Bluepad | Bluepad
Bluepad
उन्हाळ्यातील मनाला भुरळ घालणारी पुष्पसृष्टी !
निलेश थोरात
निलेश थोरात
14th May, 2022

Share

उन्हाळ्यातील उष्णता आणि उकाडा यांमुळे विविध झाडाझुडपांवर विपरित परिणाम होतो. तसेच उन्हाने पाण्याचे स्त्रोत आटल्याने पाण्याची कमतरता सुद्धा विविध वृक्षांना जाणवते. परंतु काही अशी पुष्पवृक्ष आहेत त्यांची जुने पाने उन्हाळ्यात गळून जातात आणि त्यांना नवीन पालवी फुटते तसेच नवीन रंगबेरंगी फुलांचा बहर त्यांना येतो. उन्हाळ्यातील ओसाड वातावरणात अशी फुलझाडे सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. फुलांच्या सौंदर्याने आणि सुगंधानी सर्वांच्याच मनाला भुरळ पडते.
उन्हाळ्यात फुलून सर्वांचे मन मोहून टाकणारी अनेक फुले आहेत. त्यात मुख्यत्वे बोगनवेल, बहावा, पांढरा चाफा, पळस, पांगिरा यांचा समावेश होतो. बोगनवेल वर्षभर जरी दिसत असली तरी उन्हाळ्यात तिचे सौंदर्य आणि टवटवीतपणा बघण्यासारखा असतो. ही बोगनवेल लहान झुडूप किंवा एखाद्या मोठ्या झाडावर पसरलेली दिसते. बोगनवेलीच्या झुबक्यांमध्ये येणाऱ्या फुलांना काही लोक 'कागदी फुले 'असेही म्हणतात. बोगनवेल आपल्याला बंगला, गार्डन, हाॅटेल यांच्या अवतीभोवती तसेच रस्त्याच्या दुभाजकांमध्ये आणि रस्त्याच्या कडेंना या ठिकाणी मुख्यत्वे दिसते. फुलझाडाच्या जातीनुसार फुले लाल, पिवळी, गुलाबी, केशरी, जांभळा ह्या रंगांची असतात. निसर्गप्रेमी तसेच पर्यटन प्रेमींना ही फुले विशेष आकर्षित करतात आणि त्यांचे मन फुलांना बघताच क्षणी प्रसन्न होऊन जाते.
उन्हाळ्यातील मनाला भुरळ घालणारी पुष्पसृष्टी !
चाफ्याच्या फुलाचे अनेक विविध प्रकार असतात परंतु खास उन्हाळ्यात फुलतो तो पांढरा चाफा. तो अगदी पांढराशुभ्र असतो आणि पाकळ्या आतल्या बाजूने पिवळ्या असतात. या फुलांचे सौंदर्य आणि मंद सुगंध यांमुळे मनाला एक सुखद अनुभव मिळतो. जमिनीवर पडलेला चाफ्याच्या फुलांचा सडा पाहून आकाशातील चांदण्या जमिनीवर अवतरल्याचा भास होतो.
उन्हाळ्यातील मनाला भुरळ घालणारी पुष्पसृष्टी !
वैशाखात झुबक्यात येणारी आणि पिवळी धम्मक रंगाची बहाव्याची फुले खूप बहारदार असतात. उन्हाळ्यात बाकीच्यांची लाहीलाही होत असताना ही फुले दिमाखात डोलत असतात. त्यांचे सौंदर्य आणि रुबाब पाहून डोळ्यांचे पारणे फिटतात. या फुलांना इंग्रजीत 'गोल्डन शाॅवर' असे म्हणतात तर काही भागात 'अमरताश' असेही म्हणतात. उन्हाळ्यातील बहाव्याचा रुबाब पाहून तो फुलांचा राजाच भासतो.
उन्हाळ्यातील मनाला भुरळ घालणारी पुष्पसृष्टी !
ऐन उन्हाळ्यात बहरतो आणि आपल्या सौंदर्याने आणि थंड, शितल छायेने सर्वांच्या मनात जागा बनवतो तो म्हणजे गुलमोहर. याची फुले ही लाल-तांबुस-पिवळ्या रंगाच्या छटांनी सजलेली असतात. याचे झाड आकाराने मोठे असल्याने ते दुरुन सुंदर दिसते आणि लगेच ओळखू येते.
उन्हाळ्यातील मनाला भुरळ घालणारी पुष्पसृष्टी !
पांगिरा ह्या झाडाची फुले सुद्धा वसंतात फुलतात. याची फुले आतून लाल भडक आणि बाहेरच्या बाजूने फिकट गुलाबी असतात. ह्या झाडाची फुले खालून शेंड्याकडे उगवत जातात. फुलांमध्ये मधाचे प्रमाण जास्त असल्याने किटक आणि भुंगे या झाडाकडे खूप आकर्षित होतात.
उन्हाळ्यातील मनाला भुरळ घालणारी पुष्पसृष्टी !
पोपटाच्या चोचीसारखा आकार असणारी पळसाची फुले उन्हाळ्यात खूप आकर्षक वाटतात. वसंतात या झाडाची सर्व पाने गळून जाऊन त्यांची जागा अति लाल भडक फुलांनी घेतलेली असते. ही फुले एवढी लाल असतात कि त्यामुळे पूर्ण झाड लालभडक दिसते, म्हणून याला 'फ्लेम आॅफ फाॅरेस्ट'असेही म्हणतात. ही फुले दिसायला आकर्षक असतात पण त्यांना गंध नसतो.
उन्हाळ्यातील मनाला भुरळ घालणारी पुष्पसृष्टी !
याशिवाय निळ्या रंगाचा जॅकरंडा आणि जांभळ्या रंगाची ताम्हण हे देखील इतर झाडांमध्ये उठून दिसतात. जॅकरंडाची फुले दिड-दोन इंच लांब आणि नरसाळ्यासारखी असतात. जॅकरांडाला आपल्याकडे 'नीलमोहर'असे म्हणतात.
याशिवाय खास उन्हाळ्यात फुलणारी अनेक वृक्ष आहेत. ज्यामध्ये जाई, जुई, जास्वंद, कांचन, कण्हेर,आपटा अर्जून, अशोक, करंज, बेल, सिल्वर ओक, निशीगंध, काटेसावर, मेडशिंगी, बारातोंडा यांसारख्या अनेकांचा समावेश होतो. काही फुलझाडे मानवी वस्तीत दिसतात तर काही फक्त जंगलात दिसतात. परंतु जेव्हा कधी उन्हाळ्यात बहरलेली फुले दिसतात, त्याचे सौंदर्य पाहून मन अगदी शांत, सुखमय आणि प्रसन्न होऊन जाते.

421 

Share


निलेश थोरात
Written by
निलेश थोरात

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad