गेल्या आठवड्यात एका मित्राकडे गेलो होतो. घरी कंटाळा आल्यामुळे त्यांच्या इथेच चार दिवस रहाण्याच्याच बेताने गेलेलो. त्यांच्या अंगणातल्या नळावर काही लोक पाणी भरायला येत असायचे. यापूर्वी त्यांच्या इथे मी या लोकाना कधी पाहिले नव्हते. त्यांचे पोषाख देखील वेगळे होते, त्यामुळे ती मंडळी स्थानिक नव्हती हे स्पष्ट होते. त्यात मला मित्राच्या वडिलांची एक गोष्ट विचित्र वाटायची. ती म्हणजे ते जेव्हा अंगणातील नळावर काम करत असताना ते लोक आले तर आपलं काम थांबवून त्यांना पाणी भरायला द्यायचे. काकांच्या वेळेचा खोळंबा होत असलेले मला दिसायचे.
त्यांचे हे वर्तन पाहून मी त्यांना विचारले, 'काका, ते लोक आल्यावर तुमचं झाडांना पाणी द्यायचं काम अर्धवट सोडून त्यांना का आधी पाणी भरायला देता? ते थांबतील की तुमचं काम पूर्ण होईपर्यंत.'
'तू म्हणतोस ते ठीक आहे, पण खरा धर्म कोणता?' काकांनी विचारले.
'म्हणजे? मला नाही समजले, आणि इथे धर्माचं काय मधेच? नळ तर तुमच्या मालकीचा आहे ना? मग तुमचा अधिकार आहे ना आधी त्यावर?' मी म्हणालो.
'आपण प्राधान्यक्रम विचारात घ्यायला हवा. पाण्यावर पहिला अधिकार कोणाचा? पिण्यासाठी पाणी नेणार्यांचा की बागेला शिंपण्यासाठी पाणी वापरणाऱ्यांचा? नळ भले माझ्या मालकीचा असेल, पण पाणी कोणाच्याच मालकीचे नसते. नैसर्गिक गोष्टीवर आपली मालकी आहे हा भ्रम आपण तोडला पाहिजे. भूकेलेल्याला भाकर आणि तहानलेल्याला पाणी देणे हाच तर आपला खरा धर्म आहे ना रे!', काका म्हणाले.
'हो काका, पटलं मला. पण हे लोक कोण?आणि ते इकडे कुठून आलेत? कुठे राहतात ते?',मी काकांना विचारले.
'जवळच एका पुलाचं काम सुरू आहे. तिथल्या कामासाठी आलेत ते. कन्स्ट्रक्शन वर्कर आहेत ते. आता तुला जर आणखी काही समजून घ्यायचा असेल तर मग त्यांनाच भेट आणि त्यांच्याकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न कर.'
काका असे म्हणून आपल्या कामाला लागले.
मला त्यांच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्या लोकांच्यासोबत त्यांची लहान मुलेदेखील यायची बाटल्या घेऊन पाणी भरायला. त्यांच्याकडे बघून मला वाईट वाटत होते की, त्यांचं शिकण्याच वय असून देखील त्यांना आपल्या आईबाबांसोबत इकडे खूप दूर यावं लागतं. मी त्या संध्याकाळी ते लोक जिथे रहात होते तिथे गेलो. ते काकांच्या घरी पाणी भरायला येत असल्याने मला त्यांनी बघितले होते. मी तिथे गेल्यावर मला एका आजीने बसायला दिले. 'ये दादा, बघ आमची परिस्थिती, ही आमची झोपडी,' ती म्हणाली.
मला ते ऐकून थोडस मनाला लागल्यासारख झालं. कारण आजूबाजूला नजर टाकल्यावर चार-पाच झोपड्या दिसत होत्या, लहान मुले खेळत होती. काही महिला ओढ्याच्या बाजूने जाणाऱ्या कालव्यातल्या पाण्यात कपडे धुत होत्या.
