Bluepad | Bluepad
Bluepad
सृजनाचा- ग्रीष्म......
S
Supriya Inamdar
14th May, 2022

Share

सृजनाचा- ग्रीष्म......
सृजनाचा- ग्रीष्म......
हिवाळ्याचा अंमळ कैफ ल्यालेली सृष्टी, माघाची थंड शाल हळूच दूर सारते. गाली गुलजार बोचरा शिशिर,वसंत ऋतूची चाहूल लागताच, अलगद चोरपावलांनी नजरे पल्याड जातो. गारठ्याने शहारलेली धरा अलगद कूस बदलते. लालसर कोवळी चैत्रपालवी तोरण सजवून, वसुंधरा अलवार नजर- पापण्या उघडते. तेव्हा ओला गहिवर हिमबिंदूंनी सप्तरंगात न्हालेली किरणे, सृजनाचा आविष्कार घडवत असतात. रंगछटांचे माधुर्य प्राचीला अर्पून,सोनपावलांनी आलेली पहाट,नाजूक पावलांनी पृथ्वीवर अवतरते. वसंताची किमया लेऊन, ही रम्य सकाळ, गंध केशरी अत्तर मधुसुमनांनी सुगंध पसरवते.....
सृजन म्हणजेच नाविन्य.... असा वसंतकुंजी दरवळ , नव-नवलाईचे दर्शन रोज घडत असते. रातराणी, बहावांची झुंबरे दिवस-रात्र वाऱ्याशी रुणझुणतात. केतकी ,सुरंगी, मोगरा यांचे अत्तर -प्याले कुंजवनातून मनास मोहिनी घालतात.....
दवबिंदुंची नक्षत्र माळ सजवून, शुभ्र धुक्यास भूल पडते. राऊळीच्या गोपुरांना नादब्रह्मी जाग येते. वसंतराज ऋतूच्या स्वागता,वृक्षलतांची सृजनता बहरते.....
झुंजूमुंजू होताच भाळावर रवी केशर टीळा सजतो. मंद निरंजनी कैवल्य ज्योत पाजळतो. दिनक्रमाची नांदी होताच चैतन्याने दिवस उजाडतो. वृंदावनी धेनू हंबरते. वासरू वात्सल्ये पान्हा फुटतो. वेळूच्या बनांत अनिल सुखावतो. अवीट सुरावट छेडीत जातो. कदंब तरुच्या छायेखाली कृष्ण पावा स्मरतो.....
सृजन म्हणजे नवलाई.... ग्रीष्म ऋतुतील निसर्गाच्या कणाकणात नवलाई दिसते. प्रत्येक स्वरात सृजनता आहे इतकेच नाही तर, पक्षांची किलबिल ,भ्रमराचा गुंजारव, वाऱ्याची शीळ, समुद्राची गाज यांमध्ये स्वरमय नाद आहे.....
सुजन म्हणजेच नवनिर्मिती..... पानाफुलांची नवरंगी ,रंग रांगोळ्यांनी बहरलेली, ग्रीष्म ऋतुतील ही निसर्ग किमया, हा सृजनाचा आनंद या उन्हाळ्यातच मिळतो. निसर्गाच्या कुशीत काही दिवसांचा रंगोत्सव साजरा करण्यासाठी जणू स्वर्गच धरतीवर आला आहे की काय? असा गोड भास होतो....
शिशिर बोचरा
जरासा ओसरला
ऋतु हिरवा
जीव पालवला...
जुनी पानगळ
कूस बदलून
वसंताची नवलाई
आली बहरून...
चाफा, केवडा,मोगरा, बहावा
निशिगंध,गुलाब ,जाई, मारवा...
मधुमालती, गुलबक्षी
नभांगणावर सुंदर नक्षी....
अभ्र-तरल अवनी सृष्टी
मनुपक्षी जणू विहंगम दृष्टी...
लाल, गुलाबी, नितळ, निळा,
केशर ,धवल ,हरा ,जांभळा...
रंग संगती रंगांची पखरण
अनंत हस्ते निसर्गाची उधळण....
फुलांचे रंग अंगावर उधळत, भ्रमर मकरंद लुटत फुलांना अलगद छेडत असतो. ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्यात पशुपक्षी यांचा विणीचा हंगाम असतो. कोकिळेला आकर्षून घेण्यासाठी कोकीळ प्रणयसाद घालतो. वाऱ्याचे बोट धरून साजशृंगारात धरा विलासते. हे अमोघ आनंद तराणे, नवनिर्मितीच्या उल्हासाची बरसात घेऊन आलेले प्रेम जीव, प्रेम रंगी रंगून जातात. प्रेमीजीवांच्या एकांत क्षितिजावर दोन आत्मांचे मधुमिलन घडते.....
नवनिर्मितीचा, सृजनाचा अविष्कार हा सृष्टीचा नियम आहे. जुने लोप पावते म्हणूनच तर नूतनाची किमया घडते. अंधारा मागुन दिवस आणि दिवसामागून रात्र येते. एकाचा अस्ता-क्षणिक नव्याचा उदय होतो. पानाफुलात ,झाडा वेलींत ,पशुपक्षींत सृजनता दडलेली आहे....
तपतपलेल्या किरणांनी जेव्हा धरा करपते. उष्ण हवा दूर पसरते. भेगाळल्या भुईला पावसाची ओढ लागते, केवळ या उन्हामुळेच....
अशा धरणीच्या उदरामध्ये बिजांचे शाश्‍वत लेणे गर्भित होते. तेव्हा धरणीची तप्त काया,जल सरींनी भिजण्यासाठी आतुर होते. धरणीचे उष्ण श्वास जल-अभ्रांची याचना करतात. ग्रीष्म ऋतू ने वसुंधरेची काहिली होते. पुन्हा एकदा सृजनाच्या अमूर्त आनंदासाठी, हात उंचावून आर्तस्वराने धरणी जलमेघांना साद घालते. अशा वेळी वादळी वावटळ उठते. रानावनातून अक्राळ-विक्राळ घोंगावते. जेव्हा आलोट वादळाच्या उग्र बाहूंनी आभाळात कृष्णमेघ दाटून येतात; वर्षाऋतुची माया घनघोर जलधारांनी पृथ्वीवर बरसते. वसुंधरेच्या उदरातील शाश्वत बीजांना पुन्हा सृजनतेचा अंकुर फुटतो.....
बीज अंकुरे अंकुरे,
ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे
माळरानी खडकांत....
सुप्रिया इनामदार...
१४/५/२२

460 

Share


S
Written by
Supriya Inamdar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad