Bluepad | Bluepad
Bluepad
मनाला भुरळ घालणारी पुष्पसृष्टी
अपर्णा अनिल राऊत
अपर्णा अनिल राऊत
14th May, 2022

Share

मनाला भुरळ घालणारी पुष्पसृष्टी
जगाची उपासना करणारे अंधारात आहेत. परंतु केवळ अनंताची उपासना करणारे अधिक अंधारात आहेत. ‘जग’ आणि ‘अनन्त’ दोन्ही मान्य करणारा मनुष्य ज्ञान संपादन करून मृत्यूपासून बचाव करून घेतो आणि अनंताचे आकलन करून अमर बनतो.’’
आपल्या पूर्वजांनी पृथ्वीची व्याख्या ‘गंधवती पृथ्वी’ आणि आकाशाची व्याख्या ‘शब्दगुणकं आकाशम्’ अशी केली आहे. या सूत्रमयतेत केवढा मोठा अर्थ दडलेला आहे! सर्व प्रकारचे धन, धान्य, वृक्ष, वेली, पुष्पसृष्टी, फलसृष्टी इत्यादींचे आदिबीज या पृथ्वीच्या गर्भात आहे. ही मृण्मयी आपली माता आहे. सारी भौतिक सृष्टी तिच्या उदरातून जन्म घेते. ती मूर्त स्वरूपाची. ती जन्मते आणि कालान्तराने मृत्यू पावते, पण ती नष्ट होत नाही. नव्या संजीवक रूपात ती पुन्हा जन्म घेते. जन्मते आणि मरते ते जग. ते सान्त. या मृण्मय पृथ्वीला तोलून धरणारे हिरण्यमय आकाश आहे. ते अमूर्त आहे. ते अनंत आहे. या दोहोंच्या समवायातून ‘विश्‍व’ ही संकल्पना साकार झाली आहे. पार्थिवता आणि अपार्थिवता यांच्या संगमातून त्याला परिपूर्णता प्राप्त झाली आहे. आपल्या चर्मचक्षूंनी या विश्‍वाच्या विराट पसार्‍याकडे पाहताना काय दिसते- ते सुंदर दिसते. या सौंदर्यामुळे आनंद होतो. आनंद ही जीवन जगण्यातील परिसीमा होय. माणसाची सारी धडपड आनंदासाठीच आहे.
सत्-चित्-आनंद ही जीवनातील त्रिपुटी. या त्रिपुटीचा संगम म्हणजे जीवन. माणूस भौतिक सृष्टीत आपले जीवन जगत असताना अनेक चुकांमुळे अनेक दुःखे आपण होऊन निर्माण करतो. रूपवान जग विरूप करतो. त्याला कधी पश्‍चात्ताप होतो. बर्‍याचदा अहंकारामुळे तोही होत नाही. या छोट्या चुकांचा घोर परिणाम होतो. पण वेळ निघून गेलेली असते. मग त्याचे डोळे आकाशाकडे लागून राहतात. सान्ताला लागलेली ही अनंताची ओढ. चर्मचक्षूंनी पाहिलेले जग आता अंतःचक्षूंनी पाहिल्यावर ते पहिल्यापेक्षा अधिक सुंदर दिसते. ही किमया आहे असीम आकाशाची! अथांग आकाशाची. आकाशाच्या निळाईची. आकाशाच्या निरामयतेची.
विनोबाजी म्हणतात, ‘‘आकाशदर्शनाने आपणास आनंद होतो. आकाशाकडे बघत रहा, कुणालाही थकवा येणार नाही.’’ आकाश कुठल्याही प्रहरी पहा. झुंजूमुंजू होताना आकाशाकडे बघा. काळोखाचे डाळिंब फुटून त्याच्या बिया सर्वत्र विखुरलेल्या दिसतील. सकाळच्या प्रहरी पूर्वाचलावरील सूर्यबिंबाकडे पाहा. त्याच्या कोवळ्या किरणांचे सुवर्णरंग आकाशाने असोशीने पिऊन घेतलेले दिसतील. बारा तास विश्‍वगोलाने अंधकारात घालविले होते ना! मध्यान्हीच्या आकाशाची रूपेरी कळा पहा. तप्त असूनही तृप्त करणारी. त्याकडे पाहण्याची सहनशीलता मात्र हवी. श्यामायमान आकाशाची शोभा काय वर्णावी? फिकट निळ्या नभात नाना रंगांचे विभ्रम! परस्परांत मिसळलेले, पण आपली स्वतंत्र आभा राखून अस्तित्व दाखविणारे. मग येते सृष्टिचक्राला व्यापून टाकणारी विभावरी. रात्रीचे आकाश नक्षत्ररंगांनी फुलून येते. पौर्णिमेचे पूर्णबिंब त्याबरोबर दिसले की लहानपणी ऐकलेली ‘सूपभर लाह्या; त्यांत एक रुपया’ ही म्हण मनाच्या पटलावर स्मरणोज्जीवित होते. कोजागिरी पौर्णिमेचा आनंद अनोखा; चैत्रपुनवेची नजाकत निराळी. आकाश तेच. चंद्राचे पूर्णबिंब तेच. पण पृथ्वीवरील पर्यावरणाच्या विविधतेमुळे आणि भारतीय मनाच्या सांस्कृतिक संचिताच्या आविष्कारामुळे या पौर्णिमांनादेखील वृत्तिविशेष प्राप्त झालेला आहे. मृण्मय आणि हिरण्यमय यांचा समतोल साधण्याचा हा प्रयत्न. आकाश म्हटल्याबरोबर आपल्या मनात संचलन होते ढग, वारे आणि पाऊस या आकाशमाऊलीच्या अनेक आविष्कारांचे. तिचे आशीर्वचनच मानवाला त्याच्या पोषणासाठी आणि सृजनशीलतेच्या विकासासाठी लाभलेले आहे. आकाश हा ‘खगोल’ आहे. त्यात आपणास सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, नक्षत्रे आणि दीर्घिका दिसतात. पृथ्वी हा सूर्यकुलाचा एक घटक. अनेक ग्रह आणि उपग्रह मिळून सूर्यकुल बनलेले. सूर्यासारख्या अगणित तार्‍यांचा समूह म्हणजे आकाशगंगा. तीच ही दूधगंगा. असे अनेक समूह अवकाशात आहेत. त्यांना दीर्घिका असे संबोधले जाते. सूर्यकुल ज्या दीर्घिकेत आहे तिला ‘आकाशगंगा’ म्हणतात. आपल्याभोवती जेवढे म्हणून लहानमोठे तारे नुसत्या डोळ्यांनी पाहता येतात, ते सर्व आकाशगंगेतच आहेत. समान गुणसूत्रे असलेल्या तार्‍यांचा पुंज होतो, त्याची आकाशगंगा होते असे मानले जाते. या तार्‍यांशिवाय आकाशगंगेत अभ्रिका, रूपविकारी तारे, तारकायुग्मे आणि तारकागुच्छ असे निरनिराळे घटक आहेत. या मांदियाळीचे दृश्य आल्हाददायी असते.
आकाशात ध्रुवतारा, व्याध नक्षत्र, शुक्रग्रह आणि सप्तर्षिमंडल आहे. मंगळ, बुध आणि शनी इ. ग्रहांनी आकाश मंडित झाले आहे. कवी-लेखकांनी आपापल्या प्रतिभाशक्तीने सृजनशीलता प्रकट केली आहे. भिन्न भिन्न अभिरुचीच्या सृजनशील कलावंतांना आकाशस्थ ग्रहगोलांविषयी वाटणारे आकर्षण हे त्यांच्या अपार्थिव सौंदर्याविषयीच्या कुतूहलात आहे. आदिम मूलस्रोताकडे जाण्याच्या प्रेरणेत आहे. चिंतनशीलतेत आहे. तार्‍यांचा उदयास्त हादेखील त्यांच्या चिंतनाचा विषय. आकाशात दृश्यमान होणारे तेजस्वी सप्तर्षिमंडल माणसाला खुणावत आलेले आहे. त्याने त्यांना मरिचि, अत्रि, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतु आणि वसिष्ठ अशी नावे दिली. एका तारकेस ‘अरुंधती’ हे नाव दिले. ग्रामीण परिसरात तर ‘खाटले कमळे’ हे साधेसुधे नाव देऊन टाकले गेले. ही नावे देताना त्यांच्या वृत्तिवैशिष्ट्यांचा त्यांनी नक्कीच विचार केला असणार. पाश्‍चात्त्य जगाच्या संकल्पना निराळ्या व पौर्वात्त्य जगाच्या संकल्पना निराळ्या. त्यांनी त्यानुसार ग्रह-तार्‍यांना नावे दिली आहेत. त्यांच्याभोवती मिथ्यकथा गुंफल्या आहेत.
ऋषिमुनींपासून आधुनिक कवींपर्यंत अनेकांनी आकाश हा आपल्या चिंतनाचा विषय बनविलेला आहे. हा क्षितिजविस्तार सहजतेने आपल्या कवेत घेणे अशक्य. बा. भ. बोरकरांच्या ‘आकाशमाऊलीस’, ‘आकाशाचा छंद’ व ‘आकाशींचे रंग शुष्क’ इत्यादी कविता आठवतात. कुसुमाग्रजांचे ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ आठवते. मंगेश पाडगावकरांची ‘शुक्रतारा मंद वारा’ ही कविता आठवते. वर्षाकालीन ऋतूचे वर्णन करताना आभाळातील रंगतरंगांचे वर्णन येणे अपरिहार्य. मग ते कवितेत असो अथवा दुर्गाबाई भागवतांच्या चिररुचिर आणि चिरप्रसन्न अशा ‘ऋतुचक्र’मधील काव्यात्म ललित निबंधातील असो. कालिदास आणि रवींद्रनाथ हे या संदर्भातील भारतीय साहित्यसृष्टीतील मानदंड आहेत.
सहज विचार मनात येऊन जातो, आसमंताच्या क्षितिजतलावर आकाशाचा घुमट नसता तर पृथ्वीगोल कसा दिसला असता? सारे चित्रच बिघडून गेले असते, नाही का? निळ्या समुद्ररेषेशी भिडलेल्या हिरव्यागार डोंगररांगा, दूरच्या डोंगरांचे जांभुळसर रंग आणि उदयकाली-अस्तकाली आभाळाचे भाळ रंगविभ्रमांनी जसे नटलेले दिसते तसे नसते तर… वसुंधरेचे लावण्य खुलविणारे आकाश हे निळे वस्त्रप्रावरण आहे. पृथ्वी आणि आकाश यांच्या समतानतेत विश्‍वचक्राचा समतोल साधला गेला आहे व सौंदर्यही खुलले आहे. हा शुभंकर शक्तीचा आणि सृजनशीलतेचा योग आहे.
आणखीही एक विचार मनाला स्पर्श करून जातो. अमरत्वाची वाट क्षणभंगुरतेकडून पुढे जात असते. सान्त स्वरूपातील सत्य अनन्त सत्याकडे नेत असते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचे विचार यासंदर्भात मननीय आहेत. ‘सान्त आणि अनन्त हे परस्परांशी संलग्न असल्यामुळे त्यांची ताटातूट करणे धोक्याचे आहे.’ त्यांनी ईश उपनिषदाचा आधार दिलेला आहे ः
‘‘जगाची उपासना करणारे अंधारात आहेत. परंतु केवळ अनंताची उपासना करणारे अधिक अंधारात आहेत. ‘जग’ आणि ‘अनन्त’ दोन्ही मान्य करणारा मनुष्य ज्ञान संपादन करून मृत्यूपासून बचाव करून घेतो आणि अनंताचे आकलन करून अमर बनतो.’’
मृण्मय आणि हिरण्यमय यांच्या संगमातून श्रेयसाची वाट गवसते. माती आणि आकाश यांमधील अनुबंध हा असा आहे.
(अपर्णा अनिल राऊत)

17 

Share


अपर्णा अनिल राऊत
Written by
अपर्णा अनिल राऊत

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad