माझी बहीण या उन्हाळ्यात तिच्या मुलाला घेऊन गावी आली. ताई आली म्हटल्यावर आम्ही सगळेच खुश होतो कारण तिच्या मुलासोबत आम्हाला मनसोक्त खेळता येणार होते. आरव तीन वर्षांचा आहे. पण वयाच्या मानाने तो खूपच हुशार आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही आरवला घेऊन आमच्या बागेत निघालो तितक्यात ताईने आम्हाला अडवले. म्हणाली, "त्याला कुठे घेऊन जाऊ नकोस मला त्याचा अभ्यास घ्यायचा आहे." यावर आम्ही तिच्याकडे बघून हसलो. “अगं किती लहान आहे तो, त्याला शाळेत जाऊ देत; मग घे अभ्यास हवा तेवढा.” यावर ती आमच्यावर संतापली. "तुम्हाला काय कळतंय. आजकाल तर अडीच वर्षाच्या मुलाला सुद्धा प्ले ग्रुपमध्ये टाकतात. हा तर तीन वर्षांचा आहे. मला त्याला ढ बनवायचे नाही. आता पासूनच अभ्यास घेतला नाही तर तो इतर मुलांच्या तुलनेत मागे पडेल." तिचे हे विचार ऐकून खरं तर मला आरवची कींव आली.
आज आरव सारखी कितीतरी मुले आहेत जी केवळ पालकांच्या आग्रहाखातर लवकर शाळेत जातात. मुले लहान असतात. त्यांना तर शाळा, अभ्यास, शिक्षण या गोष्टींची काहीच माहिती नसते. आईने सांगितले शाळेत जायचे की निघाले, बाबानी सांगितले अभ्यासाला बस की बसायचे. मग मुलांच्या मनाचा विचार आपण आईवडील म्हणून करतो का हे पालकांना समजत नाही. मुले हुशार व्हावीत. त्यांनी पहिला नंबर काढावा ही अपेक्षा असते त्यात चुकीचे काहीच नाही. मात्र तुमच्या इच्छा मुलांवर लादल्याने त्यांची घुसमट होत नाही ना याकडे सुद्धा एकदा लक्ष द्या. ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९’ या अंतर्गत मुलांच्या शलेय शिक्षणाची सुरुवात वयाच्या सहाव्या वर्षापासून केली पाहिजे असा नियम आहे. या नियमामागे काहीतरी कारण नक्कीच असेल. पण आपण शिक्षणाच्या बाजारीकरणाला भुलून मुलांना भारी शाळेत टाकण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करतो. कारण काय तर आपले मूल मागे राहू नये.
यामुळे मुलांना त्यांच्या कोवळ्या आणि खेळण्याच्या वयात तुम्ही शिक्षणात गुंतवून टाकता. अशाने मुलांचे बालपणच हरवून जाते. हातात खेळणी घेऊन खेळण्याच्या वयात जर तुम्ही त्यांच्या हातात वही, पेन्सिल दिली तर मुलांना कसे आवडेल? मग मुले अभ्यास करत नाहीत म्हणून काही पालक तर त्यांच्यावर हात उगारतात. मुलांचे मन या वयात भिरभिरणाऱ्या पक्ष्यांसारखे असते. त्यांना बागडायचे असते. स्वछंदी खेळायचे असते. त्यामुळे त्यांचे अभ्यासात मन रमत नाही. शाळेत शिक्षकांनी आणि घरी आईवडिलांनी अभ्यासासाठी दिलेला ओरडा मुलांच्या मनावर घाव करतो. त्यामुळे त्यांना अभ्यासाचाच तिटकारा येऊ लागतो. याचा परिमाण नकळतपणे मुलांच्या शिक्षणावर होतो. मुले मनापासून अभ्यास करत नाहीत. म्हणून त्यांना परीक्षेत कमी गुण मिळतात. मग ज्या गोष्टीसाठी तुम्ही मुलांना लवकर शाळेत घालता ते तुमचं उद्दिष्टच फोल ठरून जाते.
उमलत्या वयात मुलांना ज्या कारणासाठी अभ्यासाला जुंपलं जातं त्या गोष्टी त्याला लहानपणी खूप चांगल्या पद्धतीने शिकता येतात. उदा. मित्रांमध्ये मिळून मिसळून राहणे, एकमेकांना मदत करणे, आपल्या टीमचं नेतृत्व करणे, निर्णय घेणे, आपल्यात आवश्यक बदल करणे, कोण कसा आहे ते ओळखणे, रागावलेल्यांची समजूत काढणे, केलेल्या चुकीची माफी मागणे अशा अनेक गोष्टी मुलं खेळताना शिकतात. वयाच्या ६ वर्षांपर्यंत असा शारीरिक आणि बौद्धिक पाया तयार झाला की मुलं शाळेतील आव्हानं पेलायला तयार झालेली असतात. पण लवकर शाळेत घातल्याने या सहज शिक्षणावर बंधनं येतात.
लवकर शाळेत घातल्याने मूल घरातील मावशी, मामा, आजी,आजोबा, काका, काकू, आत्या अशी कित्येक नाती त्याला आपलीशी वाटतच नाहीत कारण मुलांचा त्यांच्याशी बॉण्डच निर्माण झालेला नसतो. आजकाल तर मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या देखील हॉबी क्लासेसमध्ये जातात. मग मामाच्या गावाला मुले जाणार कधी? मामाची मुलं सुद्धा हॉबी क्लासमध्ये असतात. मग ते एकत्र बालपण कधी एन्जॉय करणार? त्यामुळे हा बॉण्ड तयार होतच नाही.
काही मुले तर सतत अभ्यास करून तणावात देखील जाऊ शकतात. याचे पुढील आयुष्यात सुद्धा परिणाम होऊ शकतात. तो अबोल किंवा भांडखोर काहीही होऊ शकतो. असे मारून मुटकून लवकर शाळेत घालून मुले हुशार होत नसतात. तर त्यासाठी मुलांच्या मनात शिक्षणाबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी लागते. जेव्हा मुलांना शाळेत जाणे आणि अभ्यास करणे हवेहवेसे वाटू लागेल तेव्हा मुले त्यांची प्रगती निश्चितच करतील. त्यामुळे मुलांना लवकर शाळेत घालून त्यांचं बालपण त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका. तुम्हाला या विषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.