Bluepad | Bluepad
Bluepad
मैत्री जपण्याबद्दल पुलं काय सांगतात?
S
Shilpa Jadhav
14th May, 2022

Share

“मैत्रीची एक सोपी व्याख्या आहे, रोज आठवण यावी असं काही नाही. रोज भेट व्हावी असं काही नाही. एवढंच कशाला, रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री..” अवघ्या महाराष्ट्राचं आवडतं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांनी मैत्रीविषयी लिहिलेल्या या ओळी मैत्रीतली पारदर्शकता, त्यातलं गहिरेपण दर्शवणारं आहे. पुलंनी मित्रांचा, हितचिंतकाचा गोतावळा आयुष्यभर जपला आणि वाढवला. हे त्यांनी कसे केले असावे आणि पुलंना मैत्रीबद्दल नक्की काय वाटायचं, जाणून घेऊया या लेखात.

प्रत्येक व्यक्तीसाठी मैत्री हा शब्द अतिशय जवळचा असतो. कारण आयुष्यात कधीतरी एखाद्या टप्प्यावर असा एखादा मित्र किंवा अशी एखादी मैत्रिण भेटलेली असते, जिने आपल्या आयुष्यात अतिशय पक्की जागा केलेली असते. आपलं सुख – दुःख तिच्याशी शेअर करण्यापासून छोट्यामोठ्या सगळ्या प्रसंगात तो मित्र / ती मैत्रिण आपल्याशी जोडली गेलेली असते. प्रसंग कोणताही असो आपल्यासोबत आपला मित्र असणार, ही भावनाच कितीदा सुखावून जाते. शाळा, कॉलेजमध्ये असताना मैत्रीचं हे नातं टिकवणं तुलनेने सोपं असतं. मैत्रीची खरी परीक्षा सुरु तेव्हा होते जेव्हा दोघांनाही भेटण्या – बोलण्यासाठी वेळच नसतो. यातून मग अहंकाराचं फुलणं, दुर्लक्ष करणं तयार होतं आणि मग मैत्रीचे धागे विस्कळीत व्हायला वेळ लागत नाही.

तो मला फोन करत नाही मग मीच का करावा नेहमी, असं वाक्य आपल्यासमोर नेहमीच कोणी ना कोणी बोलून जातं. दोघांपैकी एखादाच सतत संपर्क साधण्यात पुढाकार घेतो आणि दुसरा मात्र फारसे कष्ट घेत नाही त्यामुळे मग मीच का म्हणण्याची वेळ पुढाकार घेण्याऱ्यावर येते. यात कोणी चूक किंवा कोणी बरोबर या भानगडीत न पडता खरंतर संपर्कात राहण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. जीव लावणारा मित्र, मैत्रिण मिळण्यासाठी भाग्य लागतं असं म्हणतात आणि ते खरंदेखील आहे. त्यामुळे अशी व्यक्ती आपल्याजवळ असेल तर तिला जपून ठेवण्याचं काम आपण केलं पाहिजे. जसं पुलं म्हणतात की, भेटणं, बोलणं होईलच असं नाही. पण आपण एकमेकांना विसरणार नाही ही भावनाच मैत्रीतला आनंद जिवंत ठेवायला पुरेसा आहे.

मैत्री जपण्याबद्दल पुलं काय सांगतात?

शेवटी काय हो भेटी नाही झाल्यातरी गाठी बसणं महत्त्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूसपण जाणलं.. असं म्हणत पुलं मैत्रीचा आणखी एक धागा उलगडतात. कधीकधी असं होतं की, एखादी व्यक्ती पहिल्याच भेटीत आपल्याला आपलीशी वाटायला लागते. तर काही व्यक्तींशी वर्षानुवर्षाची ओळख असूनदेखील त्यांच्याशी आपुलकीचं नातं तयार होत नाही. कितीही वेळा अशा माणसांच्या भेटी घेतल्या तरी आपली त्यांच्याशी प्रेमाची गाठ काही बसत नाही. मैत्रीचंही तसंच असतं. एखाद्याशी अचानक आपल्या मनाच्या तारा जुळतात आणि साध्या ओळखीचं पक्क्या मैत्रीत रुपांतर होतं. ज्यांच्याशी असं नातं तयार झालं आहे अशा व्यक्तींना आपल्या आयुष्यात जपून ठेवण्यासाठी आपण नेहमी सज्ज असलं पाहिजे. मग तो / ती कसा आपल्याला फोन करत नाही, मेसेज करत नाही, भेटायलाच येत नाही अशा तक्रारींना जागा तयार करु नये. मित्र म्हणून तो कसा आहे, किती सुखदुःखाचे क्षण आपण त्याच्यासोबत घातले, आयुष्यभरासाठी आपण किती आठवणी त्याच्यासोबत तयार केल्या आहेत, तो माणूस म्हणून किती चांगला आहे या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे. नाती तोडणारे विचार नेहमी घातक असतात त्यामुळे तशा विचारांना मनात थारा देऊच नये.

श्रीकृष्ण – सुदामा यांच्या मैत्रीच्या गोष्टी ऐकतच आपण मोठे झालो आहोत. कोणत्याही अहंकार, तक्रारींपलीकडची त्यांची मैत्री होती. त्या मैत्रीत रोज भेटणं, बोलणं निश्चितच नव्हतं. पण दोघांच्याही ह्रदयात एकमेकांचं स्थान पक्क होतं. त्यामुळे आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांची मैत्री निर्मळ राहिली. राज्यात असे अनेक राजकारणी आहेत ज्यांच्यात टोकाचे राजकीय मतभेद आहेत पण राजकारण सोडलं तर निखळ मैत्रीदेखील आहे. अशा सर्वांकडून आपण मैत्री जपण्याविषयी शिकायला हवं. मैत्रीला कोणत्याही चौकटीत न अडकवता, अहंकाराला मध्ये न आणता जो आपल्या जीवाभावाचा आहे त्याला जपण्यासाठी, आयुष्यभर मैत्रीचं नातं ताजं ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवे. निरपेक्ष भावना मैत्रीमागे असायला हवी. जसं पुलं म्हणतात तसं भेटी नाही, गाठी महत्त्वाच्या हे लक्षात ठेवून मैत्रीचे संबंध जोपासले तर आपल्याइतकं समृद्ध आपणच असू.

529 

Share


S
Written by
Shilpa Jadhav

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad