Bluepad | Bluepad
Bluepad
बायको - एक महान व्यक्तिमत्त्व.
A
Ajit
15th May, 2022

Share

बायको - एक महान व्यक्तिमत्व
The Great Personality
बायको - एक महान व्यक्तिमत्त्व.
"काय काम असते तुला घरात, दुपारी निवांत झोपा काढतेस. मग दमायला काय झाले, एक एवढेसे काम पण करता आले नाही तुला." काम न झाल्याचा राग मी बायकोवर काढीत होतो.
"बोला ! मलाच बोल लावा तुम्ही. एवढी सगळी कामे करते, मर मर मरते तुमच्या साठी, एक काम राहिले तर एवढे ऐकवलेत, जरा आठ दिवस आमची कामे करून बघा म्हणजे समजेल." बायकोने नेहमीचे अश्रुंचे ब्रम्हास्त्र बाहेर काढीत मला घायाळ केले.
अग तसे नाही ! पण ...!!!
"काही बोलू नका आता. मी चार दिवस जाते माहेरी, मग करून दाखवा हे सर्व." बायको मुसमुसत मला म्हणाली.
"अरे घाबरतो की काय हे करायला, खुशाल जा माहेरी चार नाही आठ दिवस जा, काही अडणार नाही माझे." पुरुषी अहंकार डीवचल्या मुळे मी पण आता मोडेन पण वाकणार नाही असे ठरविले.
आणि काल अचानक बायकोने सांगितले, मी माहेरी जाते. आठ दिवस सांभाळा आता.
आता माझी परीक्षा होती. बोललो त्या प्रमाणे घर सांभाळायची.
पहिल्या दिवशी बायकोने, मी सकाळी उठून काही करणार नाही हे माहीत असल्या प्रमाणे, माझ्या रात्री पर्यंतच्या पोळ्या, भाजी करून ठेवली होती. चला पहिला दिवस निभावला, केले काहीच नाही.
रविवारी सुट्टी, त्या मुळे मोबाईल मधील गजर सेट नव्हता. मग काय ! अस्मादिकांची पहाट सकाळी ९ वाजता झाली. मग घाई घाई ने उठलो. तोंड धुतले. टाकी भरण्या साठी नळ सोडला तर पाणी गेलेले. बोंबला आता दिवसभर पाणी नाही. मग चहा ठेवण्या साठी पातेली शोधू लागलो. बरीच धुवून ठेवलेली भांडी वर खाली केल्यावर, लपवून (😁😁😁) ठेवलेले भांडे सापडले. भांड्यात बायकोने साठवून ठेवलेल्या पाण्यातून १ कप पाणी ओतले, आणि गॅस पेटवून भांडे गॅस वर ठेवले. आता पाळी होती चहा...साखरेचे डबे शोधायची. मग तेथील सर्व लहान सहान डबे शोधायला सुरवात केली. १५ मिनिटाने किल्ला सर केल्या प्रमाणे ते डबे सापडले. चहा...साखर भांड्यात टाकायला गेलो तर काय, भांड्यातील पाणी गायब. मग लक्षात आले, गॅस मोठ्ठा ठेवला होता. मग परत १ कप पाणी घेतले, अंदाजाने चहा...साखर टाकली आणि वाट पाहत राहिलो. ७-८ मिनिटात चहा उकळला. तसे दूध तापवायला ठेवले. तेवढ्यात मोबाईल वर व्हाट्सएप ची टोन वाजली. म्हणून मोबाईल हातात घेतला. एक एक गुड मॉर्निंग च्या मेसेज ला उत्तरे देत राहिलो. आलेले जोक्स वाचत राहिलो. त्यात वेळ कसा गेला समजले नाही. काहीतरी जळल्याचा वास आला म्हणून किचन मध्ये गेलो. तर काय ! दुधाच्या भांड्यात सफेद दुधा ऐवजी, काही तरी काळे काळे दिसले आणि सगळा धूर झालेला. मला समजेना आता दूध ठेवलेले एवढ्यात ते जळून पण गेले. चला ! सकाळचा चहा बोंबलला. सकाळचा चहा वेळेवर न मिळाल्या मुळे डोके दुखायला सुरवात झाली. पण ओरडणार कोणाला. मग काय खाली टपरीवर जाऊन चहा पिऊन आलो.
आंघोळी साठी पाणी तापविले. ते सुद्धा पातेले बायकोने भरून गॅस जवळ ठेवले होते म्हणून लवकर मिळाले.
आंघोळ झाली. आता देव पूजा. पण देवांना ताजे पाणी आता कुठून मिळणार. देवांना म्हटलं, मला लवकर वेळेत तुम्ही उठविले नाहीत ना ! त्याची फळे तुम्हीच भोगा आणि कालच्या पाण्यानेच आंघोळ करा.
मग सगळे देव ताम्हनात घेतले. अबब ! किती हे देव !! २-४ अजून आणले असते तर ३३ कोट देव पूर्ण झाले असते. बहुतेक सगळ्यां ची घरे सोडून, देव आमच्या कडेच ठाण मांडून बसले आहेत की काय असा माझ्या मनात विचार आला. आता बराच उशीर झाला आहे, तेव्हा आज देवांना स्विमिंग टॅंक चा आनंद देऊया असा मनाशी सोयीस्कर पणे विचार करून त्या ताम्हनात तांब्यातील पाणी ओतले. आणि ५-१० मिनीटांनी सर्व देव आंघोळ करून आपापल्या आसनावर स्थानापन्न झाले. मग सर्वाना गंधा ने सुशोभित केले. बाजूला फुले होतीच ठेवलेली. प्रत्येकाला निराळे फूल कशाला, म्हणून त्यातील फुले काढून, त्यांच्या पाकळ्या काढल्या आणि दोनचार येत असलेले श्लोक म्हणून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. अगरबत्ती लावली आणि अशी देवांची यथासांग पूजा २०-२५ मिनिटात पूर्ण केली. त्या वेळी लक्षात आले, बायको करीत असलेल्या व्रत, वैकल्ये आणि ही रोजची तास-दीड तासांची पूजा या मुळेच, मी करीत असलेल्या रोजच्या पापां पासून मला संरक्षण मिळते आहे. धन्य ती बायको, एवढे वाईट वागून सुद्धा आमच्याच भल्याचा विचार करत असते.
नंतर लक्षात आले अरे केर काढायचा राहून गेला. ही आंघोळी आधी केर काढायचा असे काहीतरी सांगून गेल्याचे आठवले. पण मी विचार केला, काल दिवसभर घरात कोणीच नव्हते, केर जमा होणार कुठून. केरच झाला नाही तर काढायचे काय. म्हणून केर काढायचा विचार त्याच केरसुणीने झाडून टाकला.
हुश्श ! बरीच कामे पाssssर पाडली. घड्याळ पाहिले तर ११.३० वाजले होते. आता जरा १० मिनिटे विश्रांती घेऊया. मग जेवण करूयात. म्हणून सोफ्यावर लवंडलो. १० मिनिटांनी डोळे उघडले पाहतो तर काय, २ वाजलेले. अरे ! बापरे ! आता जेवण बनविणार कधी आणि मी जेवणार कधी. पोटातील कावळे पण जुनी दुष्मनी उकरून काढल्या सारखे पोटात ओरडत होते. जणू काही त्यांना महिनाभर खायला मिळाले नव्हते असे बोंबलत होते. आता काय करायचे. चला बाहेर जाऊन जेऊया, म्हणून समोरच्या खानावळ कम हॉटेल मध्ये गेलो. "अरे ! साहेब ! लेट आलात ! " हॉटेल मालकाने आपुलकीने विचारले.
"म्हणजे ! जेवण संपले की काय ?" मी उद्गारलो
"अहो जेवण संपेल कसे. वहिनी सांगून गेल्या होत्या, तुमचे जेवण राखून ठेवायला, म्हटले १ वाजे पर्यंत याल. म्हणून म्हटले लेट झाला. बर ! चला ! जेवून घ्या पटापट." बायकोच्या दूरदर्शी पणाला मनापासून धन्यवाद देत, मी जेवायला बसलो. एका ब्राह्मणाला उपाशी राहण्या पासून वाचविल्या बद्दल पत्नीला मनापासून आशीर्वाद दिला. जेवण झाल्यावर, मस्त पैकी पान तोंडात कोंबले वर सिगारेट चा धूर पण सोडला आणि दूध घेऊन घरी परत आलो.
चला ! आता थोडी विश्रांती घेऊया. म्हणून सोफ्यावर आडवा झालो. जरा डुलकी लागते न लागते तोच बेल वाजली. कोण आले आत्ता म्हणून जरा चिडूनच दार उघडले. खांद्यावर एक सफेद दिसणारे पण मळकट पोते, डोक्याला फडके, रंग विटलेला शर्ट, खाली मळकट पॅन्ट असा वेष केलेला एक माणूस उभा होता.
काय पाहिजे ? झोपमोड झाल्याने मी जरा चिडून विचारले.
रद्दी ! चाहिए हमका !
क्या ! मला काहीच समजेना.
बहनजी है का घरमा ! उनका बुलावा तनिक. रद्दी लेने का है. बहेनजी नही है घरमे. आठ दिन के बाद आना. अरे नहीं ! कल ही बुलाया था, हम न आ सका.
फिर अभी क्यो आया हमारी झोपमोड करने को. मी आत जाऊन रद्दी शोधायचा प्रयत्न केला, कुठेही दिसली नाही. मुझे मालूम नहीं कहा रखी हैं रद्दी. बाद में आओ.
अरे नहीं नहीं, आज रद्दी नाही ली तो बहुत डाटेंगी वो हमका. हमका मालूम हैं, बहनजी कहाँ रखती है रद्दी, चलो हम ही लेते हैं. असे म्हणून मला ढकलून, तो आत शिरला. सरळ बेडरूम गेला आणि वॉर्डरोब च्या पाठी हात घालून, व्यवस्थित बांधून ठेवलेली रद्दी काढली. आणि माझ्या कडे एक तुच्छतेने कटाक्ष टाकून बाहेर पडला.
च्यायला ! माझ्याच घरातील रद्दी मला सापडत नाही, आणि हा बाहेरचा माणूस बरोबर हुडकून काढतो, नवल वाटले मला.
अरे ! पैसा तो दे दो रद्दी का.
ना बाबूजी! पैसा हम बहनजी को ही देंगे. आपको कुछ नाही पता. असे म्हणून तो रद्दी घेऊन निघून पण गेला.
माझा स्वतः वरचा राग दरवाज्यावर काढत, लाथ मारून दरवाजा बंद केला. आणि परत झोपायचा प्रयत्न करू लागलो.
तोच परत १०-१५ मिनिटांनी बेल वाजली.
दारात एक १०-१२ वर्षाचा मुलगा उभा होता. काय रे ! काय हवे आहे.
इस्त्रीचे कपडे आणले आहेत. हे घ्या. म्हणून पेपरात बांधलेले कपडे माझ्या हातात दिले. मी ते समोरच सोफ्यावर ठेवले. पाठी वळून पाहतो तर तो खुर्चीवर बसलेला.
काय रे काय हवे आहे आता. साहेब कपडे. इस्त्रीला दुसरे कपडे द्या. आता आल परत प्रॉब्लेम. हे कपडे कुठे शोधायचे. मी परत आत जाऊन पाहून आलो. नाही रे ! कुठे ठेवलेत माहीत नाही. नंतर ये.
