अभिनेत्री केतकी चितळेचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
अभिनेत्री केतकी चितळे हे नाव अनेकदा तिच्या वादग्रस्त विधानांमुळे समोर येत असतं. आता पुन्हा याच कारणामुळे ती चर्चेत आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर तिने त्यांचं थेट नाव न घेता निशाणा साधला आहे. याबाबत तिने फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर सोशल मीडियावर केतकी चितळेवर टिकेचे वादळ उठलं आहे. या पोस्टचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष स्वप्निल नेटके यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने टाकलेल्या पोस्टमुळे राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना वाढत असून समाजात वाद निर्माण होण्यास अशा पोस्ट कारणीभूत ठरत असल्याचं म्हणणं अनेकांकडून मांडण्यात येत आहे. शिवाय ही पोस्ट शरद पवार यांची बदनामी, मानहानी करणारी असल्याने अनेकांनी केतकीच्या पोस्टचा निषेध केला आहे. या पोस्टला हजारो प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.
काय आहे पोस्ट?
तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक ll
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll
-Advocate Nitin Bhave
ही आहे फेसबूक वरची पोस्ट
---
ओवेसींनी कबरीवर फुलं वाहिल्याने पेटलं राजकारण
एआयएमआयएमचे तेलंगणाचे आमदार अकबरुद्दिन ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांनी खुलताबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. त्यांनी कबरीवर फुलं वाहिल्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. औरंगजेब हा स्वराज्याचा शत्रू होता. संभाजी महाराजांनाही औरंगजेबाने त्रास दिला. आपण इतिहास पाहिलं तर औरंगजेब हा किती क्रूर, हिंसक आणि किळसवाणा होता हे आपल्या लक्षात येतं. साम्राज्य हडपण्यासाठी त्याने स्वतःच्या सख्ख्या भावाचा शिरच्छेद केला. लोकांवर अत्याचार केले. त्याने हिंदू देवस्थळांची, मंदिरांची नासधूस केली. अशा औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणं हे निषेधाचं आहे. त्याच्यासमोर नतमस्तक होण्याची ओवेसीची हिंमतच कशी होते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने ओवेसींच्या या वागण्याचा निषेध केला आहे. कोणत्याही मुस्लिम घरात औरंगजेबासाठी धार्मिक क्रिया अर्पण केल्या जात नाहीत. त्याच्या कबरीसमोर गुडघेदेखील टेकले जात नाही. मग ओवेसी आणि जलील यांना ही कृती का करावी लागली असा सवाल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला आहे. या सगळ्यावर जलील यांनी “माझं काही चुकलं नाही. कारण दर्ग्याशेजारीच औरंगजेबाची कबर असल्याने त्याकडे दुर्लक्ष करणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही तिथे गेलो,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
--
दिल्लीत अग्नितांडव; २७ जणांचा मृत्यू
राजधानी दिल्लीच्या मुंडका भागात एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेत तब्बत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. ही तीन मजली इमारत व्यावसायिक कामासाठी वापरण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, अनेक कंपन्यांचे ऑफिस या इमारतीत होते. अचानक लागलेल्या या आगीने रौद्र रुप धारण केलं आणि अवघ्या काही क्षणात २७ लोकांना कवटाळलं. या घटनेची माहिती कळताच मुंडका पोलिसांनी, अग्निशामक विभागातील कर्मचाऱ्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली आणि इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी इमारतीच्या फ्लॅटच्या खिडक्यादेखील तोडल्या. या बचावकार्यात २७ लोकांचे मृतदेह बाहेर काढता आले. ही आग इतकी भीषण होती की ती विझवण्यासाठी आठ तासांपेक्षाही जास्त वेळ लागला. या घटनेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. या घटनेमुळे इमारतीच्या मालकांना ताब्यात घेत अटक करण्यात आली असून, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची सखोल चौकशीदेखील सुरु झाली आहे.