Bluepad | Bluepad
Bluepad
आपण जीवापाड प्रेम करत असलेली व्यक्ती अचानक सोडून गेली तर काय करायचं?
N
Nisha Shetye
15th May, 2022

Share

प्रेमात प्रतीक्षा करावी लागते हे खरं आहे पण किती दिवस याचा जोडीदाराने अंदाज दिला तर तो प्रतिक्षेचा काळ कसाबसा संपतो. पण अचानक जोडीदार सोडून गेला तर तो पुन्हा कधी परतेल याची काहीच निश्चिती नसते. मरण कळा सोसाव्यात अशा दुःखाला आपल्याला सामोरं जावं लागतं. सोडून जाण्याचं त्याचं नक्की कारण काय असेल ? आपलं काही चुकलं का ? आपण कुठे कमी पडलो का असे एक ना अनेक प्रश्न आपल्या डोक्यात दिवस रात्र अगदी भुतासारखे थैमान घालत राहतात. आपण अगदीचं निरस आयुष्य जगत आहोत हे ही आपल्या लक्षात येत नाही. माझ्याप्रमाणे अनेक जण आहेत जे या परिस्थितीतून जातात. पण मी स्वतःला सावरलं. तुम्हालाही सांगते..


आपण जीवापाड प्रेम करत असलेली व्यक्ती अचानक सोडून गेली तर काय करायचं?स्वीकार करायचा
आपलं मनच हे मानायला तयार नसतं की ती व्यक्ती आपल्याला सोडून गेली आहे. आपण वाट पाहण्यात आपला बराचसा वेळ वाया घालवतो. पण सुरुवातीलाच त्याचं असं अचानक निघून जाण्याचा अर्थ आपल्याला ओळखायला हवा. एक तर त्याला आपल्या भावनांची कदर नसते किंवा तो स्वतःला अधिक प्राधान्य देणारा असतो. ज्यामुळे त्याला आपल्या आयुष्यातून निघून जाणं हे सांगावंस ही वाटत नाही. म्हणून आपणही विनाकारण त्याच्या आठवणीत कुढत राहण्यापेक्षा किंवा वारंवार त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तो पुन्हा येणार नाही हे स्वीकारायला हवं.

कारणं शोधणं बंद करा
प्रेमाच्या व्यक्तीच्या जाण्याची कारणं आपण शोधत राहतो पण कारणं शोधून तरी त्याचा काय उपयोग होणार आहे. अचानक निघून गेलेल्या व्यक्तीचं आपण कारण शोधलं किंवा जे कारण आहे ते ओळखून ती परिस्थिती पूर्ववत झाली तरी आपण त्याला स्वीकारु का? आणि त्याने साध्य तरी काय होणार आहे? म्हणूनच वेळोवेळी त्याच्या निघून जाण्याची कारणं शोधत रहायची नाही हेच आपण ठरवायला हवं.

माझ्यासाठी योग्य तो नव्हता…
त्या व्यक्तीसोबत घालवलेले क्षण आपल्याला वेळोवेळी आठवत राहतात. पण त्याने प्रेमात आपल्याला फसवलं आहे हे देखील आपण लक्षात घ्यायला हवं. तो आपल्या प्रेमासाठी योग्यच नव्हता असं आपण समजायचं. जर तो आपल्या प्रेमाच्या लायक असता तर त्याने आपल्या प्रेमाला समजून उमजून आपली साथ दिली असती. अचानक पळपुटेपणा करत तो सोडून गेला नसता असं ठरवून आपल्या पुढच्या आयुष्याकडे आपल्याला पाहायला हवं तेच आपल्या हिताचं आहे.

आपण भाग्यवान आहोत असं समजायचं..
मला असं वाटतं की त्या व्यक्तीसोबत अजून काही दिवस खोट्या नात्यात राहण्यापेक्षा स्वतःचं नुकसान करुन घेण्यापेक्षा ती व्यक्ती जितक्या लवकर आपल्या आयुष्यातून गेली तितकं आपल्यासाठी चांगलं झालं. जर ती आणखी काही काळ आपल्या आयुष्यात असती तर कदाचित तिने आणखी आपल्याला उध्वस्त केलं असतं म्हणून ती वेळेत आपल्या आयुष्यातून गेली यासाठी आपण स्वतःला भाग्यवानचं समजायला हवं.

आपण बेस्टच आहोत..
आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती आपल्याला सोडून निघून गेली की आपण स्वतःला अधिक दोष देतो. मी असा असेल, माझं हे चुकलं असेल, त्याला माझा असा स्वभाव आवडला नसेल पण आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तीच्या आवडीबद्दल का विचार करायचा ? आणि स्वतःला का दोष द्यायचा. त्याच्यातही काही कमी होती असा विचार आपण का करत नाही. आपण आधीही बेस्ट होतो आणि आताही आहोत असाच विचार करायचा आणि झालं ते धडा समजून आपल्या यशाकडे लक्ष केंद्रित करायचं.

आपण प्रेमात पडलेली माणसं ना दुःखात स्वतःला अगदी होरपळून घेतो. कोणत्याही गोष्टीचा सकारात्मक बाजूने विचारच आपल्याला करता येत नाही. जोडीदार अचानक सोडून गेला म्हणून केवळ दुःख करत राहण्यापेक्षा त्याची सकारात्मक बाजू आपण समजून घ्यायला हवी. ती व्यक्ती आपल्याला सोडून गेली म्हणून आपलं आयुष्य संपत नाही तर तिथून एका नवीन आयुष्याला सुरुवात होते हे लक्षात घ्यायला हवं.

515 

Share


N
Written by
Nisha Shetye

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad