Bluepad | Bluepad
Bluepad
'या' गोष्टींना प्रेम समजता आहात? मग तुम्ही चुकताय!
K
Kamala Jogalekar
14th May, 2022

Share

टॉपिक - या गोष्टींना प्रेम समजताय ? थांबा!
प्रेम ही भावना प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते. पण तुम्ही काही भ्रामक गोष्टींना प्रेम समजत असाल तर जरा थांबा. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घेऊया आजच्या लेखात.

मत्सर वाटणं -
नातं तुटल्यांतरही पूर्वजोडीदाराच्या आयुष्यात कोणी आल्यावर त्रास होणं, फरक पडणं आणि पुन्हा प्रेमाचं नातं जोडलं जाणं असं सिनेमात दाखवतात. आपल्याला ते खरं वाटतं. आपलं अजूनही एक्सवर प्रेम आहे असं आपण समजतो. पण खरं तर ते प्रेम नसतं आपल्यापेक्षा कोणी चांगलं त्या व्यक्तीच्या आयुष्यात येत आहे याची ती भीती असते, आपल्याला कमीपणा येईल म्हणून आपण धडपड करू लागतो. त्यामुळे अशा परिस्थितीत मत्सर वाटणं म्हणजे प्रेम नाही हे ओळखा.

सवय असणं -
अनेक जण एकत्र शिकत असतात, एकत्र काम करतात. सतत एकमेकांच्या सहवासात राहिल्याने एकत्र चहा प्यायला जाणं, डब्बा खाणं, एकत्र घरी जाणं अशा अनेक गोष्टी आपण रोजच्या सवयीने कोणासोबत तरी करत असतो. पण अचानक ती व्यक्ती काही दिवस आली नाही की आपल्याला एकट वाटत. आपल्याला चुकल्या चुकल्याप्रमाणे वाटू लागतं. पण एखाद्याची सवय होणं आणि प्रेम असणं यात फरक आहे. तो फरक आपल्याला त्या व्यक्तीसोबत असताना ओळखता येऊ शकतो.

आकर्षण -
अनेक जण आकर्षणाला प्रेम समजून बसतात. एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यामुळे तिच्या शरीराच्या विशिष्ट जडणघडणीमुळे किंवा तिच्या बोलण्यामुळे, हसण्यामुळे अशा कोणत्याही गोष्टीमुळे आपण त्या व्यक्तीकडे आकर्षित होतो. आपल्याला वाटणारं आकर्षण काही काळाने निघून जातं. पण प्रेम तसं नसतं प्रेमात त्या व्यक्तीचं केवळ दिसणं, स्पर्श महत्त्वाचं नसतं. तर प्रेम ही नितळ भावना असते ज्यात आपल्याला ती व्यक्ती कधीही कशीही दिसली, स्पर्श केला नाही तरी आपली वाटते तिच्यावरचं प्रेम तसूभरही कमी होत नाही. म्हणून आकर्षण आहे की प्रेम हे आपल्याला ओळखायला हवं.

'या' गोष्टींना प्रेम समजता आहात? मग तुम्ही चुकताय!

आवडनिवड -
कधी कधी आपल्या समोर अशी व्यक्ती असते जिच्या आवडीनिवडी या आपल्याशी अगदी मिळत्याजुळत्या असतात. आपल्याला जे आवडतं तेच त्या व्यक्तीला देखील आवडतं. त्यामुळे एखाद्याशी आवडीनिवडी जुळल्या म्हणून अनेक जण अगदी हुरळून जातात आणि हेच प्रेम आहे असं त्यांना वाटतं. पण केवळ आवडी निवडी जुळणं म्हणजे प्रेम नाही. त्या व्यक्तीसोबत आपला स्वभाव, विचार दोघांच्या एकमेकांविषयीच्या भावना जुळणं देखील महत्त्वाचं असतं त्यामुळेच प्रेम वाढतं आणि ते टिकतं. आवडीनिवडी पुढे जाऊन बदलूही शकतात. त्यामुळे त्याला प्रेम ठरवू नका.

सहवास -
एखाद्या व्यक्तीचा सहवास हा सुखद असतो. म्हणजे त्याच्या सोबत असताना आपल्याला छान वाटतं. त्याच्यासोबत अधिक काळ घालवावा असं वाटतं. पण हा हवा हवासा वाटणारा सहवास म्हणजे प्रेम नाही. म्हणजे आपण एखाद्या ट्रीपला गेलो आहोत तिथे निसर्गाच्या सानिध्यात, शांततेत त्या व्यक्तीसोबत प्रवासाचे किंवा एकत्र मिळून कामाचे किती तरी क्षण हे त्यावेळी आपल्याला आल्हाददायक वाटतात. पण मानसशास्त्रानुसार ही मनाची एक स्थिती असते. त्या व्यक्तीसोबतचे क्षण आपल्याला जाणवत राहतात. त्यामुळे त्याच्यावर प्रेम आहे असं वाटतं. पण ते प्रेम नसतं. आपल्याला वारंवार त्या व्यक्तीसोबत जाऊन फिरणं शक्य देखील नसतं. म्हणून काही चांगले दिवस म्हणून आपण ते मनात साठवून ठेवू शकतो पण ते प्रेम नसतं ती मनाची स्थिती असते हे आपल्याला ओळखायला हवं.

तर या आहेत काही गोष्टी ज्यांना आपण प्रेम समजतो आणि पुढे अडचणी आल्या की खरंच ते प्रेम होतं का असा आपल्याला प्रश्न पडतो. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपल्या मित्रांनाही कोणावर खरंच प्रेम आहे की वरील गोष्टींमुळे प्रेम वाटत आहे हे ओळखण्यासाठी हा लेख पाठवा.

488 

Share


K
Written by
Kamala Jogalekar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad