Bluepad | Bluepad
Bluepad
महागाईने सर्वसामान्यांची होरपळ!
निलेश थोरात
निलेश थोरात
14th May, 2022

Share

कोणताही देश त्याच्या प्रगतीवरुन ओळखला जातो. परंतु ही प्रगती साधत असताना प्रत्येक देशाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. ह्या समस्यांत मुख्यत्वे गरिबी, भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, यांचा समावेश होतो. त्यातल्या त्यात महागाईने तर सर्वसामान्य चांगलेच होरपळून निघतात. महागाई म्हणजे काळाच्या ओघात उपलब्ध पैशांत किंमतीत होणारी वाढ होय.
महागाईच्या समस्येचा विचार करण्यापूर्वी महागाई का उद्भवते हे आपल्याला माहित हवे. महागाईचे दोन मुख्य कारणे असतात. पहिले म्हणजे वस्तूंच्या पुरवठ्यात होणारी घट आणि दुसरे म्हणजे वस्तू खरेदी साठी वाढती मागणी. वस्तूंच्या पुरवठ्यात घट होण्याची सुद्धा अनेक कारणे असतात. त्यामध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीमालाचे होणारे नुकसान, शेतकरी किंवा कामगार यांचे विविध मागण्यांसाठी होणारे संप, आंदोलने इत्यादि, व्यापाऱ्यांनी केलेली मालाची साठवणूक ह्या गोष्टींचा समावेश होतो. तसेच वस्तूंच्या मागणीत वाढ होण्यामागे सुद्धा अनेक कारणे असतात. त्यामध्ये वाढती लोकसंख्या, लोकांचे उच्च राहणीमान, सरकारने विविध योजना आणि धोरणे यांकरिता गुंतवलेला अधिकचा पैसा यांचा समावेश होतो.
महागाईचे जसे विविध कारणे असतात तसेच त्याचे अनेक विपरित परिणाम असतात कि जे प्रामुख्याने सर्वसामान्यांवर होतात. महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट अर्थात आर्थिक अंदाजपत्रक कोलमडून जाते. महागाईमुळे सर्वसामान्यांना आपल्या गरजा पूर्ण करता येत नाही. विविध वस्तूंची खरेदी करुन स्वतःचे जीवन मजेत, आनंदात आणि सुखात व्यथित करावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु स्वतःकडील पैशांच्या तुलनेत वस्तूंच्या किंमती जास्त असल्याने सर्वसामान्यांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहतात. जीवनावश्यक वस्तू जसे कि इंधन, भाजीपाला, किराणा यांच्या महागाईने तर सर्वसामान्यांना कसाबसा आपला उदरनिर्वाह करावा लागतो. केवळ विविध वस्तूंच्या किंमती वाढणे म्हणजे महागाई असते असं नाही. तर विविध सेवा उपभोगण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागणे ही पण महागाईच आहे. महागाईमध्ये शिक्षण, आरोग्य सेवा, बँक सेवा, विमा,बांधकाम सेवा, वाहतूक सेवा,प्रसार माध्यमांच्या सेवा असे अनेक सेवा व्यवसाय सुद्धा महागतात. त्यामुळे सर्वसामान्यांना ह्या सेवा उपभोगण्यासाठी चांगल्या दर्जेदार ठिकाणी जाता येत नाही. उदाहरणार्थ शिक्षणासाठी सर्वसामान्य माणूस शहरातल्या, दर्जेदार आणि महागड्या शाळा -काॅलेजमध्ये प्रवास न घेता एखाद्या साध्या शाळा-काॅलेजला प्राधान्य देतो. जीवनावश्यक वस्तू आणि सेवा यांचाच उपभोग व्यवस्थित न घेता आल्याने चैनीच्या वस्तू खरेदी करणं तर खूप अशक्य गोष्ट असते. या महागाईमुळे सर्वसामान्याला स्वतःच्या गरजा कमी कराव्या लागतात. तसेच त्याला कमीत कमी वस्तूंत आणि कमी दर्जाच्या सेवांचा उपभोग घेत जगावे लागते. महागाईमुळे गरजा पूर्ण न झाल्याने काही सर्वसामान्य लोक कर्जबाजारी सुद्धा होतात.
अशाप्रकारे महागाईने सर्वसामान्य अगदी होरपळून जातात. ही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अनेक उपाय केले जाऊ शकतात. ज्या वस्तूंचा तुटवडा आहे त्यांचे अधिक उत्पादन व्हावे यासाठी शेतकरी आणि कामगार वर्गाला प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच विविध वस्तूंच्या उत्पादनावर आणि सेवांच्या उपभोगावर सरकारचे जास्तीत जास्त नियंत्रण हवे. त्याचप्रमाणे संकटाच्या काळी शेतकरी, कामगार, उद्योजक आणि व्यापारी यांना योग्य ते सहकार्य आणि मदत सरकार आणि विविध संस्थेने केली पाहिजे. त्याचप्रमाणे सरकारने आपल्या खर्चाचे व्यवस्थित नियोजन केले पाहिजे. त्याचप्रमाणे महागाईच्या काळात सर्वसामान्य होरपळून निघू नयेत यासाठी त्यांच्या हिताचे यथायोग्य निर्णय सरकारने घ्यायला हवे. प्रत्येक वेळी सरकार महागाई नियंत्रणात आणू शकेलच असे नाही परंतु त्यासाठी पूर्ण प्रयत्न मात्र केले जाऊ शकतात.
अशाप्रकारे महागाई ही सर्वसामान्यांसाठी खूप मोठे आव्हान आहे. त्याचे सर्वसामान्यांवर होणारे परिणाम भीषण आहेत. परंतु विविध उपाययोजना आणि धोरणे राबवून या समस्येवर मात करणे शक्य असते.

167 

Share


निलेश थोरात
Written by
निलेश थोरात

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad