माझी मैत्रीण रागिणी दोन वेळेस मोठ्या ब्रेकअप मधून गेलेली होती. एकत्रितपणे गेल्या सात ते आठ वर्षांमध्ये तिने दोन्ही नात्यात आपला वेळ आणि भावना गुंतवल्या होत्या. पण त्या एकाएकी तुटल्या. या दोन नात्यांमुळे तिने चांगली स्थळे हातची घालवली. वय वाढत होतं. आता तिला पुढच्या आयुष्याचं टेन्शन येऊ लागलं. एकाकीपणा वाढू लागला. कोणीतरी सोबत हवे ही भावना निर्माण झाल्यामुळे तिच्या एका मित्रासोबत ज्याने तिला पूर्वी मागणी घातली होती तिने रिलेशन सुरु केले. तिला त्याच्याबद्दल प्रेम नव्हते. मात्र आपला एकाकीपणा घालवण्यासाठी तिने फक्त स्वतःचा विचार करून त्या नात्यात स्वतःला बंदिस्त करून घेतले होते.
असे अनेक लोकांच्या बाबतीत होताना दिसते. आपल्याला समजून घेणारी व्यक्ती आपल्यासोबत असावी असे प्रत्येकालाच वाटते. कधी अशी व्यक्ती आयुष्यात येते. कधी नातं छान सुरु असताना ते एखाद्या कारणावरून तुटून जातं. मग जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती एका क्षणात आयुष्यातून दूर होते. हा टप्पा प्रत्येक व्यक्तीसाठी कठीण असतो. ब्रेकअपनंतर काहीजणांना एकटे राहणे अवघड होते. इतर मित्रमैत्रिणींकडे पाहून वाटते हे जसे त्यांच्या जोडीदारासोबत खुश आहेत तसे आपण सुद्धा नात्यात येऊन आपला एकाकीपणा दूर करावा. मग यामुळे मनात भावना, प्रेम नसतानाही काहीजण नात्यात येतात.
अशा नात्यामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला ते नातं केवळ एका ठराविक हेतूसाठी असतं. त्यातून तुम्हाला काही निष्पन्न करायचं नसतं किंवा अशा नात्यातून तुम्हाला अपेक्षा सुद्धा फार नसतात. पण यामुळे तुमचा जोडीदार दुखावला जाऊ शकतो. कारण अशा नात्यामध्ये तुम्ही तुम्हाला गरज वाटेल तेव्हा तुमचा वेळ देता. जेव्हा तुम्हाला भावनिक जवळीकतेची आवश्यकता असेल तेव्हा जोडीदाराशी प्रेमाने बोलता त्यांच्यासोबत वेळ घालवता. आणि जेव्हा तुमचा मूड ठीक होतो तेव्हा मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यात इतरांसोबत खुश राहता. मग जोडीदाराने त्याला बोलायचे असल्यावर फोन केले तर तुम्ही ते अक्षरशः टाळता. यामुळे त्याला वाईट वाटू लागते. तुम्ही असे करता कारण तुम्ही त्या व्यक्तीमध्ये गुंतलेले नसता.
जोडीदार कुठे आहे, काय करतोय, त्याच्या आयुष्यात कधी कोणती अडचण आली तरी देखील तुम्हाला फारसा फरक पडतच नाही. तुम्ही केवळ माणुसकीच्या नात्याने त्यांना मदत करू लागता. किंवा अशा परिस्थितीमध्येही जोडीदाराला एकटे सोडू शकता. त्यांच्या कुटुंबामध्ये तुम्ही येत जात नाही. त्यांच्या मित्र-मैत्रिणींशी ओळख करून घेत नाही. कारण तुम्हाला ते नातं पुढे घेऊन जायचं नसतं. केवळ एक भावनिक आधार आणि सोबत म्हणून अशा नात्यात तुम्ही राहता. मग या गोष्टी जर तुमच्यासोबत होत असतील तर तुम्ही देखील केवळ आपला एकाकीपणा दूर करायला रिलेशनमध्ये आहात हे समजून घ्या. स्वतःचे आणि सोबतच जोडीदाराचे नुकसान टाळण्यासाठी वेळीच मागे फिरा.