चला ! व्हा बाजूला !! मी घेतो. असे म्हणून मला ढकलून, तो सोफ्या जवळ ठेवलेल्या कपाटा जवळ गेला, कपाट उघडले आणि आत कपड्याच्या बोचक्यात बांधून ठेवलेले कपडे उचलले. पडलेल्या चेहेऱ्याने त्याला विचारले किती पैसे रे!
राहू द्या साहेब मी बाईसाहेब कडून घेईन, तुम्हाला काहीच माहिती नाही. सरळ सरळ माझ्या तोंडावर माझा अपमान करून ते इस्त्रीवल्याच दिवटं पसार झाले.
च्यायला ! हिच्या कुठे कुठे आणि कोणा कोणा कडे ओळखी आहेत कुणास ठाऊक. माझ्या घरातील वस्तूंची माहिती माझ्या पेक्षा, या बाहेरच्याच लोकांना जास्त आहे. माझीच मला शरम वाटली. ही दुपारची झोपा काढते या माझ्या कल्पनेला तडा गेला होता. धन्य ती बायको ! मनोमन मी तिचे पाय धरले.
नंतर एक एक करून किराणा वाला येऊन सामान टाकून गेला, दळण वाल्याने दळण टाकले. पेपर वाल्याने तर कमालच केली, बेल वाजविल्यावर दार उघडले तर, ओह ! सॉरी चुकून तुमची बेल मारली असे म्हणाला. मी म्हटले अरे आमचेच पेपर बिल आहे, दे बिल मला, मी देतो पैसे. तर म्हणाला नको, बाईसाहेब रागावतील, त्रयस्थ माणसां कडून पैसे का घेतलंस म्हणून. मी नंतर येईन. अरे ! मीच मालक आहे, पण हे ऐकला तो थांबला होताच कुठे. मी माझ्यावरच चरफडत राहिलो. घरावर पाटी माझ्या नावाची पण सगळीकडे सत्ता आणि धाक हिचा. पण एक बरे वाटले, मीच एकटा हिला घाबरतो असे नाही. बाकी पण सगळे हिला घाबरतात 😁😁😁
एवढे होई पर्यंत घड्याळात ४.३० वाजले होते. आता झोपणार काय. आणि अचानक आठवण झाली, अरे आज आपण एवढ्या वेळ मोबाईल पहिलाच नाही. मग मोबाईल घेतला तर काय त्याची बॅटरी डाऊन झालेली. वैतागून मोबाईल चार्जिंग ला लावला आणि टीव्ही चालू केला. साडेपाच वाजे पर्यंत टीव्ही पाहून, चहा करायला घेतला. मस्त पैकी तिथेच उभा राहून दुधाचा चहा बनविला. चहा संपवून, कपडे घालून बाहेर पडलो.
नाक्यावर नेहमीच्या मैत्री बरोबर, चहा... आणि ओघाने आलेली सिगारेट दोघंचा आस्वाद घेऊन गप्पा चालू झाल्या. एवढ्या पर्यंत बायको घरात नाही ही बातमी षटकर्णी झाली होती. मग ! काय अजित !! आज फ्रीडम एन्जॉय करायचा का ? मित्रांची ऑफर. नाही कसे म्हणणार. चलो एन्जॉय करेंगे, म्हणून मी त्यांना हो म्हणणार एवढ्यात एसेमेस ची रिंग वाजली. व्हाट्सएपच्या च्या युगात मेसेज कोणत्या गाढवाने पाठविला, म्हणून मोबाईल पहिला. आणि मी उडालोच.
बायकोचा मेसेज होता. " मी घरी नसले तरी, एन्जॉय करायला जाऊ नका वेळ वर घरी या, अजून जेवण बनवायचे असेलच. " च्यायला ! एवढ्या लांब राहून सुद्धा लक्ष ठेवून आहे नवऱ्यावर. सरकारचा महसूल खूप बुडवितात या बायका. विनोद सोडा, पण नवऱ्याची व्यसने, केवळ बायकां मुळेच कंट्रोल मध्ये असतात. मग काय मित्रांना नाही म्हणालो आणि घरी आलो.
आता ९ वाजले होते. जेवण करायला पाहिजे. मग ! अजितराव काय खाणार आज. दर सुट्टीच्या दिवशी बायकोला ऑर्डर सोडलेल्या वेगवेगळ्या पदार्थांची नांवे डोळ्या समोर आली. आणि तोंडाला पाणी सुटले. पण मग लक्षात आले, आपल्याला फक्त खायचे माहीत आहे, करायला कुठे येते. मग काय, नेहमीच चमचमीत कशाला खायचे, पोट बिघडायचे. आपण साधेच जेवण करूया असा सोईस्कर पणे विचार करून, कुकर लावायला घेतला. लग्न झाल्यावर पहिल्या वर्षी बायकोला खुश करण्यासाठी तिला मदत करण्याचा उद्देशाने शिकून घेतलेली कुकर लावण्याची कला आज उपयोगात आली. म्हणतात ना ! शिकलेले फुकट जात नाही, आज कामी आले ते ज्ञान.
मग परत एकदा माझ्या लपून राहिलेल्या डबे रुपी शत्रूंना शोधायची कामगिरी सुरू केली. बरीच लढाई केल्यानंतर, तोरणा किल्ला घेतल्यावर, शिवाजी महाराजांना काय आनंद झाला असेल याची प्रचिती मला ते डबे सापडल्यावर आली. मग कुकर लावला. डाळ आणि भात नुसतेच काय खायचे. काहीतरी अजून करूया. सगळ्यात सोपी टोमॅटो कोशिंबीर. चला ! कोशिंबीर करूया. नशिबाने टोमॅटो, कांदे जागेवर मिळाले. विळी घेतली आणि अस्मादिक कोशिंबीर करण्यास सज्ज झाले. दोन तीन टोमॅटो कापले, मग कांदा कापायला घेतला. दोन चार काप कापले आणि साले रडायलाच आले. पुरुष बायकांना रडवितात हे माहिती होते, पण पुरुष, पुरुषाला सुद्धा रडवितो हे आजच जाणविले. डोळ्यातील पाणी पुसत, निग्रहाने मी परत लढाई साठी सज्ज झालो. पण तोपर्यंत गनिमाने मोका साधला होता.
आपल्याच माणसाने, माझ्याच अश्रूंनी पाठीत खंजीर खुपसला होता. डोळ्यातील पाणी बघून शत्रू रुपी विळीने माझ्या बोटावर हल्ला चढविला आणि एका घावात माझे साथीदाराचे रक्त काढले. त्या शत्रूला शिव्या देत, या लढाईत आपले रक्त सांडणाऱ्या माझ्या बोटाला तोंडात प्रेमाने कवटाळले. कांदा शत्रू की विळी शत्रू हा वाद सोडून, मी कोशिंबीर करण्याचे विचार सोडून दिले. आणि कापलेल्या टोमॅटो वर फक्त तिखट मीठ टाकून एक नवीन डिश केल्याचा आनंद मिळविला.
गरम गरम भात, वरण आणि बिघडलेली कोशिंबीर असा राजेशाही मेनू ने रात्रीचे जेवण संपविले. उद्या सकाळी लवकर उठून भांडी घास, असा मनाने दिलेला कौल स्वीकारून टपरीवर सिगारेट ओढायला निघालो.
एकच सिगारेट ओढा, बायको नसल्याच्या आनंदात दोन नकोत. टाइमावर परत एक मेसेज. च्यायला ! ही माहेरी गेली का इथेच माझ्यावर लक्ष ठेवून आहे, काहीच समजेना. घेतलेली सिगारेट ओढून निघालो.
