होता.
" मम्मी चहा "- विनयने ऑर्डर सोडली.
" थांब जरा " ....- सावित्रीबाई
" आणि तू , तू काय हिंदी सिरियल पाहती होय, मी टीव्हीचा रिमोट अजिबात देणार नाही हा ...मला माझी जिजीक्का आणि अरुंधतीची सिरीयल पहायची असती"  सावित्रीबाई आणि मोनिकाच्या गप्पा रंगात आल्या होत्या.
"मम्मे तुझ्या मराठी सिरियलच्या नादात, माझ्या सिरीयलचा टाइमिंग गेल्यावर बघच " - मोनिका उगाचच खोट खोट चिडली होती.
" चहा "- विनयने पुन्हा आवाज टाकला.
" थांब रे, दहा-पंधरा मिनिटं ...याचं काहीतरी वेगळच"-
मोनिकान आवाज टाकून त्याला गप्प केलं.
" ए बाबा मी नाश्ता मागून एक तास झाला, मला नाही भेटला अजून.....बघ परत एकदा कर ट्राय....."-  दिनकररावांनी नाश्त्याची वाट बघून वैतागून पुन्हा पेपर चाळायला सुरुवात केली होती.
त्या दोघींच्या गप्पा काही संपायच नाव घेत नव्हत्या.
" चहा देतं का चहा ,कोणी या गरिबाला?"-  विनय.     
विनयला चहा तर मिळाला नाहीच, पण किचनमधून डायनिंग टेबलच्या दिशेने उडत येणार भांड मात्र दिसलं.
कसं  असतं  ना सासु सुनेचा 36 चा आकडा असंन घरासाठी जेवढे भयंकर असतं,  त्यापेक्षा सासु सुनेचे 36 पैकी 36 गुण जुळन घरासाठी महाभयंकर असतात.......

244 

Share


Written by
प्रगती

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad