जाणून घेऊया आजच्या दिवसाचे महत्त्व
जागतिक कुटुंब दिवस:
कुटुंबाचे महत्त्व लक्षात घेऊन भावना, शांतता, विचारांची देवाणघेवाण करणारा नेमका दिवस असावा, म्हणून संयुक्त राष्ट्रांनी जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले. १५ मे १९९४ रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात १४० देशांनी कुटुंब दिवस साजरा करण्यासाठी पाठिंबा दर्शवला. वसुधैव कुटुंबकम, हे विश्वचि माझे घर, ही भारतीय संस्कृती आहे आणि आता संपूर्ण जगात या संस्कृतीचं महत्त्व वाढत आहे.
जन्म / जयंती / वाढदिवस
१८१७: समाजसुधारक देवेंद्रनाथ टागोर यांचा जन्म.
ब्राम्हो समाजाच्या संस्थापकांपैकी एक असलेले देवेंद्रनाथ यांनी बाविसाव्या वर्षी तत्वबोधिनी सभेची स्थापना केली. त्यांचा एकेश्वरवादावर विश्वास होता. प्रसिद्ध कवी रवींद्रनाथ टागोर हे त्यांचे चिरंजीव होते.
१९०७: क्रांतिकारक सुखदेव थापर यांचा जन्म.
थोर क्रांतिकारक सुखदेव हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनमध्ये जोडले गेले. जे. पी. सॉण्डर्स यांच्या हत्येच्या कटात त्यांचा सहभाग होता. दिल्ली येथे १९२८ मध्ये सर्व क्रांतिकारकांची गुप्त परिषदेत भगत सिंग, राम चंद्र व भगवती सिंग व्होरा यांच्याबरोबर त्यांनी लाहोरमध्ये नौजवान भारत सभेची स्थापना केली.
१९६७: अभिनेत्री माधुरी दिक्षीत यांचा जन्म.
आपल्या मोहक सौंदर्याने गेली अनेक वर्षे रसिकांना घायाळ करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षीत यांनी तेजाब, राजा, बेटा, दिल तो पागल है, दिल, साजन, हम आपके है कौन, अशा तुफान गाजलेल्या सिनेमांत काम केले. अलीकडे देढ इश्कीया या सिनेमातील त्यांच्या भूमिकेने समीक्षकांचीही वाहवा मिळवली. त्या उत्कृष्ट नृत्यांगना आहेत. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मृत्यू / पुण्यतिथी / निधन
१३५०: संत जनाबाई यांचे निधन.
विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा असे अभंग लिहिणाऱ्या संत कवयित्री जनाबाई या थोर विठ्ठल भक्त होत्या. त्यांनी एकूण ३५० अभंग लिहिले. नामदेवांना गुरू मानून त्यांनी वारकरी भक्तिचळवळीत सहभाग घेतला. त्यांची परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे समाधी आहे.
१७२९: मराठा साम्राज्याचे सरदार खंडेराव दाभाडे यांचे निधन.
तळेगाव घराण्यातील सरसेनापती खंडेराव दाभाडे हे शूर सरदार होते. छत्रपती राजाराम महाराजांना महाराष्ट्रातून जिंजीला पोहचवण्यात त्यांचे योगदान आहे. जिंजीला असताना राजाराम महाराजांचे अंगरक्षक म्हणून त्यांनी काम केले. १७०४ ते १७०७ मध्ये त्यांनी मुघल प्रदेशावर आक्रमणे केली.
१९९३: स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर प्रमुख के एम करिअप्पा यांचे निधन.
करिअप्पा यांनी १५ जानेवारी १९४९ रोजी तत्कालीन ब्रिटिश जनरल सर रॉय बुचर यांच्याकडून पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून सूत्रे स्वीकारली हा दिवस ‘लष्कर दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांना भारतीय लष्करातील फील्ड मार्शल हा सन्मान देऊन गौरविण्यात आले होते. अमेरिकन सरकारकडून “ऑर्डर ऑफ चीफ कमांडर ऑफ लेजन मेरिट” हा खिताब तसेच ब्रिटिश शासनाने त्यांचा “ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.