विशेष घटना
१७९६: एडवर्ड जेनर यांनी प्रथम देवीची लस टोचली.
१७९०च्या सुमारास देवीच्या रोगाने जगभर थैमान घातले होते. ब्रिटनमध्ये देवी रोगाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्याकाळी लंडनमधील जेवढ्या मुलांना देवीचा संसर्ग झाला, त्यातली ८० टक्के मुले बळी पडली होती. एडवर्ड जेनर यांनी जगातील पहिली लस शोधून काढली. विषाणू माहित नसताना त्याच्याविरुद्ध त्यांनी लस तयार केली आणि स्वतः देवीची लस टोचून घेतली. त्यांना लसीकरणाचा जनक असेही म्हटले जाते.
जन्म / जयंती / वाढदिवस
१६५७: मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म.
नऊ वर्षं मुघलांविरूद्ध लढा देणारे छत्रपती संभाजी महाराज हे अजिंक्य योद्धा होते. त्यांनी आयुष्यात १४७ लढाया केल्या व महत्त्वाची बाब म्हणजे एकाही लढाईत त्यांचा पराभव झाला नाही. थोड्या काळात त्यांनी सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज यांच्यावर जरब बसवला होता. महाराष्ट्रात दुष्काळ पडला असताना स्वराज्याची धुरा त्यांनी नेटाने वाहिली. शेतकऱ्यांसाठी धरणे बांधली, आषाढी वारी, संताच्या पालखींना संरक्षण पुरवले. महाराज तब्बल चौदा भाषेत पारंगत होते. त्यांनी लहान वयात ‘बुधभूषण’ सहित अनेक ग्रंथ लिहिले. धर्मासाठी प्राण देणारे संभाजी महाराज खरे धर्मवीर ठरतात.
१९०९ : अभिनेते वसंत शिंदे यांचा जन्म.
वसंत शिंदे यांनी दादासाहेब फाळके यांच्यासोबत कारकिर्दीची सुरुवात केली. सीता वनवास, रावण युद्ध, संत जनाबाई, भक्त प्रल्हाद, बोलकी तपेली इत्यादी चित्रपटात भूमिका केल्या. दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेल्या १९ मुकपटांमध्ये त्यांनी काम केले. अरुणोदय नाट्य मंडळीत त्यांनी ५७ लोकनाट्यामध्ये तसेच चौदा नाटकात काम केले. मायाबाजार या बोलपटात काम केले.
१९२३: महान दिग्दर्शक मृणाल सेन यांचा जन्म.
त्यांना तब्बल वीस राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले यातच त्यांची महानता लक्षात येते. अमर भुवन, नील आकाशेर नीचे, रात भोर इत्यादी सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केले. बाइशे श्रावण या चित्रपटामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त झाली. चित्रपसृष्टीतील योगदानासाठी त्यांना नेहरू-सोव्हिएत लँड पुरस्कार, पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१९२६ : आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉ. इंदुताई पटवर्धन यांचा जन्म.
राजघराण्यात जन्माला येऊन सुद्धा समाज सेवेचे व्रत स्वीकारून कुष्ठरोग्यांची सेवा करणाऱ्या थोर समाजसेविका म्हणजे इंदुताई पटवर्धन. त्यांनी आळंदी जवळ डूडुळगाव येथे आनंदग्रामची स्थापना केली. ही संस्था कुष्ठरोग्यांसाठी काम करते.
१९४६: ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म.
स्त्रियांवरील अत्याचार, व्यसनाधिनता, अंधश्रद्धा इत्यादी वाईट प्रवृत्तीना विरोध करून त्यांनी समाजाला सन्मार्गावर आणले. निरूपणाच्या माध्यमातून समाजाला खरा मार्ग दाखवला. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती स्थापन केली. या संस्थेद्वारे त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार केला. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी हे सुद्धा स्वामी समर्थांच्या दासबोधाचे निरुपणकार होते.
१९८४: फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा जन्म.
इंटरनेटच्या दुनियेत क्रांती घडवणारी व्यक्ती झुकरबर्ग हे हार्वर्ड विद्यापीठाचे ड्रॉप आऊट विद्यार्थी आहेत. सध्या ते सर्वात कमी वयाचे अब्जाधीश पुरुष असून त्यांची राहणी अत्यंत साधी आहे. त्यांच्या आयुष्यावर द सोशल नेटवर्क नावाचा सिनेमा सुद्धा प्रसिद्ध झाला.
मृत्यू / पुण्यतिथी / निधन
१९२३ : कायदेपंडित सर नारायण गणेश चंदावरकर यांचे निधन.
चंदावरकर सामाजिक जागृती, पत्रकारिता, अस्पृश्यता निवारण अशा सामाजिक कार्यात सक्रिय होते. ते तीन वर्षं मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. अखिल भारतीय काँग्रेसच्या मूळ संस्थापकांपैकी एक सदस्य म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी मुंबई शाखेचे रॉयल एशियाटिक सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलेल्या डिप्रेस्ड क्लास मिशनचे चंदावरकर अनेक वर्षं अध्यक्ष होते.
१९७८: नाटककार व लेखक जगदीशचंद्र माथुर यांचे निधन.
हिंदी नाटककार जगदीशचंद्र माथुर हे ऑल इंडिया रेडियोचे महासंचालक होते. त्यांनी एआयआरचे आकाशवाणी असे नामकरण केले. कोणार्क, दस तस्वीरे, पहला राजा, शारदीया इत्यादी नाटके लिहिली. तसेच टुंडा लाट, घास गोदाम, नरक कुंड में वास, मुठ्ठी भर कांकर, कभी न छोड़े खेत ह्या कादंबऱ्या लिहिल्या.
२०१२ : रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार तरुणी सचदेव यांचे निधन.
तरुणी सचदेव यांनी ‘पा’ या चित्रपटात ‘ऑरा’च्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. टीव्ही वरील रसनाच्या जाहिरातीमुळे खूप कमी वयात त्या प्रसिध्दीच्या झोतात आल्या होत्या. त्यांनी अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले. कोलगेट, शक्ती मसाला, एलजी, गोल्ड विनर अशा मोठ मोठ्या उत्पादनांच्या जाहिरातीमध्ये काम केले. नेपाळ येथे विमान अपघातात त्यांचे त्यांच्या वाढदिवशीच निधन झाले.
२०१३ : भारतीय लेखक असगर अली इंजिनिअर यांचे निधन.
मुस्लिम विचारवंत असगर अली इंजिनिअर यांनी 'सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी आणि सेक्युलॅरिझम'ची स्थापना केली. ‘अ लिव्हिंग फेथ : माय क्वेस्ट फाॅर पीस, हार्मनी अँड सोशल चेंज’ हे त्यांनी लिहिलेले आत्मचरित्र आहे. इस्लाम व भारतातील धार्मिक हिंसाचार या विषयांवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. मराठी मुस्लिमांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य त्यांनी केले.