Bluepad | Bluepad
Bluepad
संत जनाबाई महाराज कोण होत्या?
दीपिका कुलकर्णी
14th May, 2022

Share

वारकरी संप्रदायात स्त्री संत देखील मोठ्या प्रमाणात दिसून येतात. स्वतःचा विठ्ठल स्वतः शोधणे हे वारकरी स्त्रियांनी करून दाखवले. त्यातलेच महत्वाचे नाव म्हणजे जनाबाई. स्त्रियांना देखील महाराज म्हणण्याची पद्धत वारकऱ्यांमध्ये आहे. तर आजच्या लेखामध्ये आपण जनाबाई महाराज ह्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. त्यांचे चरित्र, त्यांनी निर्माण केलेले साहित्य, त्यांनी सांगितलेले अध्यात्म ह्या लेखातून जाणून घेऊयात.

संत जनाबाई ह्या गंगाखेड गावातून आल्या होत्या. त्यांचे वडील विठ्ठलभक्त होते. पंढरपूरला आल्यानंतर जनाबाईंना त्यांच्या वडिलांनी दामाशेठ ह्यांच्याकडे दासी म्हणून ठेवले. अर्थात काही जणांच्या मते जनाबाई लहानपणी पंढरपुरात हरवल्या होत्या, तेव्हा त्यांना दामाशेठ ह्यांनी घरी आणले. हे दामाशेठ नामदेवांचे वडील. नामदेवांच्या जन्माच्या आधीपासून जनाबाई ह्यांच्या घरात होत्या. हाताला येईल ते काम त्या करायच्या. पण जसे नामदेव मोठे झाले आणि अभंग करू लागले, तशी जनाबाईंना परमार्थाची गोडी लागली. त्या देखील स्वतः अभंग रचना करू लागल्या.

जनाबाई ह्यांना नामदेवांनी अध्यात्माची गोडी लावली, त्यामुळे त्या स्वतःचा उल्लेख नाम्याची दासी असा करतात. अर्थात नामदेवांना त्यांनी गुरू मानले होते. स्वतःचा विठ्ठल सापडणे म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या भक्ती पद्धतीला मानलेच पाहिजे असे नाही. स्वतःच्या अनुभवातून विठ्ठल सापडण्याचा हा प्रवास असतो. आजवर जनाबाईंचे ३५० अभंग उपलब्ध झाले आहेत. ‘सकलसंतगाथा’ मध्ये ते वाचायला मिळतात. ह्या शिवाय हरिश्चंद्र आख्यान, प्रल्हाद आख्यान, बालक्रीडा, कृष्णजन्म, द्रौपदी स्वयंवर इत्यादी त्यांच्या रचना वाचायला मिळतात. त्यांच्या ह्या अभंगातून विठ्ठल महात्म्य, नाममहात्म्य, पंढरी महात्म्य, संत गौरव असे विषय दिसून येतात. तर चरित्र, ओव्या, भारुड, पाळणा, आरती, अभंग अशी माध्यमं वापरत त्यांनी अध्यात्मातल्या साहित्याची निर्मिती केली.


संत जनाबाई महाराज कोण होत्या?

जनाबाईंना जे अध्यात्म सांगितलं ते इतर संतांपेक्षा वेगळं नाहीये. कारण वारकरी संप्रदायातील सर्व संतांचे विचार सारखेच असतात, त्यात कुठलाच भेद दिसत नाही. मात्र ते सांगण्याची पद्धत वेगळी असते आणि जनाबाईंची पद्धत देखील वेगळी होती. ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली व नंतर नामदेव उत्तर भारतात तीर्थयात्रेसाठी गेले. तेव्हा जनाबाईंनी महाराष्ट्रातल्या अध्यात्माची धुरा सांभाळली. "डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी," म्हणत जनाबाई ह्यांनी स्त्री सुद्धा तितक्याच ताकदीचे काम करू शकते हे दाखवले. जनाबाई सर्व स्त्रियांना म्हणतात "स्त्री जन्म म्हणूनी मी न व्हावे उदास…" अध्यात्मात सर्वांनाच अधिकार आहे. एक गोष्ट विशेष आहे, ती म्हणजे नामदेवांच्या घरात तेरा लोक होते पण नामदेवांनंतर ‘संत’ ही पदवी केवळ जनाबाईंना मिळाली आहे. दासी म्हणून राहणाऱ्या जनाबाईंना खरोखरच विठ्ठल भक्तीचे वेड लागले होते हे ह्यातून दिसते.

जनाबाई सतत देवाचे नाव घ्यायच्या "दळिता कांडीता तुज गाईन अनंता," म्हणत त्यांनी जात्यावरचे अभंग रचले. विठू माझा लेकुरवाळा हा प्रसिद्ध अभंग देखील जनाबाईंचा आहे. विठ्ठल जनाबाईंना भेटायला येतो हे सर्वांना माहिती आहे. पण हा विठ्ठल कोणता तर आत्मरुप विठ्ठल कामावेळी जागृत होतो. ती आनंदाची अनुभूती काम करताना निर्माण होते. देवाचे नाव घेतले की तो जणू आपल्या सोबत आहे असे वाटते. म्हणूनच कर्मापासून मुक्त न होता त्या कर्माच्या थकव्यापासून विठ्ठल आम्हाला मुक्ती देतो असे जनाबाई म्हणायच्या. "झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी। पाटी घेऊनियां शिरीं । नेऊनियां टाकी दुरी।।" ह्यातून सुद्धा त्यांचे का विठ्ठलाच्या नामस्मरणाने हलके कसे होते हेच दिसते.

जनाबाई अध्यात्म सांगताना विठ्ठल कुठे आहे हे देखील सांगतात, "आपण वैकुंठीच नसे। भक्तापासीं जाण वसे।।" म्हणत त्यांनी भगवंताचा पत्ताच दिला आहे. कधी कधी जनाबाई चिडल्या की त्या देवालाच शिव्या घालायच्या, "अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या। तुझी रांड रंडकी झाली। जन्माला सावित्री चुडा ल्याली।।" ह्या ओव्या नीट वाचल्या तर समजेल ह्या शिव्या नाही तर अध्यात्मच आहे. मूळ माया म्हणजे प्रकृती आणि तिचे लेकरू हा विठ्ठल आहे. पण अशी रचना करून त्यांनी भक्त आणि भगवंतामध्ये किती जवळीक आहे जे दाखवले. जनाबाईंनी लग्न केले नाही. पण अनेक अभंगात सासू, सासरा, दिर, नणंद ह्यांचे त्या उल्लेख करतात. हीच त्यांच्या अभंग रचनेतील गोडी आहे. एकंदरीत त्यांचे कार्य खूप मोठे आहे. असे म्हणतात की नामदेवांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हाच जनाबाईंनी सुद्धा समाधी घेतली.
जनाबाईंचे अभंग वाचले की भक्त आपोआप देवाला हाक मारतात नि म्हणतात, "तू येरं बा विठ्ठला, तू येरं बा विठ्ठला…" भक्ती मार्गात ज्ञान देत करूणा दाखवणाऱ्या करुणामूर्ती जनाबाईंना दंडवत!

489 

Share


Written by
दीपिका कुलकर्णी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad