Bluepad | Bluepad
Bluepad
सोप्प्या पद्धतीने भावनिक बुद्धिमता कधी वाढवाल?
V
Vivek Chitre
14th May, 2022

Share

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता विकसित होणं फार महत्त्वाचं असतं. ज्या व्यक्तीची भावनिक बुद्धिमत्ता चांगली असते तिचे समाजात निरोगी, आनंदी नातेसंबंध असतात. अशा व्यक्ती यशस्वी होण्याचं प्रमाणही अधिक असतं. त्यामुळे प्रत्येकामध्येच समतोल भावनिक बुद्धिमत्ता असण्याची गरज आहे. ही बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि ती कशी विकसित करावी हे सांगणारा हा लेख..

भावनिक बुद्धिमत्तेचं महत्त्व आणि गरज
भावनिक बुद्धिमत्ता उच्च असणं प्रत्येक माणसासाठी महत्त्वाचं असतं. कारण उच्च भावनिक बुद्धिमत्ता असलेली माणसं अधिक संपर्क साधण्याजोगी असतात. त्यांचं वर्तन मोकळेपणाचं असतं आणि त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणंदेखील अतिशय सहजसोपं असतं. मग भलेही ते ग्रुपसोबत असो वा वैयक्तिक स्तरावर. अनेक अभ्यासांमधून हे सिद्ध झालं आहे की, उच्च भावनिक बुद्धिमत्ता असलेले लोकं कमी भावनिक बुद्धिमत्ता असलेल्या लोकांपेक्षा जास्त आत्मविश्वासू, विश्वासार्ह असतात. त्यांच्यात चांगले नेतृत्वगुणदेखील बघायला मिळतात. शिवाय जे काही काम त्यांना मिळतं ते गुणवत्तेने करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो. म्हणून तर अनेक कंपन्या नोकरीसाठी आलेल्या अर्जदारांना कामावर घेण्यापूर्वी त्यांच्या भावनिक बुद्धिमत्ताविषयावर चाचण्या घेतात. तर काही कंपन्या हा बुद्धिमत्ता विकास होण्यासाठी प्रशिक्षणांचं आयोजनही करतात इतकं महत्त्व भावनिक बुद्धिमत्तेला आहे.

भावनिक बुद्धिमत्ता वाढवायची कशी?
भावनिक बुद्धिमत्तेचं महत्त्व आणि गरज जाणून घेतल्यावर ही बुद्धिमत्ता नेमकी वाढवायची कशी हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे.

१. स्वतःच्या भावनांबद्दल जागरूक व्हा
आपल्या भावनांवर आपलं नियंत्रण असायला हवं. आपल्या भावना कशा प्रकारच्या आहेत याविषयी आपल्यात जाणीव असायला हवी. त्यानंतर आपल्या भावनांशी जुळवून घेण्याची क्षमता आपण विकसित करणं महत्त्वाचं असतं. आपल्या भावनांबाबत आपण जागरुक असू तर त्यावर नियंत्रण ठेवणं आपल्याला शक्य होऊ शकतं. यासाठी काय करायचं तर, भावना ओळखून त्यांचं परीक्षण करायचं. स्वतःला जाणून घेणं हे एक अतिशय महत्त्वाचं जीवन कौशल्य आहे. ध्यानधारणेचा सराव यासाठी आपण करु शकतो. यामुळे स्वतःविषयी अधिक जागरूकता निर्माण व्हायला मदत होते आणि त्यातून भावनांचं निरीक्षणही करता येतं. जेव्हा आपण स्वतःच्या भावनांबद्दल जागरूक राहू तेव्हाच आपण इतरांच्या भावना समजून घेण्यास सक्षम होऊ.

२. इतरांचे दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा.
एकदा स्वतःच्या भावनांचे योग्य मूल्यमापन करायला आपण शिकलो की इतरांचे दृष्टीकोन, भावना समजून घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. विशेषतः कामाच्या ठिकाणी, जिथे मोठा ग्रुप असेल, सामाजिक कार्यक्रम असतील एकूणच जिथे विचारांची देवाणघेवाण होत असेल तिथे हा प्रयोग करावा. यासाठी लक्षपूर्वक ऐकणं, स्वतःला दुसर्‍याच्या जागी ठेवून पाहणं आणि समोरचा जे बोलतोय त्यामागे त्याचे काय विचार असतील, का ती व्यक्ती याच ठराविक निष्कर्षांवर पोहोचली असेल याविषयी स्वतःच्या क्षमतेने जाणून घेण्याचा प्रयत्न करा. यातून भावनिक बुद्धिमत्तेच्या दृष्टीने आपण अधिक सजग होत असतो.

सोप्प्या पद्धतीने भावनिक बुद्धिमता कधी वाढवाल?

३. प्रभावीपणे संवाद साधा.
प्रभावीपणे संवाद साधणंदेखील भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. चांगलं संवाद कौशल्य कोणत्याही यशाची गुरुकिल्ली असते. संभाषण करणं हे केवळ माहितीची देवाणघेवाण करणं नसून त्यापेक्षा मोठं आहे. प्रभावी संवादातून आपल्या व इतरांच्या भावना समजून घेण्यास मदत होते. तसेच माहितीची देवाणघेवाण करण्यामागील हेतूही स्पष्ट होत जातो. हा संवाद काहीवेळा शब्दांपलीकडचाही असू शकतो. जसं ऐकणं, डोळ्यांनी संपर्क साधणं, देहबोलीची जाणीव असणं यातूनही आपण संवाद साधत असतो हे लक्षात घ्यायला हवं.

४. लोकांशी संबंध प्रस्थापित करा.
आपण कितीही लाजाळू किंवा अंतर्मुख असलो तरीही इतरांशी संबंध विकसित करण्यास, प्रस्थापित करण्यास शिकणं भावनिक बुद्धिमत्तेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. बोलण्याची भीती वाटत असेल, इच्छा नसेल तर किमान ऐकण्यात स्वारस्य दाखवून, इतरांना आपल्याशी बोलताना कम्फर्टेबल करुन आपण सक्रिय राहू शकतो. जे लोकं बहिर्मुखी असतात त्यांना संबंध प्रस्थापित करण्यात अडचणी येत नाही. त्यांच्या ओळखी लवकर होतात. जितक्या जास्त लोकांशी आपण संबंध प्रस्थापित करुन तितका भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी आपल्याला फायदा होईल.

५. भावनिक व्यवस्थापनाचा सराव करा.
एकदा आपल्याला स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांची जाणीव झाली की, त्यांना संतुलित आणि नियंत्रणात कसं ठेवायचं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यालाच भावनिक व्यवस्थापन असंही म्हणतात. त्यासाठी कोणत्याही भावना निर्माण झाल्या की त्यावर विचार करायला वेळ घेणं, चालणं, व्यायाम करणं, पाळीव प्राण्याबरोबर खेळणं, खोल श्वास घेण्यासारखे उपक्रम करणंही मदतीचं ठरतं. शिवाय सकारात्मक विचार करणंदेखील आपल्या भावनिक व्यवस्थापनासाठी गरजेचं आहे.

एकूणच, भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्याचे आपल्याला वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही स्तरावर अनेक फायदे होतात. जसे इतर अनेक कौशल्य आपण आत्मसात करतो तसंच भावनिक बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठीही आपण या लेखात दिलेल्या टीप्सचा वापर करुन प्रयत्न करायला हवा. मग निश्चितच आयुष्यात यशाचं शिखर गाठता येईल आणि आयुष्य आनंदानेही जगता येईल.

507 

Share


V
Written by
Vivek Chitre

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad