सृष्टीचा सृजनोत्सव :-उन्हाळ्यातील हिरवाई आणि पुष्पवृष्टी!
उन्हाळा विशेष स्पर्धा
निसर्गाने अखिल चराचरात मानव आणि प्राणी जातीला बहाल केलेली निसर्गाची नवलाई ही खरोखरच कोणत्याही मोठ्या चमत्कारा पेक्षा श्रेष्ठ आहे. या चराचर सृष्टीतील अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मानवाच्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत. काळी म्हैस आहे. हिरवा चारा खाते आणि पांढरे दूध देते. चैत्र आणि वैशाख भर उन्हाळा आहे. परंतु जेव्हा येथे वसंत ऋतू धरणीवर आगमन करतो त्यावेळेला या सृष्टीचा सृजनोत्सव आम्हाला पाहायला मिळतो. घरात अंग अंगाची लाहीलाही होत असताना बाहेर एक नजर टाकली तरी आम्हाला या निसर्गाची नेत्रदीपक हिरवाई सतत आनंद देण्याचे काम करते. भर उन्हाळ्यात निसर्गाचे चक्र किती अनाकलनीय आहे याची आम्हाला पदोपदी अनुभूती होते.
आमच्या अंगणात आम्ही पंधरा वीस वर्षापूर्वीआंब्याचे लहान रोपटे लावले होते. त्याला खत पाणी देऊन खूप मोठे केले. पाच सहा वर्षांपासून या आंब्याला सुगंध पसरवणारा मोहोर येतो. वाऱ्याची मंद झुळूक जेव्हा दशदिशा वाहते त्यावेळेला हा मोहोर सर्व परिसराला सुगंधित करतो. तन आणि मन प्रफुल्लित होते. काही दिवसात लगेच याला लहान लहान कैऱ्या लागतात. महिनाभरात या कैऱ्या खायला मिळतात. आणखी पंधरा-वीस दिवस गेले की याच्या मधली कोय पक्की होते. पुन्हा हे सुमधुर आम्रवृक्ष फल आम्हाला लोणचे उपलब्ध करून देते. आणखी पंधरा-वीस दिवस पुढे गेले की हिरवीगार असलेली कैरी मग पिवळ्या केशरी रंगात परिवर्तन होते आणि त्याचा आंबा आम्हाला मिळतो. हा आंबा रसदार असून मधुर रस खाण्याची आम्हाला संधी या निसर्गातून उपलब्ध होते. किती किमया आहे या निसर्गाची? नाही का!
असाच आमच्या दारी मस्तपैकी गुलमोहर आहे. जानेवारी-फेब्रुवारीत याची पूर्णपणे पानगळ होते. पुन्हा फाल्गुन महिना लागला की हिरव्या पानांनी हा गुलमोहर फुलतो. पुन्हा चैत्र आणि वैशाखात भर उन्हाळ्यात नयनरम्य फुले त्यावर येतात. गुलमोहर झाडावर चारी बाजूला नजर टाका तुम्हाला आनंद देणारा सुंदर सा फुलांचा अनोखा नजारा येथे पाहायला मिळतो. दीर्घकाळ हा फुलांचा नजारा दृष्टीला सुखद गारवा उपलब्ध करून देतो.
त्याच्या शेजारीच कडुनिंबाचे झाड आहे. याची ही अवस्था गुलमोहरा सारखीच होते. डिसेंबर-जानेवारीत याची पानझड होते आणि पुन्हा चैत्र लागण्याच्या आधी याला पूर्ण हिरवी नवतं पालवी येते पालवी आली की लगेच या कडूनिंबाचा फुलोरा एवढा आनंददायी असतो ही ते सांगण्यासाठी शब्द नाही. भूमीवर ज्या वेळेला हा फुलोरा खाली सांडलेला असतो त्या वेळेला असे वाटते की या निसर्गाने किती सुंदर अशी रांगोळी आमच्यासाठी काढून ठेवली आहे!
माझ्या अंगणातील मोगऱ्याची काय कथा वर्णन करावी? रोज हा मोगरा सकाळी सकाळी त्याचा गंध आम्हाला मोहीत करतो. सायंकाळी माझ्यावरील फुले वाळून जाणार आहे तेव्हा तू परळी मध्ये तोडून घे आणि देवाच्या चरणी अर्पण कर तुझ्या घरात या मोगऱ्याच्या फुलांचा घमघमाट राहील! असा संदेश तो मला देतो त्या वेळेला हा आनंद काय वर्णन करावा?
पारिजातकाचा पडलेला सडा, रातराणीचे रात्री फुलणारी फुले मनाचा उत्साह वाढविणारे असतात. जेव्हा आम्ही रानावनात फेरफटका मारायला जातो त्यावेळेला पळसाचे सौंदर्य ओसंडून वाहते. लदबदलेली फुले भुमा पेवर जनु वर्षाव करताना दिसतात. अशी ही निसर्गाची किमया तो किमयागार भर उन्हाळ्यात बरे कशी साधतो?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा सुपरहिट मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रोहिणी नक्षत्र लागते त्या वेळेला भुमाता तिच्या पोटात बीज साठवण्याचे काम करते आणि मृग नक्षत्राचा पाऊस झाला की पुन्हा एकदा सर्वत्र हिरवळ दाटायला लागते. या विश्वातील खरी सर्जनशीलता निसर्गामध्ये दडलेली आहे. वरुणराजाने मेघान सह वर्षाव करावा आणि ते पाणी भूमातेने आपल्या उदरात साठवावे त्या पाण्याचा आम्ही सदुपयोग करावा आणि पुन्हा एकदा हा निसर्ग बहरावा.... हे सारेच माणसाच्या बुद्धी पलीकडचे आहे.
हा निसर्गाचा किमयागार अशी किमया साधतो की भर उन्हातही नेत्रदीपक शांती आणि आनंद मुक्तहस्ताने अखिल विश्वावर उधळण करत राहतो. या आनंदाला आणि शांतीला जो स्वीकार करतो तो भाग्यवंत नाही काय?