Bluepad | Bluepad
Bluepad
छत्रीकडून काय शिकावं ?
निलेश थोरात
निलेश थोरात
15th May, 2022

Share

माणूस हा नेहमी विविध सद्गुणांनी आणि चांगल्या लक्षणांनी परिपूर्ण असावा. त्याचे चांगले चारित्र्य हीच त्याची ओळख असावी. व्यक्तीमध्ये प्रेम, आपुलकी, माणूसकी, प्रामाणिकपणा, सहकार्य वृत्ती, अशी विविध चांगली लक्षणे असावीत. या लक्षणांपैकी 'सहकार्य वृत्ती' हा गुण आपल्याला छत्रीद्वारे शिकायला मिळू शकतो.
छत्री ही एक साधी वस्तू दिसत असली तरी आपल्या जीवनात तिला खूप महत्व आहे. तप्त चटाकेदार उन्हात आणि पावसाच्या कोसळणार्‍या रिपरिप सरींमध्ये छत्रीच आपले रक्षण करते. चटाकेदार उन्हात किंवा जोरदार पावसात स्वतःच्या शरीराचे रक्षण करायचे म्हटले कि आपल्याला सर्वप्रथम छत्रीच आठवते. कारण अशा परिस्थितीत छत्री खूप वर्षांपासून माणसासाठी एक आधार म्हणून काम करत आहे. माणसाचे चारित्र्य सुद्धा छत्रीसारखेच असले पाहिजे. जसे छत्री ऊन आणि पाऊस अशा संकटरुपी परिस्थितीत लोकांची मदत करते, त्यांना आधार देते आणि त्यांचे रक्षण करते, त्याचप्रमाणे माणसाने देखील इतरांच्या जीवनात येणार्‍या संकटापासून त्यांना वाचवले पाहिजे, त्यांचे रक्षण केले पाहिजे तसेच त्यांना आधार दिला पाहिजे. जसे कडक उन्हात आणि जोरदार पावसात रक्षणासाठी सर्वप्रथम आपल्याला छत्रीच आठवते, तसेच इतरांना त्यांच्या संकट काळात सर्वप्रथम आपणच आठवलो पाहिजे. यासाठी नेहमी इतरांची मदत करुन, इतरांना सहकार्य करुन आणि त्यांना आधार देऊन समाजात आपली एक वेगळी ओळख आपण निर्माण करायला हवी.
कडक ऊन आणि जोरदार पाऊस ह्या संकटरुपी परिस्थितीत आपले रक्षण करत असताना छत्री आपल्यावरील संकट स्वतःच्या अंगावर घेते. कारण ज्यावेळी आपण छत्री डोक्यावर घेतो त्यावेळी आपल्याला लागणारे उन्हाचे चटके किंवा पावसाचे जोरदार थेंब छत्रीला सहन करावे लागतात. यावरून माणसाला हेच शिकायला मिळते कि स्वतःला त्रास सहन करावा लागला तरी चालेल पण इतरांना संकटात एकटे सोडू नये, शक्य ती मदत आणि सहकार्य करत रहावे.
अति कडक उन्हात छत्रीचा वापर केल्यास छत्री उन्हाचे चटके खाऊन पूर्णपणे तापून जाते. तसेच जोरदार पावसात तर आपल्या रक्षणासाठी ती पूर्णपणे ओलिचिंब होऊन जाते. याच पद्धतीने समाजातील वंचित, शोषित, पीडित वर्गाच्या रक्षणार्थ स्वतःला पूर्णपणे झोकून दिले पाहिजे, मेहनतीने आपण ओलेचिंब झालो तरी गरजू व्यक्तीला आणि गरजू वर्गाला योग्यवेळी, यथाशक्ती,यथायोग्य मदत मागेपुढे न पाहता पुरवली पाहिजे.
छत्री ज्यावेळी लोकांचे उन्हापासून आणि पावसापासून रक्षण करत असते तेव्हा ती व्यक्तीचा धर्म, जात, पंथ, वंश, लिंग, विचार, चारित्र्य, भाषा, सामाजिक आणि आर्थिक उंची अशा कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही. तिची मदत ही सर्वांसाठी सारखीच असते. माणसाने देखील इतरांची मदत करत असताना ह्या गोष्टींचा विचार न करत निस्वार्थपणे इतरांना सहकार्य केले पाहिजे.
अशाप्रकारे संकटाच्या काळी इतरांच्या मदतीला आणि रक्षणाला धावणे, मदत आणि सहकार्य करत असताना स्वतःवर संकट आले तरी मागे न हटणे, मदत आणि सहकार्य करताना स्वतःला पूर्णपणे त्यात समर्पित करणे आणि मदत करताना समोरचा कोण व कसा आहे याचा विचार न करणे इत्यादी बहुमुल्य गोष्टी आपण छत्रीकडून शिकाव्यात.

186 

Share


निलेश थोरात
Written by
निलेश थोरात

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad