कुणाला रिमझिमणारा पाऊस आवडतो, तर कुणाला आल्हाददायक थंडीचा हिवाळा. पण उन्हाळ्याचा उकाडा मात्र कुणालाच नको वाटतो.
थंडीचा जोर ओसरु लागला की सुर्य आग ओकु लागतो. सकळचे ९-१० वाजले की घामाच्या धारांना सुरवात होते. कडक उन्हाळ्यात बाहेरही पडावेसे वाटत नाही. असं वाटतं की थंड पाण्यात दिवसभर डुंबुन राहावं. सारखं काहीतरी थंड खात राहावं, पण प्रैक्टिकली ते शक्य होत नाही. कारण तेवढं जमत नाही, आणि आजारी पडण्याची भिती ती वेगळी.
उकाडा वाढत चालला की झाडाचे एक पानही हलत नाही, असे वाटते. भर उन्हातुन चालत असताना कुठे सावली भेटते असं होऊन जातं. घसा कोरडा पडलेला असतो. कपडे घामाने भिजुन जातात. कुठुनतरी थंड वाऱ्याची झुळुक मनाला सुखावुन जाते.
या वर्षात १४७ वर्षामधील सर्वात उष्ण असा एप्रिल महिना अशी नोंद झालेली आहे. उष्णतेचा पारा ठिकठिकाणी वाढतो आहे, कुठे कुठे पाऊसही पडतो आहे. पण पाऊस गेल्यानंतर जो भयंकर उकाडा सहन करावा लागतो ना, त्याची तर बातच सोडा.
माणसाने स्वार्थासाठी केलेली अमाप व्रुक्षतोड, वाढते प्रदुषण, औद्योगिक वसाहती यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढत चालले आहे. त्याची परिणिती भयंकर उष्णता व उष्माघात यामध्ये होत आहे. निसर्गाचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे. वाढत्या ग्लोबल वॉर्मिंग वर सगळ्यांनी एकत्रितपणे उपाय योजायला हवेत. उष्माघाता पासुन वाचायचं असेल तर पुरेशी काळजी घेऊनच घराबाहेर पडलं पाहिजे. शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवले पाहिजे.