Bluepad | Bluepad
Bluepad
बायकांनो, बिचारेपणा सोडा, स्वतःसाठीही जगा!
N
Neha Yadav
14th May, 2022

Share


लग्नानंतर अचानक माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. सासू सासरे फार म्हातारे नव्हते पण तरी देखील स्वयंपाकघरापासून ते लाईटबीलपर्यंत सर्व काही मला पाहायला लागायचे. यामुळे मला नोकरी करता येत नव्हती. एमबीए झाले असून देखील गृहिणी म्हणून काम करण्याची वेळ माझ्यावर आली होती. एके दिवशी घरी चुलत नणंद आणि तिचा नवरा आला. त्यांनी मला माझ्या शिक्षणाविषयी विचारले. तेव्हा तिचा नवरा म्हणाला, "कितीतरी मुली घर सांभाळून नोकऱ्या करतात. करिअर करायची जिद्द मनात असेल तर तुला देखील हे जमू शकले असते." त्यांचे हे वाक्य माझ्या मनाला लागले. म्हणजे मलाच तडजोड करावी लागणार. मी नोकरी आणि घर याची सांगड घालू शकत नाही असे चित्र उभे झाले होते. यात दोष माझाच होता का? त्याक्षणी पहिल्यांदा मला माझ्या या परिस्थितीमुळे मी बिचारी असल्याचे जाणवले. रोज उठून काम करताना माझ्या मनात एकच गोष्ट यायची मी कमनशिबी आहे.

यामुळे काही दिवसांनी मी खूप आजारी पडले. माझ्यावर मानसिक ताण आला होता. डॉक्टरांनी विचारले तुम्ही कोणत्या गोष्टीचे टेन्शन घेता का? तेव्हा त्यांना काय उत्तर देऊ. मी सरळ नाही म्हणून मान डोलावली. पण माझ्या मनातील सल मलाच माहित होती. गेले चार दिवस मी हॉस्पिटलमध्ये असताना आणि घरी आल्यावर सुद्धा आठ दिवस आराम करताना घरातील कामे, स्वयंपाक, कोणतीही बिले अजिबात थांबली नव्हती. म्हणजे मी नसताना देखील घर चालत होते. मग मी उगाचच ताण का घेऊ असा विचार करून मी बिचारी या प्रतिमेतून स्वतःला बाहेर काढण्याचे ठरविले. माझ्यातील आत्मविश्वास जागृत झाला. बाहेर जाऊन नोकरी करता आली नाही तरी चालेल मात्र घरी बसून ऑनलाईन व्यापार मी करू शकते. असे ठरवल्यानंतर मी महिलांसाठी ज्वेलरी, मेकअप, कपडे यांचा बिझनेस सुरु केला. माझ्या या एका अनुभवावरून मी माझ्या पाहण्यातील अनेक बायकांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करू लागले.

बायकांनो, बिचारेपणा सोडा, स्वतःसाठीही जगा!

माझ्या आईच्या बाबतीत देखील असे व्हायचे, ती सुद्धा कधी ‘मला तुमच्यामुळे कधीच बाहेर पडता येत नाही. चार दिवस माहेरी जाता येत नाही’ असं म्हणून चिडायची आणि केविलवाण्या चेहऱ्याने पुन्हा कामाला हात लावायची. तेव्हा तिची घालमेल समजली नव्हती. आज मात्र स्वतःवरून इतर बायकांच्या जीवनात देखील हे प्रसंग येत असतील हे समजले. मुले झाल्यानंतर सुद्धा बायकांना आपल्या आवडीच्या गोष्टी करता येत नाहीत. त्यांना मग चौकटीत बांधल्यासारखे वाटू लागते. यामुळे आपण बिचारी असल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. बायकांना याचा मनोमन त्रास होऊ लागतो. तुम्ही मनात असताना देखील आनंदाने जगू शकत नाही. आपल्यात कर्तृत्व आहे हे माहीत असून देखील मग अशा बायका स्वतःसाठी चार पाऊले पुढे टाकत नाहीत. या गोष्टी होऊ द्यायच्या नसतील तर बायकांनी सर्वात आधी आपण बिचारे आहोत हे डोक्यातून काढून टाकावे.

मनात इच्छा असेल तर आपण काहीही करू शकतो हे लक्षात घ्या. तुम्हाला जर घरात किंवा त्याच त्या रुटीनमध्ये अडकून पडायचे नसेल तर त्यातून बाहेर येण्यासाठी स्वतः प्रयत्न करा. जबाबदारी झटकता येत नाही ना मग काही हरकत नाही. तुम्ही घर सांभाळून स्वतःसाठी वेळ काढा. कधी वीकेंडला सिनेमाला जाणे, शॉपिंग करणे, फिरायला जाणे असे करून तुम्ही तुमचे आयुष्य मनसोक्त जगू शकता. तुम्हाला तुमची मुले आणि नवरा हे करण्यासाठी कधीच अडवणार नाही. बायका मुलांना सगळ्या गोष्टी हातात देऊन स्वतःची सवय लावून घेतात ते आधी त्यांनी बंद करावे. मुले मोठी झाल्यावर त्यांना त्यांचे आयुष्य स्वतंत्रपणे जगण्याची सवय लावा. आपण उगाचच स्वतःला बिचारेपणाचे लेबल वेळोवेळी लावून घेतो. त्यामुळे बाई म्हणून जगताना इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल असे आत्मविश्वासाने जगा.

525 

Share


N
Written by
Neha Yadav

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad