Bluepad | Bluepad
Bluepad
स्वातंत्र्य विचारांचे
काव्या धनंजय गगनग्रास
15th May, 2022

Share

राजाराम हा एक साधा गिरणी कामगार. रोजच्या वेळात गिरणीत जाणे, दिलेलं काम करणे आणि घरी येणे. घरात त्याची बायको व दोन मुले असा त्याचा परिवार होता. प्रकाश १२वर्षांचा तर दीपक १०वर्षांचा. घरची परिस्थिती काही फार चांगली नव्हती. त्यात राजाराम मिळालेला अर्धा पगार दारू पिण्यातच घालवत असे. दारू पिऊन आल्यावर मग घरी बायकोसोबत होणारी भांडणे, तिला शिवीगाळ करणे, मुलांवर रागावणे हे सर्व नेहमीच झालं होत. दोन्ही मुलं याच वातावरणात वाढली. यातूनच दोघांचे शिक्षण चालू होते. प्रकाशला मुळातच शिक्षणाची कमी आवड; त्यात घरची परिस्थिती अशी असल्याने त्याला सांगायला नेहमी एक कारण मिळायचे की कशी आमची परिस्थिती चांगली नाही. कसं मला सारखं adjust करावं लागत वगैरे. अशी कारण सांगतच त्याने कसेबसे १० पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व तो वडिलांच्या जागी नंतर गिरणीत कामाला लागला. त्यालाही बरीच व्यसन लागली होती.
दीपक मात्र याउलट होता. लहानपणापासून शिक्षणाची आवड. त्यात वडिलांचे वागणे, आईची होणारी घुसमट हे सर्व त्याला दिसत होते. त्याच वेळी त्याने ठरवले की खूप शिकायचे आणि सर्वांना सुखात ठेवायचे. त्याप्रमाणे त्याने खूप प्रयत्न करून यश मिळवले व शेवटी पदवीच्या परीक्षेत तो विद्यापीठात प्रथम आला. बक्षीस वितरण सोहळ्यात त्याला त्याच्या घरा विषयी, परिस्थितीविषयी प्रश्न विचारले. त्यातून असा प्रश्नही आला की एका घरात वाढून पण भावाने गिरणी कामगार व्हावे आणि तुम्ही विद्यापीठात नंबर काढावा अस कस झालं? यावर दीपकने खूप छान उत्तर दिले. " हे खरे आहे की आम्ही एका घरात वाढलो आमची परिस्थिती एक होती. परंतु एक गोष्ट वेगळी होती ती म्हणजे आमचे विचार, विचार करण्याची निवड. माझ्या भावाने प्रत्येक वेळी adjust करावे लागते असे सांगून कमी कष्ट करून आहे त्यात राहण्याची निवड केली आणि मी परिस्थितीवर मात करून, मेहनत करून पुढे जायची निवड केली आणि म्हणून मी आज इथे आहे.
आपण सर्वजण कधी ना कधीतरी अश्या परिस्थितीतून गेलेलो असतो. परंतु सतत कसे मी adjust करत आहे अस सांगून त्यातच अडकून राहायचे की त्यातून बाहेर पडून पुढे वाटचाल करायची याची निवड करण्याचे स्वातंत्र्य आपल्या विचारांमध्ये असते. कारण आपल्याकडून कोणतीही गोष्ट हिरावून घेतली जाऊ शकते. परंतु एखाद्या परिस्थितीमध्ये कसा विचार करावा हे कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. विचारांची निवड करण्याचे स्वातंत्र्य नेहमी अबाधित राहते.

190 

Share


Written by
काव्या धनंजय गगनग्रास

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad