Bluepad | Bluepad
Bluepad
***!!***छत्रीचे आत्मवृत्त***!!***
श्री.ह.भ.प.प्रा.रामकृष्णादादा पाटील
श्री.ह.भ.प.प्रा.रामकृष्णादादा पाटील
15th May, 2022

Share

छत्रीचे आत्मवृत्त
उन्हाळा विशेष स्पर्धा
चला म्हटलं आज कोणाशी तरी संवाद साधावा... हो.. तुझ्याशीच मला बोलावेसे वाटते आहे... ओळखलं का मला? कोण आहे मी?.... मी इकडे तिकडे पाहू लागलो... अरे इकडे तिकडे काय शोधतो आहे? ही काय आहे मी इथे अडगळीत पडलेली....? नाही ओळखलं मला?... ऐन उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात तुला जी ची आठवण येते ती... हो तीच आहे मी छत्री... छत्री माझ्याशी बोलताना पाहून मला जरा हायसे झाले....
नॉन स्टॉप छत्री माझ्याशी बोलायला लागली...
तुम्ही मनुष्य जमात फार स्वार्थी आहे. प्रत्येक वेळेला तुम्ही कोणाचा तरी वापर करतात आणि फेकून देतात. तुम्हाला केलेल्या उपकाराची अजिबात जाणीव नाही. मी तर म्हणते की माणसाने एवढा कृतघ्न या पृथ्वीतलावर शोधून दुसरा प्राणी सापडणार नाही. माझाही तुम्ही असाच वापर करतात आणि फेकून देतात. जेव्हा तुम्हाला तातडीचे काम असते आणि बाहेर पाऊस सुरू झालेला असतो त्या वेळेला मात्र तुम्ही मला सात कोपऱ्यातून शोधून नक्की बाहेर काढतात. सर्वात महत्वाचे म्हणजे उन्हाळ्यात माझा एवढा वापर करतात की मी तपून तपून पार कोळशासारखी होऊन जाते.
तुमच्यामधील बहुतेक सर्व लोक असे आहेत की पाऊस असेल किंवा ऊन असेल त्यावेळेला माझी तुम्हाला आठवण येते तुम्ही तुमच्या संरक्षणासाठी बाहेर घेऊन जातात. मात्र हा पाऊस बंद झाला किंवा कडक ऊन तापणे कमी झाले की माझा तुम्हाला हमखास विसर पडल्याशिवाय राहत नाही. कोणी मला दुसऱ्याच्या घरी विसरुन येते, कोणी मला त्याच्या ऑफिसमध्ये विसरून येते, काही बहाद्दर तर मला चित्रपटगृहात सुद्धा विसरून येतात. मला सांगा तुम्ही तुमच्या सोबत तुमची पत्नी, तुमची मुले किंवा तुमचे प्रियजन सोबत असतील तर तुम्ही त्यांना असे विसरून येता का? नाही ना.... मग तुम्हाला घडोघडी माझाच कसा काय विसर पडतो बरे? म्हणून म्हटलं मी की तुम्ही मनुष्य जमात म्हणजे फार विसरभोळे आणि कृतघ्न असतात रे....
ते जाऊदे.... बोलता बोलता मी काय विसरले बघ... तुमचं अलीकडे ए फॉर एप्पल आला ना... तर पूर्वी शाळेत गुरुजी ज्या वेळेला मुलांना बाराखडीचा आणि एक-दोन चा श्री गणेशा शिकवायचे त्या वेळेला माझा नक्की उल्लेख करायचे.. आठ.. छत्रीच्या काडीचे आठ... हो माझा पूर्वी जसा शोध लागला तसा एक सारखा आकार असायचा.... चालतानाही वृद्ध माणसाला माझा आधार व्हायचा... आठाच्या आकड्यासारखा माझा सरळ दांडा त्याला 8चा आकडा... त्याची केलेले नीट बांधणी वरतून काळाशार कपडा..... माझ्या छत्रछायेखाली जवळ जवळ चार-पाच जण तरी पावसात भिजत नसत.... काळ बदलला... मग मला सुद्धा काळाप्रमाणे बदलावे लागले.... कामाच्या वेळेला तुम्हाला मी काही जड व्हायचे नाही पण काम झाले की तुम्हाला माझी खूप अडचण व्हायची. मग मीच माझ्यात बदल केला आणि माझी फोल्डिंग व्हायला लागले. कशी रे तुम्ही माणसं... पुन्हा तुम्हाला माझ्यावर दोन घडीच्या छत्रीचा त्रास व्हायला लागला... मग मी तुमच्या लहानशा पर्समध्ये किंवा बॅगमध्ये मावेल अशा आकाराची होऊन गेले... आता तर विचारूच नका.. नाना रंगात आणि नाना ढंगात मी उपलब्ध आहे. तुम्ही सांगा फक्त दुकानदाराला तिथं मला छत्री कशी पाहिजे.... जशी म्हणाल तसे मी उपलब्ध आहे....
तुम्ही पाहिलं रस्त्यावर.... जे बिचारे हॉकर्स असतात ज्यांची रोजीरोटी रोजच्या मजुरीवर अवलंबून असते ते विक्रेते बिचारे कसे उन्हातानात बसलेले असतात... त्यांच्यासाठी मला मोठा आकार धारण करावा लागला. माझा गुणधर्मच आहे मी उन्हात तपत राहिल पण दुसऱ्यांना मात्र छाया पुरविल्या शिवाय राहणार नाही. तो लहान आहे की मोठा आहे याचा मी विचार कधीच करत नाही आणि माझा गुणधर्म कधी सोडत नाही. उन्हाळा असो की पावसाळा या हाकर्स ा माझा खूप आधार मिळतो. त्यांना बिचार्‍यांना कायम स्वरूपाचे दुकान उपलब्ध नाही मग मीच रस्त्यावर त्याच्यासाठी उन्हा-पावसात उभे राहते अन त्यांची रोजीरोटी चालवते....
या जगात मी जन्मालाही आले नव्हते त्या वेळेला माणसं पावसाळ्यात घोंगडी चा वापर करायचे. तेव्हा मला खूप अप्रूप वाटायचे. मग माझा जन्म झाला आणि हळू हळू ही घोंगडी या जगातून दिसेनाशी झाली. आता शेतकरी राजा आणि पशुपालन करणारे यांच्या डोक्यावर काय ती दिसते घोंगडी....
असो......
तर या निमित्ताने मी तुला आणखी एक माझ्या मनातली गोष्ट सांगू इच्छिते.....
या जगात आईसाहेब जिजाऊ राजे भोसले जन्माला आल्या आणि त्यांनी स्वराज्य निर्मितीचा संकल्प केला. जिजाऊ मा साहेबा मुळे त्यांचे पुत्र शिवाजीराजे भोसले आणि नातू संभाजी राजे भोसले यांनी या जगात असा काही महान पराक्रम केला की त्यांनी मला त्यांच्या डोक्यावर धारण केले आणि ते जगातील एकमेव अद्वितीय असे छत्रपती झाले. अशी माझी महती जगातील कोणालाही कळणार नाही. ज्यांनी मला त्याच्या शिरावर धारण केले तो तात्पुरता छत्रधारी होईल मात्र छत्रपती झाले ते माझे शिवराय आणि माझे शंभुराजे..... तू रे कसला असा पराक्रम करणार? तू नुसता माझा वापर करतो आणि मला विसरून जातो हे काय मला ठाऊक नाही काय?
मी छत्रीचे बोलणे ऐकून जरा टाळायला लागलो.
तेवढ्यात ती छत्री म्हणाले...
जा रे बाबा जा जा... तुझा मोबाईल ची वाट पाहतोय.... पण मी काय सांगितलं ते ध्यानात ठेव....
छत्री चे बोलणे थांबले आणि मी अंतर्मुख होवून माझ्या मनात विचार करायला लागलो की खरोखरच या जगामध्ये छत्रीप्रमाणे अशी काही लोक आहेत की जे स्वतः उन्हात उभे राहतात पावसात भिजतात पण दुसऱ्याला मात्र उन्हापासून आणि पावसापासून बचाव करतात. छत्री पासून मी काही शिकणार का नाही?
हो.... या छत्री पासून मला एक धडा नक्की शिकायला मिळाला. उन असो किंवा पाऊस माणसाने दुसऱ्यांना वाचवत रहावे. हाच खरा माणसाचा धर्म आहे आणि तो धर्म माणसाने माणूस म्हणून सोडू नये.

436 

Share


श्री.ह.भ.प.प्रा.रामकृष्णादादा पाटील
Written by
श्री.ह.भ.प.प्रा.रामकृष्णादादा पाटील

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad