विदुर महाभारतातील एक असं व्यक्तीमत्व ज्यांनी धार्मिकता आणि नितीमत्ता या मार्गावरुन वाटचाल केली. धृतराष्ट्र आणि पांडू यांचे ते सावत्र भाऊ, कौरव आणि पांडवांचे काका. विदुर यांचा जन्म एका दासीच्या पोटी झाला. परंतु त्यांनी अथक मेहनत घेऊन ज्ञान प्राप्त केले. महाभारतातील बुद्धिमान अर्थतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. जेव्हा कधी इतिहासात विदुराचा उल्लेख होतो त्यावेळी विदुर आणि धृतराष्ट्र यांच्यात जो संवाद झाला तो अनेकांना आठवतो. त्या विदुरनीताचा उपयोग जीवनात अनेक ठिकाणी केला जातो. विदुराने नेहमी नीतिमत्तेची बाजू घेतली. त्यामुळे तो नेहमी पांडवांची मर्जी राखत असे. हा विदुर पुर्वजन्मी कोण होता किंवा त्याच्या पुर्वजन्माची कथा तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाणून घेवूया.
(येथे https://www.bluepad.in/article?id=68432 विदुर नीती सविस्तरपणे वाचू शकता.)
मांडव्य नावाचा एक ऋषी होते. अत्यंत ज्ञानी, नीतिमान आणि तपस्वी होता. मांडव्य ऋषींचं मौनव्रत सुरु होतं. ते झाडाखाली बसून ध्यानधारणा करत होते. तेवढ्यात तिथे दरोडेखोर आले त्यांनी राजदरबारातून दागिने चोरले होते. राजांचे सैनिक या दरोडेखोरांचा पाठलाग करत होते. दरोडेखोरांनी मांडव्य ऋषींच्या आश्रमाचा आसरा घेतला आणि ते तिथे लपून बसले. राजाचे सैनिक मांडव्य ऋषींच्या आश्रमात पोहोचले त्यांनी मांडव्य ऋषींना दरोडेखोरांबद्दल विचारले पण मांडव्य ऋषींचे मौन व्रत सुरु असल्यामुळे ते काहीच बोलले नाहीत. सैनिकांनी हार मानली नाही ते मांडव्य ऋषींच्या आश्रमात पोहोचले आणि त्यांनी झडती घ्यायला सुरुवात केली. मांडव्य ऋषींच्या आश्रमात दरोडखोर आणि त्यांनी चोरलेले दागिने सापडले. शिपायांनी दरोडेखोरांना अटक केली त्याचबरोबर मांडव्य ऋषींवर संशय घेवून त्यांना शिपायी राजदरबारात घेऊन गेले.
त्या सर्वांना राजासमोर हजर करण्यात आले, राजाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. मांडव्य ऋषींना वधस्तंभवार चढविण्यात आले पण त्यांना फाशी लागतच नव्हती. फाशी देणारा (जल्लाद) त्यालाही आर्श्चय वाटलं कारण असं आजवर कधीच घडलं नव्हतं. मांडव्य ऋषी एक तपस्वी होते, त्यांनी ऋषी-मुनींना आवाहन केलं. वधस्तंभावर ते शांतपण बसले होते. फाशी देणारी व्यक्ती थकून गेली पण मांडव्य ऋषींना काहीही झाले नाही. जेव्हा ही गोष्ट राजाला समजली तेव्हा तो धावत आला, त्याला आपली चूक समजली. त्याने मांडव्य ऋषींना वधस्तंभावरुन खाली उतरविले आणि म्हणाला, ‘मुनीवर मला माफ करा, माझ्याकडून मोठी चूक झाली. मला शाप देऊ नका मी तुमची क्षमा मागतो. मांडव्य ऋषी हसले आणि त्यांनी राजाला कोणताही शाप दिला नाही. पण मी यमराजाला माफ करणार नाही कारण काहीही कारण नसताना मला मृत्यूदंडाची शिक्षा भोगावी लागलेली आहे.
तिथून मांडव्य ऋषी थेट यमाला भेटण्यासाठी आले. त्यांना पाहून यमराजाने त्यांना नमस्कार केला. मांडव्य ऋषी यमाला म्हणाले, ‘मला मृत्यूदंडाची शिक्षा का भोगावी लागली? मी कधीही कोणतंही पाप केलेलं नाही. मी कोणालाही दुखवलेलं नाही.’ तेव्हा यमराज म्हणाले, ‘मुनीवर तुम्ही लहान असताना गवताच्या काडीने एका किटकाला टोचले होते त्याचीच शिक्षा तुम्हाला मिळाली आहे.’ हे ऐकून मांडव्य ऋषी फार चिडले आणि यमाला म्हणाले, ‘तेव्हा मी लहान होतो. लहान वयात चांगलं काय आणि वाईट काय हे समजत नाही. एवढ्या छोट्या पापाबद्दल तू मला क्रूरपणे शिक्षा दिलीस. मी तुला शाप देतो की तू एका शूद्र स्त्रीचा मुलगा म्हणून जन्माला येशील. तुझे वडिल राजा असतील मात्र आई एक दासी असेल. तुझ्याकडे राजा होण्याचे सर्व गुण असतील पण दासीच्या पोटी जन्म घेतल्यामुळे तुला कधीच राजमुकुट धारण करता येणार नाही. तसेच मी ऋषी मांडव्य असे जाहिर करतो की चौदा वर्षांखालील कोणत्याही पापाने काहीही फरक पडणार नाही.’ मांडव्य ऋषींचा शाप खरा ठरला आणि यमराज यांनी विदुर म्हणून पृथ्वीवर जन्म घेतला.
हस्तिनापूरला वारस देण्यासाठी अंबिकेने आपल्या दासीला व्यासांकडे पाठविले. दासीने व्यासांची मनापासून सेवा केली आणि शृंगारपूर्ण अनुभवाने व्यास संतुष्ट झाले. व्यासांनी अंबिकेच्या दासीला ओळखले होतेच पण त्यांनी दासीला वरदान दिले, ‘यापुढे तुझे दास्यत्व संपलं. तुझ्या पोटी विख्यात धर्मात्मा, श्रेष्ठ प्रज्ञावंत जन्म घेईल.’ अशाप्राकरे दासीपुत्र विदुराचा जन्म झाला. या कथेवरून समजते विदुर हा पुर्वजन्मी यमराज होता आणि मांडव्य ऋषीच्या शापामुळे त्यांना विदुर म्हणून जन्म घ्यावा लागला. ही कथा तुम्हाल कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा.