मी चेहऱ्याने काळी आहे. लहानपणी आम्हा भावंडात भांडण झाले तरी मला मंजुषा अशी हाक न मारता सर्वजण मला काळी म्हणायचे. मग थोडी मोठे झाले. शाळा झाली, महाविद्यालयात जाऊ लागले. जशी वीस वर्षांची झाले तशी सर्वांना घरात चिंता लागली. या काळीसोबत कोण लग्न करणार? माझे लग्न जमेल का नाही, मी काळी असल्यामुळे नवरा प्रेम करेल की नाही या भीतीने मी त्वचा गोरा करणाऱ्या क्रिमचा साठा आणून ठेवला. कृत्रिम रीत्या त्वचा गोरी व्हायची अनेक साधने सध्या उपलब्ध झाली आहेत. कृत्रिमरित्या माणसाचे मन सुद्धा स्वच्छ करायची क्रीम बाजारात आली असती तर किती छान झाल असते.
मला मुले पाहायला सुरुवात झाली. ग्रामसेवक, तलाठी, शेतकरी, उद्योजक अशा सर्व प्रकारातील मुलांना माझ्या समोर आणले गेले. अनेक पोहे वाटपाचे कार्यक्रम सुरू असल्यासारखे मला वाटायचे. खूपदा समोरील मुलाने मला नकार दिला आणि खूपदा माझ्या बापाने मुलांना नकार दिला. मुलींकडे हक्क कुठे असतो मुलाला नकार द्यायचा. माझ्या वडिलांना नोकरीवाला आणि कमीत कमी दहा एकर शेती असलेला जावई पाहिजे होता.
दोन वर्ष झाली. माझे लग्न काही जमत नव्हते. गावातील ब्राम्हणांच्या सांगण्यानुसार रुक्मिणी स्वयंवर वाचले, हरतालिका, पिंपळ पूजन सर्व काही केले. घरचे माझ्या रंगावर दोष देऊ लागले. कोरोना काळ होता. तालुक्यातील एक स्थळ आले होते. घरात
भरगच्च पैसा, बोलेरो गाडी, शेती पंधरा एकर मुलगा ब्रदरमध्ये शिकलेला. मुलाने होकार दिल्याच्या दुसऱ्या दिवशी माझे लग्न ठरले, लग्नाचा मुहूर्त ठरला. मला हाकलण्याची घाई दिसून येत होती. अखेर विना मंडपाशिवाय माझे लग्न लावले गेले.
लग्नाच्या एका महिन्यानंतर सासू, नवरा, सासरा या तिघांनी माझा छळ सुरू केला. कधी हुंडा दिला नाही, कधी तू काळी आहेस, कधी माझ्या शारीरिक भागांना नावे ठेवण्यापर्यंतची मजल सासऱ्यांची गेली. दोन महिन्यात बैलाला राबवणार नाहीत इतके मी राबले. काडी सारखी हाडकुडी आणि नव्हते त्यापेक्षा क्षीण दिसू लागले. सासरच्या व्यक्तींनी मला मारण्याचे प्रयत्न केले. मी आठ दिवस दवाखान्यात पडून होते. माझ्या नवऱ्याने मला मानसिक रुग्ण घोषित केले आणि मला सोडून दिले. लग्न तुटून घटस्फोट झाला होता.
केवळ तीन महिन्यात माझे आयुष्य होत्याचे नव्हते झाले. कशातच मन लागत नव्हते. माझ्या जीवनाचा खेळ खंडोबा झाला होता. या निराशेतून बाहेर येण्यासाठी मला घरातून आई व्यतिरिक्त कोणीही मदत केली नाही. एके दिवशी शाळेतील सरांना माझ्या आयुष्याबद्दल कळल्यावर ते घरी आले. त्यांनी मला उर्वरित शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केले. स्वावलंबन किती आवश्यक आहे ते आणि अशीच रिकामी राहशील तर आई वडील गेल्यानंतर तुला कोण सांभाळेल हे समजावले.
तुझ्यासारख्या अनेक स्त्रिया पुढे जाऊन कशा आदर्श ठरल्या हे सांगण्याची ती वेळ नव्हती तरी त्यांनी मला सिंधूताई सपकाळ यांच्याविषयी सांगितले. आपल्या सारखेच दुःख ऐकून स्वतः च्या मनाची पीडा हलकी होते असे म्हणतात. मी निराशेत असताना माझ्या लग्न झालेल्या मैत्रिणी मदतीला आल्या. त्यांनी निरंतर संवाद साधला जेणेकरून मला एकटे वाटू नये. मी त्या काळात भरपूर पुस्तके वाचली. माझ्या आयुष्यात जे का झाले गेले ते विसरणार तर नव्हते पण त्यातून बोध घेऊन पुढे जाण्यासाठी पुस्तकांनी आधार दिला. मला सर्वात मोठे पाठबळ माझ्या आत्याचे होते. ती माझ्या मनाची प्रत्येक बाब जाणून होती. मी घरी न राहता तालुक्याला आत्याच्या घरी गेले. बी ए चे उर्वरित शिक्षण सुरू केले. नंतर इतिहासामध्ये एम ए सुद्धा केले. एमपीएससी परीक्षांची तयारी सुरू केली. आयुष्याचा सर्व राग, अपमान मी अभ्यासात खर्ची केला. सेवा आणि विक्रीकर अधिकारी म्हणून रुजू झाले. चेहऱ्याने काळी आहे म्हणून माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा अधिकार कोणी दिला.
विदारक परिस्थिती झेललेल्या स्त्रीला आयुष्य सहन करण्यासाठीं असे वाटू शकते पण त्या परिस्थिती पार करून पुढे गेलेल्या महिलेला हे आयुष्य केवळ लढण्यासाठीच आहे कळते…तेव्हा निराशे च्या पलीकडे आशा आहे, आशेच्या पलीकडे तुमची स्वप्न आहेत त्या स्वप्नात तुमचे स्त्री जीवन आहे त्याचा शोध घ्या…