मी कलेक्टर होण्यासाठी दिल्ली म्हणजे यूपीएससीच्या पवित्र तीर्थक्षेत्री गेलो होतो. तिथे क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या घरासमोरच एक मोठे उद्यान होते. उद्यानात माझ्यासारखेचं कलेक्टर होण्याचे स्वप्न घेऊन आलेले हुशार अवतार "तू आज जेवलीस?” “माझे तुझ्यावर प्रेम आहे!” “कलेक्टर झाल्यावर आपण मोठ्या गाडीतून फिरू" असे मुंगेरी लाल के हसीन सपने बघत बसायची. शरीराला व्यायामाची सवय राहावी म्हणून मी सुद्धा उद्यानात जाऊ लागलो. आणि तिथेच मला भेटले, पुलंच्या कथेतले पेस्तन काका. ही गंमत नेमकी काय आहे, हेच तुमच्यासमोर या लेखातून मांडतोय.
नेहमीप्रमाणे एका सकाळी सात वाजता उद्यानात गेलो होतो. सूर्यनमस्कार केल्यानंतर मी एकाजागी शांत बसलो. त्याच वेळेस एक साठ वर्षाचा मनुष्य कपाळी अष्टगंध लावून, पायजमा आणि टी-शर्ट अशा पेहरावात माझ्या जवळ येऊन थांबला आणि मोठ्याने हसण्याचे व्यायाम करू लागला. हा हा करत रावणासारखे हसत असताना मी त्यांना विचारले "आप ऐसे क्यों हस रहे है?" तेव्हा तो गृहस्थ मला म्हणाला, "तुम साठ साल के हो जाओगे ना पता चलेगा." पुढे बोलता बोलता मी महाराष्ट्रातून आहे समजताच तो व्यक्ती अगदीच बेभान झाला आणि उद्गारला "अरे आधी सांगायचा मुला, मी सुद्धा मराठी. मूळचा खान्देशचा. रेल्वेत येताना केळी खाल्ली का केळी. जळगाव सारखी केळी अख्ख्या भारतात नाहीत." मी केवळ होकार दिला. पुढे त्यांनी मला विचारलं, “इकडे दिल्लीत काय करतोयस?” मी प्रौढीत म्हणालो, आयएएस क्लासेससाठी आलो आहे.
त्यावर तो व्यक्ती भलताच फॉर्मात आला. मोठमोठ्याने हिंदीमध्ये बोलू लागला, काही मुलामुलींकडे बोट दाखवून म्हंटले "हे असले गंदे चाळे तू इथे येऊन करू नको. पढाई के नाम पर कुछभी चालते इथे. पण तू मला चांगला वाटतोयस, मेहनती वाटतोयस." असे म्हणत त्यांनी माझ्या पाठीवर शाबासकी म्हणून एक गुद्दा घातला. मी त्या व्यक्तीच्या कपाळावरील गंध पाहून म्हणालो, "सकाळी सकाळी मंदिरातून आलात वाटतं." त्यावर अगदी घसा खाकरून आणि जणू कुत्र्याला बोलवायचे आहे, असे चू चू चू आवाज काढून त्यांनी त्यांची अनुभवगीता माझ्या समोर मांडली. "अरे बेटा क्या बताऊ तेरे को, लय दारू प्यायचो मी. एका वेळेस तांब्याने दारू ढोसली.” पुढे ते एक मिनिट थांबले. एक श्वास घेऊ दे असे म्हणत त्यांना तेच कृत्रिम हसण्याची हुक्की आली. मान वर खाली करून हा हा हा हा हा असे रावणासारखे हसून ते परत जुन्या काळातील टीव्ही वर काही काळ मुंग्या येऊन टीव्ही जसा पूर्ववत व्हायचा तसे ते मूळ कथेकडे आले.
"आता मी कृष्ण भक्त झालो आहे. सब उपरवाले की माया होती है बेटा. बहुत पिटा मैने बीवी बच्चो को! लेकिन अब एक गाली भी नहीं देता." मी फक्त हो ला हो करत होतो.
आता सकाळचे आठ वाजले होते मला रूमवर निसटावे असे वाटले. तेव्हा मी काकांना म्हणालो "आपसे मिलकर बहुत अच्छा लगा फिर मिलते है."
"अरे रुको रुको..चलो मैं तुम्हे चहा पाजतो. चल…पहिल्यांदा भेटला तू." मी फुकटचा चहा मिळणार म्हणून आनंदानें चला म्हणालो.
त्या महान व्यक्तीने दोन कप चहा घेतला त्या सोबत दोन टोस्ट खाल्ले आणि रुमालाने तोंड पुसून मला तो जाड्या भरड्या भुवया उंचावत चू चू चू करत म्हणाला " अरे माझे पाकीट तर घरी विसरले की बेटा."
त्यावर मीच फोन पे वापरून सकाळी दुकानदाराची भवानी केली. सकाळचे नाश्त्याचे काम झाले अशा अविर्भावात काका खुश झाले. त्याचं भरात त्यांनी मला राम राम ठोकला. त्यांना जातांना पाहून मी नमस्कार करत मनात म्हंटले “इथे भेटलात वर भेटू नका म्हणजे झालं”..
असंच आपण आजूबाजूला बघितले तर पु.लं.ना दिसलेले व्यक्ती आणि वल्ली आपल्याला पण आयुष्यात सापडतातच त्यातलाच हा एक माझ्या राशीला आला होता असो सगळं काही त्या वरच्याच्या इच्छेने होते नाही का?