चंदेरी दुनियेची 'धक-धक' गर्ल माधुरी दीक्षितचे सौंदर्य आणि अभिनय यांचे जगभरातले कोट्यवधी लोक चाहते आहेत. आज १५ मे. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्रीचा आज ५५ वा वाढदिवस. तिच्या फिल्मी दुनियेतील बरेच किस्से आपण ऐकत असतो. पण आज तिच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घेऊयात ते तिच्या लग्नाबद्दल…
ही गोष्ट आहे ९० चे दशक संपत आलं होतं तेव्हाची. भारतीय असो किंवा अनिवासी भारतीय, हिंदी सिनेसृष्टीतल्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक असणारी माधुरी माहीत नाही, अशी ही व्यक्ती ह्या पृथ्वीतलावर असू शकते? हो असू शकते. एक अशी व्यक्ती होती जी माधुरीच्या चित्रपटांबद्दल आणि तिच्या प्रसिद्धीबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होती.
एखादा मुलगाच काय, मुलगी सुद्धा समोर माधुरी दीक्षित बसली असेल तर स्वतःला चार वेळेस चिमटा काढेल. पण माधुरी ज्या व्यक्तीशी बोलत होती, त्या व्यक्तीला ही मुलगी 'द माधुरी दीक्षित' आहे, तिचे चाहते जगभर आहेत, तिचं सिनेमातलं यश याबद्दल काडीचीही माहिती नव्हती. पण त्या व्यक्तीशी बोलल्यावर त्या व्यक्तीच्या साधेपणाने माधुरी इतकी प्रभावित झाली आणि तिच्या मनात 'हम तुम्हारे हैं, तुम्हारे सनम' हीच धून वाजायला लागली. तिने ठरवले की हाच तिचा जीवनसाथी होईल. ती आनंदी आणि शांत व्यक्ती म्हणजे डॉ. श्रीराम नेने.
अमेरिकेत राहणारे डॉ. श्रीराम नेने यांचा जन्म लंडनमध्ये झाला. डॉक्टर नेने यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातून शिक्षण घेतलं आणि ते तिथंच डॉक्टरकी करू लागले. डॉ. नेनेंसोबत माधुरीची पहिली भेट योगायोगाने तिच्या भावाने लॉस एंजेलिसमध्ये आयोजित केलेल्या पार्टीत झाली. या पार्टीत माधुरीची ओळख डॉक्टर श्रीराम यांच्याशी तिच्या भावानेच करून दिली. नेने हे कॅलिफोर्नियामधील प्रसिद्ध डॉक्टरांपैकी एक. श्रीराम यांना माधुरीच काय, तर भारतीय सिनेमा सृष्टीबद्दलही फारसं माहीत नाही हे ऐकून माधुरीला खूपच आश्चर्य वाटलं. खरंतर माधुरी आजवर ज्यांना ज्यांना भेटलेली होती, तो प्रत्येकजण माधुरीला फक्त अभिनेत्री म्हणून पाहत होता आणि फक्त तिच्या प्रसिद्धी आणि चित्रपट जीवनाबद्दल बोलत होता. पण प्रसिद्धीचं वलय बाजूला ठेवून ती व्यक्ती म्हणून कशी आहे, हे जाणून घेण्याचं काम डॉ. नेने यांनीच केलं. ते माधुरी नावाच्या एका व्यक्तीला भेटले हेच माधुरीला खूप आवडलं.
पुढे भेटीगाठींची मालिकाच होत गेली आणि एके दिवशी श्रीराम यांनी माधुरीला विचारले की ती त्यांच्यासोबत डोंगरावर बाईक रायडिंगसाठी येईल का? माधुरीने नकार देण्याचा प्रश्नच नव्हता, एका कलाकाराला डोंगरासारखी रम्य ठिकाणी जाण्याची संधी मिळाली आणि तीही अशा ठिकाणी जिथे तिला कोणी ओळखत नाही. म्हणजे शांतता मिळेल आणि छान एन्जॉय करता येईल कारण एखाद्या सेलिब्रिटीसाठी भारतात मुक्तपणे आणि आरामात फिरणे इतके सोपे नाही. माधुरी त्यांच्यासोबत जायला तयार झाली. मात्र, डोंगरावर गेल्यानंतर हे प्रकरण 'अपने बस की बात नही' हे माधुरीला जाणवलं. डॉक्टर श्रीरामने तिला विचारले की तिला डोंगरात बाईक कशी चालवायची हे माहित नाही का? माधुरीने नकारार्थी मान हलवली, मग काय डॉक्टरांनी तिला धरून बाईक रायडिंग शिकवली.
एकमेकांना असंच समजून घेतल्यानंतर एके दिवशी त्यांना वाटू लागलं की आता ते एकमेकांशिवाय राहू शकत नाही. मग काय, मीडियाला सुगावा लागण्या आधीच घरातील मंडळींच्याच उपस्थितीत १७ ऑक्टोबर १९९९ रोजी माधुरीने श्रीराम नेनेंसोबत लग्नगाठ बांधली.
त्यावेळी डॉ. नेनेंच्या प्रेमात पडल्यामुळे माधुरीच्या दिलाची जी काही धकधक वाढली होती त्यासाठी तिने तिच्या करिअरचीही पर्वा केली नाही आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. कारकिर्दीतील शिखरावर असूनही तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला.
काही वर्षांपूर्वी माधुरी आणि डॉ. श्रीराम त्यांच्या दोन मुलं अरिन आणि रियानसह भारतात स्थायिक झाले आहेत. डॉ. नेने देखील माधुरीला तिच्या सेकेंड इनिंगसाठी सपोर्ट करताना दिसतात. त्यांनीही आता भारतात राहून आपली वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.
या ही वयात 'मोहिनीची' प्रेक्षकांवर असलेली मोहिनी तशीच अबाधित आहे. तर अशा या अभिनेत्रीला सुदृढ आयुष्य लाभो… माधुरीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !.!.!