'दादा, आम्हाला राहायला आणखी कुठे कोण जागा देणार? कामाच्या ठिकाणाजवळ, जिथं पाण्याची सोय असते तिथं आम्ही रहातो,'आजी म्हणाल्या. आजींशी संवाद सुरू झाला आणि खूप काही गोष्टी समोर येऊ लागल्या. त्यांच्याकडून हे सगळं जाणून घेत असताना मला
'स्वातंत्र्याचा जमाखर्च मांडणार केव्हा,
जाब उंच प्रासादाना पुसणार केव्हा...'
या ओळी आठवल्या. त्यातील 'स्वातंत्र्याचा' या शब्दाऐवजी 'विकासाचा' हा शब्द घालावा असे वाटले.
"विकासाचा जमाखर्च मांडणार केव्हा,
जाब उंच प्रासादाना पुसणार केव्हा..."
सांगायचे म्हंटले तर ही मंडळी कर्नाटकातील विजापूरहून कामासाठी म्हणून येथे येतात. तिकडे मजुरी कमी असते म्हणून ती लोकं इकडे येत असतात. परंतु जेव्हा त्यांना तुम्हाला किती मजुरी गावी मिळते? असे विचारले त्यावर ते म्हणाले की, पुरुषांना ३०० रु. आणि महिलांना १५० रु. आणि इथे जोडीला १००० रु. मजुरी मिळते. ही मजुरी खूप आहे असे आपल्याला वाटेल. पण आपण या मजुरीपुरताच विचार न करता इतर बाबींकडे लक्ष दिल्यास या पगारामध्ये त्यांची ह्यूमन लाईफ कॉस्ट (अपघात, अपघाती मृत्यू, आरोग्याची जबाबदारी) हे कुठेच मोजले जात नाही. कामावर असताना काही अपघात घडला असेल तर काँट्रॅक्टर दवाखान्यात नेतो. पण दवाखान्यात ऍडमिट केल्यावर बाकी कुटुंबाला मात्र काम केल्याशिवाय पैसे मिळत नसतात. ज्यादिवशी काम नसते त्यादिवशीचा पगार नसतो. पण या लोकांविषयी एक प्रोपौगंडा मात्र मी लहानपणापासून ऐकत आलोय. तो म्हणजे ही लोक खूप श्रीमंत असतात. कारण विचारल्यावर असे ऐकण्यात आले होते की, ती लोक जो वेष परिधान करतात ते कपडे (खासकरून महिला जो वेष परिधान करतात, त्यांच्या त्या कपड्याना आरसे लावलेले असतात.) यावरून ते ठरवले जाते. पण खरंच ज्यांच्याजवळ पैसा आहे, ते अस जगणं जगातील का? कोणीही व्यक्ती पैसा असेल तर काटकसरीने तो वापरेल पण म्हणून तो आपल्या राहण्या-जेवणाची पण काटकसर करेल असे नाही ना! तो थोडासा का होईना व्यवस्थित जगण्याच्या प्रयत्नांत असेल. पण या लोकांची परिस्थिती पाहता यांच्या झोपड्या ह्या जिथे पाण्याची सोय असेल तिथे तयार केल्या जातात. जेवण शिजवण्यासाठी जळणाची सोय त्यांची त्यांनाच करावी लागते. गॅस वापरण्याच्या जमान्यात स्वयंपाकासाठी जळणाची सोय करणे किती त्रासाचे असते त्याची कल्पना करणेही अशक्य आहे. लाईटची सोय पण नाही. रात्रीच्या अंधाऱ्या काळोखात जंगली जनावरे, असण्याची शक्यता असते. लहान मुलांना जमिनीवरच झोपवले जाते. त्यांच्या कानात एखादा किडा गेला, त्यांना विंचू साप चावला तर.... कसे शांत झोपत असतील ते? हा प्रश्न पडायला लागला. त्यांचा विचार करत असताना, आपण सुरक्षित घरात पण असुरक्षिततेच्या गर्तेत पडलेलो असतो. आपल्या घरात न चावणाऱ्या मुंग्या आल्या तरी आपण किती गोंधळ आणि घाबरून जात असतो. पण आमच्या तुलनेत पाहायला गेलं तर त्यांच्या पाण्याचा, निवाऱ्याचा आणि आरोग्याचा प्रश्न हा खूपच गंभीर आहे.
आजीने आणखी एक अनुभव सांगितला. पहिल्या दिवशी जेव्हा ते पाण्यासाठी एका घराच्या इथं गेले तेव्हा तिथल्या लोकांनी त्यांना पाणी न देताच हाकलून लावले. म्हणून ते लोक माझ्या मित्राच्या घरी पाणी भरायला यायला लागले. काकांनी त्यांना आपल्या इथे पाणी भरण्याची परवानगी दिली होती. मुलांकडे नजर जात असताना, या लहान मुलांचं शिक्षण अर्धवट टाकून त्या मुलांना इथे घेऊन यावे लागते. इथे कुठेही आपली झोपडी मांडून रहावे लागते. आपल्या अन्नाची गरज स्वतःलाच भागवावी लागते. त्यांच्या गावच्या आणि इकडच्या जास्त पगारात जर त्या लोकांचा हिशोब बघायला गेलो तर, त्यांच्या गावात एका जोडीला मिळणारे ४५०/- रुपये आणि इकडे मिळणारे जोडीला १०००/- ही खूप वाटली तरी गावात मात्र त्यांना ८ तासच काम करावे लागते. पण इथे मात्र त्या कामाला वेळ नाही. ते काम कधी पण उरकून टाकावे लागते. तसच बोलण्यातून एक गोष्ट कळली की, ते जेवढे कामाच्या ठिकाणच्या जवळ राहतात. तेवढं त्यांना जास्त राबवून घेतलं जातं. काही आजारपण झालेच तर त्यावर उपाययोजना करण्यासाठी कधीकधी दवाखान्यात जावे लागत. सर्व गरीबांना सरकारी दवाखान्यात जो अनुभव येतो तोच या मंडळीना पण वेळोवेळी येत असतो. त्यांचं जीवनमान वेगळं, ते कुठेही राहतात म्हणून त्यांचा तिरस्कार केला जातो. पण खरे बघायला गेलं तर तेथील जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील जे या कामगारांना कामासाठी म्हणून आणत असतात, त्यांची एक जबाबदारी असते की, त्यांच्या आरोग्य, निवारा यांची सोया करून देण्याची पण ही जबाबदारी ते सरळसरळ हात वर करून मोकळे होतात. मग ही लोक त्यांना लागणारे जे काही असेल ते (लाकूडफाटा, पाणी) दुसऱ्यांकडून मागून आणल्याशिवाय पर्याय नसतो त्यांना आणि कोणीच देत नसेल तर मग ते कोणाच्या तरी बागेत किंवा परसात जाऊन लाकूडफाटा गोळा करतात, तेव्हा आपणच त्यांना चोर म्हणून मोकळे होतो. ती 'जगण्यासाठीच जगत असतात, आपल्यासारखीच हाडामासाची माणसेच आहेत ती' त्यांना आपण माणुसकीने वागवणे हे आपल्या माणूसपणाचे लक्षण आहे. हो ना! काकांच्या माणुसकीच्या विचारांमुळे मी पण एक माणुसकीचा विचार करायला लागलो.
शाळेतून आतापर्यंत म्हणत आलेल्या 'भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.' या प्रतिज्ञेमधला अर्थ मी यांच्या कहाणीमध्ये शोधू लागलो. त्या प्रतिज्ञेमधला अर्थ फक्त पोरकटपणाचा असा न ठेवता, त्याचा व्यापकरीतीने एक कृतिशील विचार पण होणे ही आजच्या 'स्मार्ट' युगातली गरज आहे. सामाजिक बुद्धिमत्तेबरोबरच एक भावनिक बुद्धिमत्ता पण आपण जपली आणि आपल्या मध्ये रुजवली पाहिजे.