Bluepad | Bluepad
Bluepad
सुजल सतीश मदने
सुजल सतीश मदने
14th May, 2022

Share

भक्तीचे प्रामुख्यानं दोन प्रकार आहेत. एक कर्मअज्ञान भक्ती आणि दुसरी मनज्ञान भक्ती. अज्ञानामध्ये कर्मकांड काठोकाठ असतं. तिथं सदसद्‍विवेकाला थारा नसतो. पारंपरिक प्रवाहात त्यांचा भक्तियोग सुरू असतो. याच प्रकाराशी समांतर असा साधुयोगही असतो. ते अंगाला भस्म फासून रुद्रामाळा धारण करत तपादी साधना करीत असतात. उपास-तापासही कर्मकांड भक्तीतच मोडतात. कपाळाला गंध-बुक्का लावून भजनात संमोहित झालेले भक्तही याच वर्गात येतात. यामुळे काय साध्य होतं? परमेश्वराशी संवाद होतो की आत्मसाक्षात्कार होतो की केलेल्या पापांचे क्षालन होते?
यापैकी कशाचंही काही होत नाही. पण एक असत्य समाधान त्यातून मिळविता येते. तोही एक भ्रम असतो. गंगेत डुबकी मारताच पापं धुवून निघातात, नवसानं पोरं होतात या सर्व भ्रमभयंकर गैरसमजुती आजही जाता जात नाहीत. धनप्राप्तीच्या आसुरी लालसेनं काही लोक लक्ष्मीपूजनात मूठभर द्रव्य खर्चून हंडाभर संपत्तीप्राप्तीचा प्रयोग करीतच राहतात. असत्याच्या आसऱ्यानं आयुष्य रंगवणारे असत्यच नारायणाचा धावा नाही तर कुणाच्या करणार? म्हणूनच मला सतत प्रश्न पडतो, की खरी भक्ती कोणती? आणि भक्ती म्हणजे नेमकं काय? संतांच्या वचनांप्रमाणं ‘हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा। पुण्ण्याची गणना कोण करी?’ हरी-हरी असा जप केल्यानं पापांचं पुण्ण्यात रूपांतर होतं काय? चला, एकचित्त होण्यासाठी नामस्मरणांचा ध्यास गृहित धरू या! ज्याचा विवेक जागा नाही त्याला चित्त एकाग्रतेत काय चाललंय, ते तरी कसं आकलन होणार हाही प्रश्नच आहे.
चित्ताचं चैतन्य चेतलं की ज्ञानसूर्याचा साक्षात्कार होतो. तो काही विवेकी संतांसह विचारवंतांनाही होतो. विवेकी संत माणसा-माणसात माणुसकीचे अर्थात दया-प्रेम-करुणेचे पूल बांधत असतात. परोपकारातून परमेश्वराशी त्यांचं नातं जुळवत असतात. दुसरा एक संत प्रकार आहे लहरीबाबांचा, सतत मौनाचं नाटक करून हजारोंना नादी लावण्यात कुशल असलेल्या बुवांचा, प्रवचनांचं संमोहन वापरून जणू तो ईश्वर मलाच कळला आणि माझ्यावर भाळला असा बनाव निर्माण करणाऱ्यांचा. हाही देवसंगतीचा दावा करणाऱ्यांचा एक वर्ग आहे. या लोकांच्या चरणांशी सर्व सुखं शरण असतात. तिथं कनक-कांतांचा सुकाळ असतो. कित्येक मती मारलेले भक्त आपल्या लेकीसुना या ‘पहुंचे हुए’ लोकांच्या नादी लावतात. सत्तेतील ‘सत्ते’ आणि राजकारणातील ‘पत्ते’ही त्यांच्या आशीर्वादासाठी टपून असतात. हा सर्व कर्मअज्ञान भक्तीचा ‘भांगडा’ आहे.
कृष्णकथा-रामकथा किंवा पीरकहाण्या कानांशी बिलगल्यानं आपण ईश्वरप्रिय होतो असा कुणाचा गोड गैरसमज असेल तर तो भाबडेपणा आहे. ईश्वर समजण्यासाठी येशूएवढा त्याग आण‌ि कष्ट उपसावे लागतात. कबीर-ज्ञानोबा-तुकोबाइतकं आत्मबोधन अनुभवावं लागतं. हीच खरी मनज्ञान भक्ती. मनाचे अंत:पदर उकलत निर्मळ तळाशी जाता आलं की निर्मिकाचं केंद्र कळतं. हा मार्ग जनसामान्यांना परवडण्यासारखा नाही. म्हणूनच ते कर्मकांडांच्या थोतांडाला ब्रह्मांडाचा साक्षात्कार समजतात.
संतांनी भक्तीचे विविध प्रकार सांगितले आहेत. नवविधा इत्यादी. आपण त्या अवघड मार्गांपेक्षा ‘मानुषता’ मूल्य धारण करणाऱ्या सरळ-साध्या भक्तीकडेच वळलेलं बरं!
ब्रह्मज्ञानाचं चक्रव्यूह सोपं नाही. ब्रह्मज्ञानी महाभागालाही ईश्वर दर्शन असंभव आहे. कारण ईश्वर कुणालाही दर्शन देत नाही. सूर्यकिरणांनी सूर्याचाच शोध घेण्यासारखा तो अज्ञानी प्रकार आहे. म्हणूनच रोज काही क्षण आत्मशोधात व्यतीत करीत राहिल्यानं कुठल्या तरी क्षणी आपण आपल्या सत्य-असत्यासह आत्मदर्पणापुढे येतोच!

51 

Share


Written by
सुजल सतीश मदने

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad