पूजाचे अंकितसोबत गेल्या पाच वर्षांपासून रिलेशन होते. पूजाने तिच्या घरी या विषयी सांगितले. मात्र तिच्या कुटुंबाने अंकित तुझ्यासाठी योग्य मुलगा नाही असे त्याला न भेटताच ठरवून टाकले. मात्र या दोघांचे प्रेम हरेल इतके दुर्बळ नव्हते. मग पूजाने कुटुंबाला आणि अंकितला न दुखावता यातून काय मार्ग काढला. पूजाने असे काय केले की ती आपलं नातं टिकवू शकली. हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे या लेखातील टिप्स शेवट्पर्यंत वाचा म्हणजे तुम्हालाही कुटुंबाचा विरोध असल्यावर नातं सांभाळण्यासाठी काय करायचे हे समजेल.
१. परिस्थिती समजून घ्या -
जेव्हा तुमच्या कुटुंबाला समजते तुमच्या आयुष्यात कोणी व्यक्ती आहे तेव्हा त्यांना हे सहजासहजी पचवणे अवघड होऊन जाते. ती मुलगी किंवा मुलगा आपल्या मुलांसाठी योग्य आहेत का हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा असतो. लग्नानंतर दोघांमध्ये काही अडचण तर येणार नाही ना? दोघे नीट संसार करतील ना असे त्यांना वाटते. आपली मुलगी चुकीच्या कुटुंबात जाऊ नये याची चिंता मुलीच्या कुटुंबाला असते. तसेच आपल्या कुटुंबाला सांभाळून घेणारी सून मिळावी ही अपेक्षा मुलाच्या कुटुंबियांना असते. त्यामुळे दोघांनीही त्यांची मनस्थिती सांभाळून घ्यावी. तरच ते नातं टिकून राहतं.
२. वेळ द्या -
कुटुंबाने नातं स्वीकारावं अशी अपेक्षा लगेचच करू नका. प्रत्येक गोष्ट वेळेनुसार बदलते. त्यांना तुमचा जोडीदार जर सुरुवातीला आवडला नाही तरी चालेल काहीच हरकत नाही. पण म्हणून घाबरून जाऊ नका. तसेच जोडीदाराचे मन देखील ओळखून घ्या. त्यांना सुद्धा तुम्ही धीर देऊन वेळेनुसार सगळं काही ठीक होईल सांगा. म्हणजे तुम्ही ते नातं टिकवण्यासाठी सक्षम आहात हे त्यांच्या लक्षात येईल.
३. स्पष्ट बोला -
एकमेकांना म्हणजेच जोडीदाराला आणि तुमच्या कुटुंबाला समोरासमोर येऊ द्या. या दोघांमध्ये अशावेळी भेट होण्याची नितांत गरज असते. यामुळे कुटुंबाच्या मनात नक्की काय आहे. किंवा त्यांना जोडीदाराकडून कोणत्या अपेक्षा आहेत हे स्पष्टपणे तुम्हाला समजेल. जोडीदार देखील मग त्या गोष्टीचे स्पष्टीकरण तुमच्या कुटुंबाला देऊ शकेल. शिवाय तो तुम्हाला आयुष्यभर खुश ठेवेल ही खात्री कुटुंबाला यावेळी देईल. मुलगी सांगू शकेल मी सुनेचे कर्तव्य छान पार पाडेल. मग हीच एक चांगली संधी असते ज्यावेळी तुम्ही एकमेकांच्या कुटुंबाला प्रभावित करू शकता. त्यामुळे भेटून स्पष्ट बोलण्यास प्राधान्य द्या.
४. जबरदस्ती करू नका -
माझ्या जोडीदाराला तुम्ही स्वीकारलेच पाहिजे अशी जबरदस्ती कुटुंबावर करू नका. अशाने प्रकरण जास्त चिघळेल आणि तुमच्या जोडीदाराची प्रतिमा कुटुंबाच्या नजरेत खराब होऊ शकते. म्हणून तुम्ही नातं स्वीकारण्यासाठी कुटुंबाला फोर्स करू नका. त्यांच्या बाजूने देखील विचार करा. तसेच जोडीदारासोबत अशा परिस्थितीत उभे रहा.
५. असे तुम्ही एकटे नाहीत -
प्रेमात पडल्यावर कुटुंबाची मध्यस्थी होणे ही वेळ सगळ्यांवरच येते. काही जणांना कष्ट न घेता नातं पुढे नेता येते. तर काही जणांना कुटुंबाची साथ मिळत नाही. मग माझ्याच वाट्याला हे दुःख का? माझं कुटुंब मला समजून का घेत नाही? मला माझं प्रेम मिळणार नाही का? हे प्रश्न मनात आणून दुःखी होऊ नका. यातून बाहेर कसे पडायचे हा विचार करा. त्यामुळे या जगात आपल्यावरच अन्याय होत आहे हा विचार बाजूला करा. प्रयत्नांती परमेश्वर या वाक्याप्रमाणे तुम्ही सकारात्मक विचार केला तर नक्कीच प्रेमात यशस्वी होऊन कुटुंबाच्या परवानगीने तुमचे नाते पुढच्या टप्प्यावर घेऊन जाल.
तुमच्या बाबतीत देखील असे काही घडले असेल तर अजिबात चिंता करू नका. आम्ही सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवून त्याचा वापर करा आणि मग बघा तुमचं कुटुंब आणि नातं तुम्ही किती छान सांभाळू शकाल.