मे महिना सुरू आहे, सूर्य आग ओकत आहे. देशातील अनेक भागात उष्णतेची लाट आली आहे. आणखी काही दिवस तरी तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटना नेहमी घडत असतात. त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. घरातमध्ये आग लागण्याचं कारण आणि बाहेर लागण्याचं कारण वेगळं असू शकतं. आग लागूच नये यासाठी आपण सजग राहणं गरजेचं आहे. घरात आग कशा लागतात, आग लागल्यावर काय उपाय करायला हवेत, याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे.
घरातल्या वस्तू कुठं आणि कशा ठेवाव्यात याबद्दलची अनभिज्ञता आणि निष्काळजीपणा कारणीभूत ठरू शकतो. स्वयंपाक घरातल्या गॅस सिलिंडरमुळे बहुतांश घरात आगीच्या घटना घडतात. स्वयंपाकघरात सिलिंडरमधून गॅसची गळती झाल्यानं, एखादं ज्वलनशील कापड किंवा वस्तू पेटलेल्या गॅसच्या संपर्कात आल्यास किंवा निष्काळजीपणा केल्यास आग लागू शकते. गॅस सिलिंडरला आग लागल्यानंतर भयानक परिस्थिती निर्माण होते. सिलिंडर फुटल्यानंतर संपूर्ण घराला आग लागते आणि त्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते.
आग कधीही आणि केव्हाही लागू शकते. परंतु भीषण उन्हाळ्यात म्हणजेच एप्रिल आणि मे महिन्यातच आगीच्या घटना जास्त लागतात. घर, हॉस्पिटल, ऑफिस, उंच इमारती, झोपडपट्ट्या इत्यादी भागात आगीच्या घटना घडतात. परंतु घरे वगळून बहुतांश ठिकाणी आग विझवण्याच्या सोयी असतात. घरात आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. घरात ठेवलेल्या सिलिंडरमुळे आग रौद्र रूप धारण करू शकते. त्यामुळे लोकांनी सतर्कता बाळगणं आवश्यक आहे. थोडं जागरूक राहून आगीच्या घटना रोखता येऊ शकतात. आगीच्या व्यवस्थापनाबद्दल थोडी व्यावहारिक माहिती असल्यास ती वाढण्यापासून रोखता येऊ शकते.
स्वयंपाकघरात पुरुष असो किंवा महिला, दोघांनाही काही बेसिक गोष्टी ठाऊक असणं आवश्यक आहे. स्वयंपाकघरात जेव्हा कधीही आग लागते, तेव्हा पेटलेल्या बर्नरच्या संपर्कात काही वस्तू आल्या तर त्या आग पकडू शकतात. किंवा गॅसच्या पाइपला आग लागून ती सिलिंडरपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळेच सिलिंडरमध्ये स्फोट होऊन आग पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा काही उपाय करू शकता येतात.
घरात आग लागल्यानंतर पुढील काही उपाय निश्चित परिणामकारक ठरू शकतात. सर्वात प्रथम सिलिंडर गळती होत असेल, तर त्वरित बंद करा आणि बाहेर जाऊन ते बदला. गॅस स्टोव्ह किंवा पाइपमध्ये आग लागल्यास गॅसचा नॉब बंद करा. त्यामुळे आग विझेल आणि सिलिंडरपर्यंत पोहोचणार नाही. पाइपवर आग लागली आणि ती वाढू लागली तर गॅसचा नॉब किंवा सिलिंडरचे रेग्युलेटर या दोन्हीपैकी एक बंद करा. आग पसरणार नाही.
गॅस गळती झाल्यामुळे सिलिंडरला आग लागली तर घाबरून जाऊ नका, सिलिंडर एकदम फुटणार नाही. एखादी सुती चादर किंवा जाड अंथरूण किंवा मोठा टॉवेल पाण्यात भिजवून त्वरित सिलिंडरला गुंडाळा. त्याने आग विझण्यास मदत होईल. घरात आग विझवण्यासाठी कोणतंही साधन असेल तर तेही वापरू शकता. गॅसच्या नॉबवर आग लागली असेल तर त्यावर त्वरित ओलं कापड टाकून द्या. सिलिंडरवर चादर गुंडाळताना रेग्युलेटर त्वरित बंद करा, आग विझेल. घरात नेहमी काही प्रमाणात पाणी साठवून ठेवा. स्वयंपाकघरात पेटता गॅस सोडून जाऊ नका. आग लागू नये याची काळजी आपण घेतच असतो. परंतु अनावधानाने दुर्घटना घडली, तर घरात केले जाणारे हे उपाय निश्चितच फायद्याचे ठरू शकतात.