खडु.......
काळ्याच पांढरं करणारा, ज्ञानाचं भांडार खुलं करणारा एवढासा गडु, त्याचंच नाव खडु. 1801 साली अमेरिकेत जाॅर्ज बेराॅन ने गणितासाठी फळ्यावर खडु वापरल्याचा उल्लेख आढळतो. काळ्याच पांढरं करण्यात जरी याचा हातखंडा असला तरी काळा पैसा, पांढरा करणं याला जमणं शक्य वाटत नाही. कॅल्शियम कार्बोनेट हा मुख्य घटक वापरून खडुचं निर्माण केलं जातं. खडु मधे कॅल्शियम असल्याने बरेचदा विद्यार्थी खडु खात, आणी नंतर खडु खाल्ला म्हणून व्हिटॅमिन एम् म्हणजेच मार पण खात असत.
मुख्यत्वे शिक्षकच खडुचा वापर करतात. शिक्षक हा तसाही उपेक्षितच, सर्व प्रकारच्या कामांच्या बोझा घेऊन जगणारा, पण अत्यंत कमी पगारात आयुष्य काढणारा. खडूचा आणी खडूसपणाचा संबंध फारच जवळचा, शिक्षकांनी खडूस असणे की काळाची गरज आहे. शिक्षक जितका खडूस, तितकेच त्याचे विद्यार्थी यशस्वी, हीच तर शिक्षणाची गुरुकिल्ली होती.
वर्गात एखादा विद्यार्थी चुकून झोपलाच, तर खडूच्या तुकड्याचे मिसाईल हमखास पणे त्याच्या दिशेने येणारच. हे मिसाईल सहसा चुकत नसे, असे प्रक्षेपास्त्र झेलणारे पुढे, वेळीच बसलेल्या फटक्याने सावध होऊन मिसाईलमॅन म्हणून मिसाईल निर्मितीच्या क्षेत्रात आपलं योगदान देतात, तर काही सतत खडु खाणारे डुख खातात.
शिक्षकांच आणी विद्यार्थ्यांच नातं आरशासारखं. आरशात जशी उजवी बाजु डावी दिसते, तद्वतच शिक्षक काळ्यावर पांढरं तर विद्यार्थी पांढ-यावर काळं करतात.जे विद्यार्थी हा उपद्व्याप मन लाऊन करतात, तेच शिक्षकांचे लाडके असतात. आजकाल फळ्यांची जागा व्हाईट मार्कर बोर्डने घेतली व पर्यायाने खडू जाऊन विविधरंगी मार्कर पेन आलेत. यांच वैशिष्ट्य म्हणजे महत्वाच्या वेळी झटकल्याशिवाय यांचं न उमटणं. खडूची पांढरी धुळ नसल्याने हे वर्गाला अतीच स्वच्छ व चमकदार ठेवतात. काही शिक्षक तर पाॅवर पाॅईंट प्रझेंटेशनचा वापर करतात, खरंतर खडूफळा वापरणारे शिक्षकही पाॅवर पाॅईंटचाच वापर करतात. फक्त पाॅवर ज्ञानाची होती व पॉईंट्स फळ्यावर होते, असो.
पूर्वी खडूंचा वापर करून ताजमहाल किंवा तत्सम कलाकृती निर्माण केल्या जात, त्या कलाकृती विशेष करून, लग्नातील रूखवताची शोभा वाढवत.
आजकाल तर दात कोरण्यासारख्या सराईतपणे खडू कोरून त्यावर अत्यंत सुंदर नक्षीकाम करणारे कलाकारही आहेत.
खडु फळ्यावर शिकलेली आपली शेवटची पिढी, लाॅकडाउनने ऑनलाईन शिक्षणाचा पाया रचलाय, या पायावर उभी राहणारी ईमारत देखील खडूफळ्याच्या ईमारती इतकीच मजबूत राहो, अशी प्रभुचरणी ईच्छा.....
-चंद्रशेखर दातार