Bluepad | Bluepad
Bluepad
संशयी वृत्ती कशी कमी करावी?
S
Sanjay Gharphode
14th May, 2022

Share

माणूस म्हटलं, की त्याच्या स्वभावात राग, रुसवा, माया, जिव्हाळा या गोष्टी जशा येतात तसाच संशय सुद्धा येतोच. संशय येणे आणि सतत संशय घेणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असून संशय घेणे ही एक विकृत मनोवृत्ती आहे ज्याने फार काही चांगले कोणाचे होताना दिसत नाही उलट झाले तर यामुळे नुकसानच खूप होते. संशयाचा वळू एकदा का आयुष्यात घुसला की सगळ्याच प्रकारे त्या व्यक्तीचे आयुष्य उध्वस्त करून तो थांबतो. पण ही संशय घेण्याची नेमकी सवय का लागते, याची कारणे काय आणि यावरचे उपाय काय असतील हे सगळंच तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा लेख वाचाच.

माझ्यासोबत काम करणारी एक सहकारी होती. ती आणि मी अगदी मिळूनच काम करायचो. दोघींची पोस्ट सारखीच असल्याने कामं सुद्धा थोडीफार प्रमाणात सारखी असायची. पण हिला दुसऱ्यांवर संशय घेण्याची भारी हौस. हौस नाही पण ती तिची सवय झाली आणि नंतर नंतर तर हे तिच्या स्वभावातूनच जाणवायला लागलं. एकदा तिच्याकडून कामात काहीतरी चूक झाली आणि तिला बॉसने केबिनमध्ये बोलवून सुनावलं. ती केबिनमध्ये जायच्या अगोदरच मी जाऊन आले होते त्यामुळे तिला वाटलं मीच चहाडी केली. म्हणून तिने माझ्याशी वाद घातला. शिवाय जर ऑफिसमध्ये सहजच कोणी हसलं किंवा ग्रुप करून बोलत असतील तर तिला सतत हे माझ्याबद्दल बोलत असतील, माझी चेष्टा करत असतील असा संशय यायचा. तिच्या या असल्या संशयी स्वभावामुळे कोणी तिच्याशी बोलत नव्हतं. सगळेच तिच्यापासून अंतर ठेवूनच वागायचे.
साधारणपणे असे अनुभव थोड्याफार फरकाने सगळ्यांनाच येत असतात. मात्र इथे महत्वाचं काय आहे तर ही सवय कशी लागते किंवा संशयी वृत्ती होण्यामागे नेमकी कारणे काय असू शकतात. तर ती कारणे पुढीलप्रमाणे-

१. लहानपणी कामाच्या व्यापात जर आईवडिलांचे आपल्याकडे फारसे लक्ष नाहीये आणि आपल्यापेक्षा जास्त प्रेम इतर भावंडांना मिळत आहे हे असे वाटू लागलं की स्वभाव संशयी होण्याची सुरूवात होते.

२. संशय हा एक मानसिक आजार आहे. आजाराचे संक्रमण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होते. त्यामुळे जर घरात कोणाचा संशयी स्वभाव असेल तर तो आपल्यातही उतरतो.

३. जर हव्या त्या वेळी आपली इच्छा, भावना पूर्ण झाली नाही, त्यावर बंधने, मर्यादा लादल्या गेल्या तरी सुद्धा संशय बळावतो.

४. इतरांसोबत मिळून मिसळून न राहिल्याने, सतत एकटे राहिल्याने तसेच अतिसुरक्षित वातावरणात राहिल्याने सुद्धा संशयी वृत्ती वाढते.

संशयी वृत्ती कशी कमी करावी?

असं जरी असलं तरी घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. संशय घेण्याच्या वृत्तीवर देखील उपचार आहेत ज्याचा उपयोग करून आपण हा आजार बरा करू शकतो.

१. सगळ्यात आधी संशय घेणारी व्यक्ती नेमकी कोणत्या गोष्टीबाबत संशय घेते, का संशय घेते याची कारणे शोधून उपचार ठरवायला हवेत.

२. ध्यानधारणा आणि स्वतःवर लक्ष केंद्रीत केल्याने देखील या समस्येचा सामना करून त्यावर विजय मिळवता येऊ शकतो.

३. मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्याने REBT म्हणजेच (Rational Emotive Behaviour Therapy) आणि CBT म्हणजेच (Cognitive Behavioural Therapy) या उपचार तंत्राचा वापर करू शकतो. (हे काय आहे जाणून घेण्यासाठी लिंक पाहा -https://www.verywellmind.com/rational-emotive-behavior-therapy-2796000
https://www.healthline.com/health/rational-emotive-behavior-therapy

४. त्याचप्रमाणे मन शांत, शाबूत ठेवून मनोविश्लेषण तंत्राचा देखील वापर करून यावर मात करता येऊ शकते.

माझ्या मते, हा असा संशय घेणारा एक तरी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असेलच. सतत संशय घेतोय म्हणून त्याच्यावर रागवण्यापेक्षा त्याला समजून घेऊन त्याची परिस्थिती सुधारायला मदत केली तर त्याचे आणि त्याच्यायोगे आपलेही आयुष्य चांगले होऊ शकते. तेव्हा आजचा हा लेख तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर या सगळ्याच गोष्टीवर विचार करा आणि तुमचा व इतरांचा संशयाचा आजार कमी करण्यासाठी प्रयत्न करा.

538 

Share


S
Written by
Sanjay Gharphode

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad