Bluepad | Bluepad
Bluepad
सुश्मिता सेनचे ५ प्रेरणादायी मंत्र..
S
Samruddhi Rege
14th May, 2022

Share

भारताची पहिली विश्वसुंदरी, फिटनेस फ्रिक, अभिनय आणि सौंदर्यासाठी नेहमीच चर्चेत असणारी एक सुंदर अभिनेत्री म्हणजे सुश्मिता सेन. ती जितकी तिच्या व्यक्तिमत्वामुळे प्रसिद्ध आहे तेवढीच ती तिने केलेल्या वैयक्तिक गोष्टींमुळे देखील प्रसिद्ध आहे. काही लोक असतात जे केवळ इतरांना चांगल्या गोष्टी सांगतात पण सुश्मिता सेनने स्वतःच्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी करून संपूर्ण जगासाठी एक आदर्श घालून दिला आहे. आजच्या या लेखात आपण तिने सांगितलेले काही प्रेरणादायक विचार पाहुयात.

१. एक 'स्त्री' असणे ही देवाची देणगी आहे. लहान मुलगा जन्माला येण्याचे कारण म्हणजे त्याची आई, एक स्त्रीच. तिच्याकडूनच माणसांना कळतं की काळजी, प्रेम म्हणजे काय असतं आणि हेच स्त्रीचे सार आहे.
सर्वांगसुंदरी असणारी सुश्मिता सेन हिने एका मुलीला दत्तक घेऊन तिचा सांभाळ करण्यात ती तिचे आईपण जगत आहे. विशेष म्हणजे अगदी कमी वयात तिने त्या मुलीला दत्तक घेतले व तिचा योग्यप्रकारे सांभाळ करत तिला योग्य ते शिक्षण, पूरक वातावरण तसेच संस्कार हे सगळे एक आई म्हणून केले. आत्मनिर्भर होऊन एका लहान मुलीला मायेच्या ममतेने सांभाळणे, तिची काळजी घेणे, प्रेम करणे हे काही सोपे काम नव्हे. पण हेच काम ती अगदीच लीलया पार पाडताना दिसते. आई आणि मुलगी यांचे हे नाते रक्ताचेच आहे की काय असा प्रश्न पडावा एवढे ते सुंदर आणि पवित्र आहे, हे विशेष!

२. मी स्वतःला एक यशस्वी उद्योजिका म्हणून पाहते. स्वतःची ओळख स्वतः निर्माण करणे हेच माझे ध्येय आहे.
चित्रपसृष्टीत एकाहून एक सरस चित्रपट दिल्यानंतर सुश्मिता सेन काही काळासाठी चित्रपटसृष्टीपासून दूर गेली. त्या काळात तिच्यावर बरीच टीका करण्यात आली. पण तरीही त्याकडे दुर्लक्ष करून तिने स्वतःचे स्वप्न साकार करत एक कपड्यांचा उद्योग सुरू केला. केवळ अभिनेत्री, पहिली विश्वसुंदरी या एवढ्याच ओळखीवर ती मर्यादित राहिली नाही तर एक उत्तम उद्योजक, एक उत्तम आई आणि एक स्त्री म्हणून तिने आपली स्वतःची वेगळी स्वतंत्र ओळख निर्माण केली.

सुश्मिता सेनचे ५ प्रेरणादायी मंत्र..

३. तुम्हाला काय हवे आहे ते जाणून घ्या आणि ते मिळवा.
१९९४ साली सुष्मिताला 'मिस युनिव्हर्स' हा खिताब मिळाला आणि रातोरात ती प्रसिद्ध झाली. हा खिताब मिळवणे हे तिचे ध्येय होते व त्या ध्येयापासून ती कधीच हटली नाही. १९९४च्य फेमिना मिस इंडियामध्ये सुश्मिता 'मिस युनिव्हर्स' साठी तर ऐश्वर्य राय ‘मिस वर्ल्ड’ साठी निवडल्या गेल्या. आणि या दोघींनी ते मुकुट जिंकले. सुश्मिताने या दृष्टीने मेहनत करून तिने जे ठरवलं होतं ती गोष्ट मिळवून दाखवली. मनात आपले पक्के ठरलेले असले की ती गोष्ट मिळवल्याशिवाय आपण राहत नाही असे म्हणतात, तेच खरे!

४. तुमचा आनंद सगळ्यात आधी तुम्हीच साजरा करायला हवा. दुसऱ्याने तुमचा आनंद साजरा करण्यासाठी प्रतिक्षा का करावी?
अनेक जण असे असतात जे त्यांचा आनंद दुसऱ्यांकडून साजरा व्हावा अशी अपेक्षा करतात. उदा, वाढदिवस असेल किंवा त्यांना नोकरीत बढती मिळाली असेल अथवा अजून असं बरंच काही. पण याची गरज काय? आपला आनंद आपणच साजरा केला पाहिजे. प्रत्येकवेळी कोणीतरी येईल आणि तुमचा आनंद साजरा करतील, तुमच्यासाठी काहीतरी विशेष करतील अशी अपेक्षा बाळगणे व्यर्थ ठरते. सुष्मिता आपला आपणच आनंद साजरा करताना स्वतःला आवडणाऱ्या वस्तू घेते, आवडतं ते खाते, त्या सर्व गोष्टी करते ज्याने तिला छान वाटेल. अशा पद्धतीने ती तिचा आनंद साजरा करते.

५. त्या रात्री मीच जिंकण्यास पात्र होते कारण मी माझे सर्वोत्तम दिले होते. मी इतर कोणापेक्षा चांगले होण्याचा प्रयत्न केला नाही तर मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला.
ज्यावेळी आपला स्वतःवर पूर्ण विश्वास असतो व त्याच्या जोडीला कौशल्य, मेहनत, प्रयत्न असतात तेव्हा तुम्हाला जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आपण आपले १०० टक्के देण्याचा प्रयत्न केला की विजय आपलाच असतो. शिवाय इतर कोणापेक्षा काहीतरी चांगलं करण्यापेक्षा जर प्रत्येकवेळी आपण स्वतःच शक्य तेवढे सर्वोत्तम करत राहिलो तर त्यात वृद्धी होत जाते आणि शेवटी विजय आपलाच होतो.
सुश्मिताचा या वरील पाच विचारांवर केवळ विश्वासच नाही पण या विचारांना आपल्या आयुष्यात स्थान देऊन तिची जी वाटचाल चालू आहे ती वाखाणण्याजोगी आहे. हे विचार आपल्याही आयुष्यात पेरून पाहूया. कदाचित आपले आयुष्यही इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल. हे विचार तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा.

508 

Share


S
Written by
Samruddhi Rege

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad