मानवी जीवनाचा सार म्हणजे भगवद्गीता...
सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णाने मोहग्रस्त असलेल्या अर्जुनाला युद्धभूमीवर गीता सांगितली. जीवनमूल्यांच्या संरक्षणासाठी आणि प्रतिष्ठेसाठी लढणे हे क्षत्रियांचे आद्यकर्तव्य आहे. जीवन मूल्य पायदळी तुडवून अन्यायाने वागणारे कितीही जवळच्या व्यक्ती असोत त्यांचे बलिदान देणे हे क्षत्रियांचे कर्तव्य ठरते असा संदेश गीतेने दिलेला आहे.
धर्मराज याची स्थापना करण्यासाठी जेथे युद्ध करणे अपरिहार्य होती तेथे युद्ध श्रीकृष्णाने केले आणि करवीले आहे. दुष्कृत्य करणाऱ्यांचा विनाश केला नाही तर सज्जनांना शांततेने जगणे अशक्य होईल याचा अनुभव आपण घेतला आहे घेत आहोत..
मध्यंतरी तुर्कस्तानचे राजा भारतात घेऊन गेले तेव्हा ते म्हणाले होते की माझ्यासमोर कठीण प्रसंग येतात तेव्हा तेव्हा मी गीतेचा आधार घेतो काय हा विरोधाभास आहे नाही... रशियातील सायबेरियातील काही रहिवाशांना गीतेवर बंदी घालावी असे वाटले कारण गीता युद्धाला प्रोत्साहन देते. खरंतर ...गीता मानवी जीवनाच्या कल्याणासाठी भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचे निमित्त करून अखिल मानवी समाजाला गीता सांगितली आहे. जीवनाची विकसनशील परंपरा कायम टिकून राहील अशा तत्त्वांचा समावेश गीतेमध्ये केलेला आहे. ही तत्त्वे देश कालातीत आहे याचाच प्रत्यय म्हणून तुर्कस्तानच्या राज्याच्या निमित्त्याने आलाय आणि म्हणूनच गीता केवळ हिंदूची नाही तर अखिल मानवजातीसाठी आहे. विश्वशांतीसाठी जीवन मूल्यांच्या रक्षणार्थ भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धासाठी उद्युक्त केले, कोणीही उठावे शस्त्र हाती घ्यावे असा याचा अर्थ नाही.
गीतेमध्ये मनुष्य वाणीचा अर्थ सीमित आहे परंतु गीता तर भगवंताची विशाल वाणी आहे. गीते मध्ये एकूण 18 अध्याय आहेत आणि गीतेमधील "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन" ही एकश्लोकी गीता आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. यातच गीतेचे सार साठवलेले आहे. कर्तव्यकर्म कर पण फळाची आशा ठेवू नको हा संदेश यामध्ये दिला आहे. एवढ्या एकाच तत्त्वाचे चिंतन-मनन परिशीलन आचरण असे केले तरीही खूप काही आपण कमावू शकतो.
थोडक्यात असे म्हणता येईल की कर्तेपणा ठेवू नको म्हणजे फळ आपोआप कृष्णार्पण होतो. कर्तव्य कर्म म्हणजे प्रयत्न अवश्य कर फळावर दृष्टी ठेवू नको फळ विरहित कर्म केल्यामुळे अपेक्षाभंग होणार नाही आणि त्यामुळे होणारे दुःख होणार नाही. माणूस कर्मात अडकून पडणार नाही, फळाची अपेक्षा करणार नाही, मनावर यशापयशाचा ताण राहणार नाही, त्यामुळे कर्म अधिक चांगले करता येईल. शुद्ध हेतूने कर्म केल्यास चिंता पडत नाही आणि शुद्ध हेतू सुद्धा शुद्धच राहतो वैयक्तिक भावनेवर विजय मिळवण्यासाठी मदत होते. "नियतं कुरु कर्म त्वां" " तुझे कर्म तू कर असेच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे.
या जगात आपल्या वाट्याला आलेले कर्म केले पाहिजे हा कर्मयोग भगवान श्रीकृष्णाने स्वतः केलेला आहे.लोकमान्य टिळकांनी गीतेतून कर्मयोग घेतला आणि गीतारहस्य ची निर्मिती केली. खरे तर कर्म कोणीच टाळू शकत नाही ज्ञानेश्वर म्हणतात, विहित कर्म पांडवा l आपुला अनन्य ओलावा l आणि हेचि परमसेवा मज सर्वात्मकाची ll
धर्म, अर्थ, काम, मोक्ष, ह्या चार पायांवर हिंदू धर्म आधारलेला आहे याचाच पुरस्कार गीतेने केलेला आहे मोक्ष प्राप्तीचे चार मार्ग गीतेत सांगितले आहे ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग म्हणूनच प्रत्येकाने बुद्धीने ज्ञानयोग, हाताने कर्मयोग, मनाने भक्तियोग करावा असंच गीतेतून ध्वनित होत. हटयोग हा योग्यांसाठी, ऋषीसाठी आहे परंतु तोही आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे प्रत्येकाला जाणवत. प्राणायाम चे महत्व आणि त्याची उपयुक्तता हृदयरोगतज्ञ ही मानतात. नव्यारोगांना सांगतात म्हणजेच हा प्रयोगही सामान्यांसाठी योग्य असाच आहे.
गीतेचे तत्वज्ञान हे खरं तर दैववादी नसून खऱ्या अर्थाने प्रयत्नवादी आहे. गीतेत कर्मफल त्याग सांगितले आहे, कर्म त्याग नव्हे. फळाची अपेक्षा नसणारा तरीही कर्तव्य कर्म करण्यास जो बांधील आहे तोच खरा निष्काम कर्मयोग आहे अशी शिकवण देणार्या विचाराला दैववादी म्हणू शकत नाही.
© # डॉ. स्वाती मोहरीर
९४२२१०१८६२