माणूस हा अतिशय प्रगतशिल प्राणी आहे. तो आपल्या सुखसोयी साठी नवनवीन वस्तूंचा शोध लावत असतो. मानवी जीवनात अशीच ही छत्री आली असावी. छत्री ☂️ ही मानवी जीवनात अत्यंत उपयुक्त अशी वस्तू आहे. पावसाळ्याच्या दिवसात पावसापासून संरक्षण करण्यासाठी तिचा वापर होतो. उन्हाळ्यात छत्रीचा वापर खडक उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी केला जातो.अशाप्रकारे छत्री माणसाची सेवा करण्यासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करीत असते. माझ्या जीवनात छत्रीच अनन्यसाधारण महत्त्व आहे. छत्रीचे योगदान माझ्या जीवनात स्वर्गीय सुखाचा आनंद देणारे प्रसंग निर्माण करणारे आहे. छत्री माझ्या जीवनात देवदूत बनवूनच आली असावी असे मला वाटते. छत्रीने माझ्या जीवनामध्ये अनेक गोड प्रसंग निर्माण केलेले आहेत त्याचे वर्णन खाली देण्याचा मी प्रयत्न करतो आहे.
मी 1980 ला एच एस सी परीक्षा उत्तीर्ण झालो, विज्ञान विषय घेऊन. पदवी अभ्यासक्रमासाठी मी 1980 - 81 या शैक्षणिक सत्रासाठी मी नवजाबाई हितकारीनी महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे प्रवेश घेतला. ऑगस्ट महिन्यापासून कालेजला नियमित सूरूवात झाली होती. मी पहिल्या दिवशी पासूनच कॉलेजला जायला सुरुवात केली होती.त्यामुळे वर्गात येणाऱ्या इतर मुलांसोबत माझी लवकरच मैत्री झाली. कॉलेजचा पहिला वर्ष महाविद्यालयीन काळात जगण्याचा नवीनच अनुभव, आम्ही तसे खेड्यातील त्यामुळे मौज मस्ती करणे आम्हाला जमले नाही. मी तसा मित्रांबरोबर मिळून मिसळून वागणारा मुलगा साधासुधा. त्यामुळे माझी इतर मुलांबरोबर चांगली पटत होती. कॉलेजमध्ये माझे जिवलग मित्र दोनच होते, तेव्हापासूनचे मित्रत्व आजही टिकून आहे, आजही आम्ही परस्परांच्या सुखदुःखात सहभागी होतो, आमची दुसरी पिढी म्हणजे आमची मुलं बाळ सुद्धा एकमेकांना ओळखतात ते सुद्धा परस्परांचे मित्र आहेत.
कॉलेजचा पहिलाच वर्ष , सप्टेंबर महिना सुरू झाला सप्टेंबर महिन्याच्या 11 तारखेला कॉलेजच्या छात्र संघाच्या निवडी संबंधी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. छात्र संघाच्या या निवडणुकीत मी उमेदवारी अर्ज सादर करावा, असे ठरले. मी उमेदवारी अर्ज भरला त्यात गुलाब छत्री आणि विमान अशी संभाव्य चित्र निवडणूक चिन्ह म्हणून दिली होती यामधून मला निवडणुकीसाठी छत्री हे बोधचिन्ह देण्यात आले होते अशाप्रकारे छत्री माझ्या जीवनात एक मार्गदर्शक म्हणून आले असे मला वाटते. कारणही तसेच आहे, छात्र संघाची निवडणूक ही माझ्या जीवनातील पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे निवडणुकीसंबंधी चे ज्ञान मला छत्री सोबतच प्राप्त झाले हा एक योगायोगच म्हणावा लागेल. हा छत्रीचा माझ्या जीवनातील प्रथम योगदान आहे.
अशाप्रकारे महाविद्यालयातील प्रथम वर्ष सुरू झाला आणि संपलाय शैक्षणिक सत्राच्या शेवटी परीक्षा झाल्या आणि मी त्या परीक्षेत चांगले गुण घेऊन फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण झालो.१९८२-८३ या या शैक्षणिक वर्षात माझा बी एस सी चा दुसरा वर्ष पूर्ण झाला. सेकंड इयर ला सुद्धा मी फर्स्ट क्लास मध्ये पास झालो.आता १९८३-८४ हे शैक्षणिक वर्ष म्हणजे महाविद्यालयाचा अंतिम वर्ष. यावर्षी आम्ही माझ्या दोन मित्रांसोबत लेक्चरर कॉलनी मध्ये रूम रूम भाड्याने घेतली. आम्ही एका रूम मध्ये तिघेजण राहत होतो. ऑगस्ट महिना आला महाविद्यालयाचे वर्ग नियमितपणे सुरू झाले.
एके दिवशी मी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घराच्या स्लॅबवर फिरत होतो. अचानक आकाश काळाभोर झाला, ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि थोड्याच वेळाने जोरदार पावसाची सुरुवात झाली. मी स्लॅब वर फिरत होतो आज पावसात चिंब भिजायचं असं ठरवलं होतं मी. आमच्या बाजूच्या घराच्या स्लॅबवर एक सुंदर युवती छत्री घेऊन आली.मी तीला पहिल्यांदाच पहात होतो. ती गोरी गोमटी , सडपातळ बांधा,पाच फुटांवर उंची असावी तीची, तीला पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडावं असंच रुप होतं तिचं . थोड्या वेळाने जोरदार वारा आला आणि जोरदार पाऊस सुरू झाला.जोरदार हवेच्या झोतिबरोबर ती छत्री तिच्या हातातून सुटली, आणि आमच्या स्लॅब वर उडत आली.हाही एक योगायोगच म्हणावा लागेल.आता मुसळधार पाऊस कोसळत होते.पाऊसाने ती नखशिखांत भिजली.पावसात भिजल्या नंतर ती अतिशय नयनमनोहर दिसत होती.तिचं ते रुप आजही माझ्या हृदयात घर करून बसलेलं आहे.ते मी कधीच विसरू शकणार नाही.थोडया वेळानी पाऊस थांबला मी स्लॅब वरून खाली उतरलो, आणि ती छत्री त्यांच्या घरी नेऊन दिली. तेव्हा तीही समोर आली,मॅडमनी त्या युवतीचा परिचय करून दिला.ती मॅडमच्या बहिणीची मुलगी होती , तिचं नाव वनिता ,तीने आमच्या च महाविद्यालयात बी.एस.सी प्रथम वर्षाला प्रवेश घेतला होता. यादिवशी पासून माझी वनिता बरोबर चांगलीच मैत्री जमली होती. आम्ही दररोज स्लॅबवर यायचो परस्पर नजरानजर व्हायची. इशाऱ्या नीच हाय हॅलो करुन आम्ही आप-आपल्या कामाला लागायचो . अशाप्रकारे छत्रीचे माझ्या जीवनातील हे दुसरे योगदान या योगदानाची मला जीवनभर आठवण राहील.
काँलेजचे दिवस संपले, परिक्षा आटोपल्यानंतर आम्ही दोघेही परस्परांचा निरोप घेऊन आप-आपल्या गावाकडे परतलो.तेव्हापासून आजपावेतो आम्हा परस्परांची भेट होऊ शकली नाही.तत्कालीन परिस्थितीत मोबाईची सोय नव्हतीच फक्त लॅडलाईनवरून वार्तालाप होऊ शकत होता . ही आम्हां दोघांच्या दृष्टीने वाईटच घटना म्हणावे लागेल. आम्ही दोघेही गरीब कुटुंबातील असल्याने आमच्या घरी टेलीफोनची सोय नव्हतीच.त्यामुळे कालेजजीवन संपल्यानंतर कधी वार्तालाप करण्याचा किंवा प्रत्यक्ष भेटण्याचा प्रसंग आमच्या जीवनात कधी आलाच नाही. बरं पत्राच्या माध्यमातून भेटावे म्हटले तर दोघांच्याही दृष्टीने धोक्याची घंटी.मग दुरची रामराम बरी.वेळ कुणासाठीही थांबत नाही म्हणतात , तेच खरं ठरलं आम्हा दोघांच्याही जीवनात.तेलही गेलं आणि तुपही गेलं,हाती आलं धुपाटणे.असेच म्हणावे लागेल.जीवनात कधीतरी अकस्मात भेट होऊ दे, इश्वरकृपेणी भविष्यात अशी परिस्थिती निर्माण व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करू या,तेवढंच आपल्या हातात आहे.
अशाप्रकारे प्रेम जूळलं अन् बहरलं मात्र असे असले तरी , ह्या छत्री पासून सुरू झालेली प्रेम कहाणी आमच्या जीवनभर हृदयात घर करून आहे.त्या आठवणी जीवनातील अतुल्य ठेवा आहे.
छत्री चे विविध रुप आढळतात. १९८० घ्या दशकात फक्त काळ्या रंगाच्याच छत्र्या दिसायच्या.
नंतरच्या टप्यात विविध रंगांच्या छटा असलेल्या छत्र्या बाजारात उपलब्ध झाल्या.विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात छत्रीच्या रुपरंगात बदल न झाला तर कसं चालेल...?
कालांतराने जवळपास १९९०ते २००० पर्यंत बाजारात फोल्डिंग च्या छत्र्या बाजारात आल्या.आजकाल बाजारात विविध रंगीबेरंगी आणि विविध रुपातील छत्र्या बाजारात उपलब्ध आहेत.छत्री म्हणजे सेवाव्रती , उन्हाळा असो वा पावसाळा असो मानवाची सेवा करणे हीच तिची तपश्चर्या, आणि हेच तिचे कार्य आहे,असेच म्हणावे. व्रतस्त जीवन जगून मानवाची सेवा करत राहणे हेच तिचे कार्यक्षेत्र.