घरी आल्यावर पाय धुताना कपडे धुवायचे राहून गेले हे लक्षात आले. पण प्रचंड कंटाळा आला होता. उद्या सकाळी लवकर उठून, ही राहिलेली सर्व कामे करू असा विचार करून बेडवर पडलो.
त्यावेळी बायकोची खरी महती कळाली. घरात सुद्धा कामे कमी नसतात हे जाणविले. ऑफिसला रजा घेऊ शकतो, कामाचा कंटाळा करून, काही कामे उद्यावर ढकलू शकतो पण बायको कधीच रजा घेत नाही, कुठलेही काम उद्यावर ढकलू शकत नाही हे उमगले. कशी काय ही सर्व कामे ती हसत मुखाने, न रागविता करीत असेल याचे नवल वाटले. खरच ग्रेट आहे माझी बायको. Hats off to her.
आपला पराभव मान्य करून, तिला उद्याच परत बोलविण्याचा विचार मनाशी पक्का केला आणि सकाळ पासून केलेल्या कामाने (???) दमलेला माझा पुरुषी जीव झोपेच्या आधीन झाला.
२५ डिसेंबर नातळची सुट्टी. त्यामुळे सुट्टीच्या रिवाजा प्रमाणे सकाळी सकाळी ९ वाजता माझी पहाट झाली.
घ्या गरम गरम चहा. मी बेड वरच उडालो. तू ! तू कधी आलीस !! बायको कडे बघत विचारले. काही न बोलता ती परत किचन मध्ये गेली. तोंड धुवायला मी बाथरूम मध्ये गेलो, बघतो तर काय, कालचे माझे शर्ट पॅन्ट धुवून वाळत टाकलेले. तसाच किचन मध्ये गेलो तर, कालची राहलेली भांडी धुवून, जागेवर गेलेली. मी अगदी कानकोंडा होऊन, मान खाली घालुन उभा होतो.
मला असे उभा बघून, बायकोच्या डोळ्यात पाणी आले. कुठल्याही प्रकारे, नवऱ्याची मान खाली जाऊन द्यायची नाही हे पतीव्रतेचे ब्रीद ती कोळून प्यायलेली. गरम पोह्याची डिश हातात घेऊन, ती घेऊन मला हॉल मध्ये आली. आपल्या हाताने पोह्याचा घास भरवीत म्हणाली, अहो ! बाई काय आणि पुरुष काय दोघेही आपापल्या जागी श्रेष्ठ असतात. कोणी कोणाला कमी लेखू नये. मला ही तुमची आठवण येत होती, तुमचे हाल डोळ्यासमोर येत होते, म्हणूनच काल रात्रीची बस पकडून आले मी.
तशीच तिला मिठीत घेतली. खूप करतेस गं तू. मी तुला उगाचच बोललो रागाच्या भरात. माफ कर मला.
इश्श ! माफी काय मागता. अहो ! संसारात हे राग रुसवे चालायचंच. काल मला राग नाही आला तुमचा, पण आज मात्र आला. काय हा पसारा सगळी कडे. मी असे ठेवते का घर. सोफ्यावर ठेवलेले इस्त्रीचे कपडे आणि टेबल वरची दळणाची पिशवी उचलत ती म्हणाली.
Sorry yaar. नाही जमले मला तुझ्या भूमिकेत शिरायचे. मी माझा पराभव मान्य करतो.
आज पर्यंत मी तुला सर्व गोष्टीत गृहीत धरले. पण आज समजले, घरातल्या नोकरी पेक्षा, बाहेरची नोकरी करणे किती सोप्पे आहे ते. अहो ! मी तर फक्त घरच सांभाळते, काही जणी नोकरी करून सुद्धा घरे चांगली सांभाळतात.
Yes. Really all you are great. Salute to you and all other females like you.
✍️ ©अजित ✍️

220 

Share


A
Written by
Ajit

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad