Bluepad | Bluepad
Bluepad
" आयपीएल २०२२ - एक जिवंत समिक्षण "
Dr. Datta Vighave
Dr. Datta Vighave
14th May, 2022

Share

पंजाबच्या मोठ्या विजयाने आरसीबीचा प्लेऑफचा मार्ग बनलाय खडतर !
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या पंधराव्या सत्रातील साठाव्या सामन्यात पंजाब किंग्ज व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात झालेल्या लढतीत बेभरवशाच्या पंजाबने खेळाच्या सर्वच क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी करताना गुणतालिकेत चौदा गुणांसह चौथ्या स्थानावर असलेल्या आरसीबीचा चोपन्न धावांनी काहीसा एकतर्फी पराभव केला आणि स्वतःची धावगती वाढवली. त्याचबरोबर बारा गुणांसह प्लेऑफ मध्ये पोहोचण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या. पंजाबला आणखी दोन सामने खेळावयाचे असून त्यातील चांगले विजय त्यांच्यासाठी प्लेऑफचे द्वार खुले करू शकतील.
अगदी त्याउलट आरसीबीची परिस्थिती असून या सामन्यापूर्वी ते चौथ्या क्रमाकांवर होते व आताही चौथ्याच स्थानी आहेत, परंतु या सामन्यातील मोठया पराभवाने त्यांची धावगती उणे शुन्य पुर्णांक तेवीस दंशाश इतकी झाली असून साखळीतील त्यांचा केवळ एकच सामना बाकी असून तो सामना त्यांना गुणांकनात अव्वल स्थानी असलेल्या व प्लेऑफ सीट पक्की केलेल्या गुजरात टायटन्सशी खेळायचा आहे व त्या सामन्यात आरसीबीला मोठा विजय मिळवून धावगती सरस करण्याचे आव्हान असून सध्याची त्यांची धरसोड कामगिरी व मानसिकता बघता आरसीबीसाठी ते कार्य महाकठीण दिसते. त्यामुळे अगदी जवळ जाऊनही प्लेऑफमध्ये पोहोचणे त्यांच्याकरिता मृगजळ ठरण्याचीच शक्यता अधिक वाटते.
या सामनात नाणेफेक गमावल्यानंतर पंजाबने प्रथम फलंदाजी करत सामना जिंंकणारी धावसंख्या रचली आणि नंतर पंजाबच्या गोलंदाजांनी आरसीबीच्या धुरंदर फलंदाजांना डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. पंजाबकडून सलामीवीर जॉनी बेअरस्टोच्या झंझावती २९ चेंडूतील ६६ व लियाम लिव्हींगस्टोनच्या ४२ चेंडूतील वादळी ७० धावांनी आरसीबीच्या गोलंदाजांची मोठीच फरफट झाली. मोहम्मद सिराज व जोश हेजलवूड या प्रमुख गोलंदाजांच्या सहा षटकात तब्बल शंभर धावा पंजाबच्या फलंदाजांनी कुटल्या. पंजाबने दिलेले २१० धावांचे महाकाय आव्हान आरसीबीला पेलता काही आले नाही व १५५ धावांवरच त्यांचे ताबूत थंडावले. या बरोबरच परत एकदा विजेतेपदाच्या शर्यतीतून बाद होण्याचे संकट त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे.
या सामन्याच्या निकालाच्या दृष्टीने निर्णायक ठरलेल्या काही ठळक बाबींचा आपण थोडक्यात आढावा घेऊया.
पंजाबचे सलामीवीर शिखर धवन व जॉनी बॅरिअस्टो यांनी साठ धावांची सलामी दिली. पावर प्ले मध्येच पंजाबच्या खात्यात ८३ धावा जमा झाल्या होत्या. या सत्रात आरसीबी विरूद्ध सर्वच संघांनी मिळून सात वेळा फिफ्टी प्लस ओपनिंग पार्टनरशिप केली असून हा या सत्रातला उच्चांक असून आरसीबीच्या गोलंदाजीची हालात स्पष्ट करण्यास पुरेसे आहेत. बॅरिअस्टोने तुफानी ६६ धावा ठोकून सामन्याला निर्णायक कलाटणीच दिली. त्याचा लाभ त्याला सामनावीर पुरस्कारासह अनेक बक्षिसे मिळविण्यात झाला.
मधल्या फळीत पंजाबकडून केवळ लिव्हींगस्टोनच चांगला खेळला. बाकीचे फलंदाज फेल झाले तरीही आरसीबीला याचा लाभ उठविता आला नाही. हेजलवूडची झालेली पिटाई आरसीबीच्या शिडातली हवाच काढून गेली.
विराट कोहलीचे अपयश केवळ त्याच्यासाठीच नाही तर आरसीबीसाठीही घातक ठरत असून आजमितीला विराट कोहली बाद करण्यास सर्वात सोपा फलंदाज ठरत आहे. त्यामुळे आरसीबीचे इतर फलंदाज दबावात येताना दिसतात.
शिवाय ऋषी धवनने कर्णधार फाफ डुप्लेसिस व महिपाल लोमरोर यांना एकाच षटकात माघारी धाडून आरसीबीपुढे संकटच उभे केले.
ग्लेन मॅक्सवेल ३५ धावांचे मोठया खेळीत रूपांतर करू न शकणे व या सत्रात आरसीबीचा तारणहार ठरत असलेला दिनेश कार्तिक अपयशी ठरणे आरसीबीसाठी नुकसानदायक ठरले.
दोन्ही संघांच्या कर्णधारांची कामगिरी बघितली तर फलंदाजीत दोघेही अपयशी ठरले. मात्र क्षेत्ररक्षणा दरम्यान गोलंदाजांकडून चांगले काम करून घेण्यात मयंक अग्रवाल फाफ पेक्षा उजवा ठरला.
कामगिरीत सातत्य नसलेल्या पंजाबला या विजयाने संजिवनी मिळाली असली तर पुढचे दोन सामने यापेक्षा चांगली कामगिरी करून जिंकणे अत्यावश्यक आहे. तर सोपे असलेले समिकरण आरसीबीने स्वतःच बिघडवल्याने त्यांच्या पुढे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहीले असून एक चमत्कारच त्यांना प्ले ऑफमध्ये घेऊन जाऊ शकतो.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
" आयपीएल २०२२ - एक जिवंत समिक्षण "

122 

Share


Dr. Datta Vighave
Written by
Dr. Datta Vighave

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad