आजचा विषय थोडा वेगळा आहे. आजच्या लेखातून आपण जगायचं कसे ते शिकूया. जन्माला आलेला प्रत्येक जण जगत असतो. पण तो दुसऱ्यासाठी जगत असतो, दुसऱ्यासाठी त्रास सहन करत असतो, दुसर्याच दुःख स्वतःवर घेत असतो. कधी आपल्या बायकोसाठी, तर कधी आपल्या घरातल्या प्रिय व्यक्तींसाठी,तर कधी मित्रांसाठी,तर कधी समाजासाठी, कधी घरासाठी. प्रत्येक वेळी आपण दुसऱ्या व्यक्तींचा विचार करत असतो. पण आयुष्यात स्वतःसाठी जगण्यासाठी माणसाला वेळच नसतो. इतकं सुंदर आयुष्य देवाने आपल्याला दिलेल आहे पण आपण त्याचा कधी विचारच करत नाही. किती सुंदर हात, किती सुंदर डोळे, किती सुंदर शरीर, इतका चांगला आपला मधुर आवाज, आपला चेहरा. तुम्हीच बघा ना किती सुंदर गोष्टी देवाने आपल्याला दिलेल्या आहेत. थोडा वेगळा विचार करून प्रत्येकाने स्वतः साठी जगल पाहिजे. गाणं जरी येत असलं तरी गायलं पाहिजे, चार मोडके तोडके शब्द रचून का होईना पण एक कविता केली पाहिजे, हातामध्ये ब्रश घेऊन निसर्गाबरोबर चित्रे काढली पाहिजे, या धकाधकीच्या जीवनामध्ये एक दिवस मोबाईल घरामध्ये ठेवून भटकंती केली पाहिजे. बघा बाहेर एक वेगळीच दुनिया तुम्हाला बघायला मिळेल. मी असं म्हणत नाही आहे कि तुम्ही काम सोडा आणि दररोज फिरायला जा. पण आठवड्यातला एक दिवस स्वतःसाठी काढा आणि तो आनंदाने जगा. उंच टेकडीवर जाऊन कधीतरी मोठ्याने ओरडून बघा खूप मजा येईल, आपलाच आवाज आपल्याला एका वेगळ्याच लई मध्ये ऐकायला मिळेल. पाण्यामध्ये मोकळे पाय ठेवून बसल्यानंतर बघा मासे आपल्या पायाला गुदगुल्या करतील तेव्हा खूप मजा येईल, बागेमध्ये बसल्यानंतर एखाद्या भटक्या भुकेल्या कुत्र्याला बिस्कीटचा पुडा टाकून बघा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला खूप मजा देऊन जाईल. गाडी सोडून कधीतरी एकटेच कानामध्ये हेडफोन घालून आपल्याला आवडती गाणी ऐकत रस्त्यावरती चालत फिरा बघा तुम्हाला खूप मजा येईल. संध्याकाळच्या वेळी समुद्राच्या किनाऱ्यावर बसून मित्रांबरोबर जुनी गाणी गाऊन बघा खूप मजा येईल. एक दिवस वेळ काढून नदीमध्ये किंवा तलावामध्ये पोहायला जा निसर्गाबरोबर आंघोळ करण्याची मजाच वेगळी असते. कम्प्युटर किंवा मोबाईल दररोज आहेच पण एक दिवस हातामध्ये एक पेन आणि वही घेऊन तुमच्या मनातले जे काही विचार असतील ते लिहून काढा बघा पेनातली एक वेळ शाही संपेल पण तुमच्या मनातले विचार संपणार नाहीत. कॉलेजमधील जुने दिवस आठवून बघा अहो मोबाईलचा विसर कधी पडला तुम्हाला कळणार सुद्धा नाही. काम काय दररोज आहेच पण एकटे फिरण्याची मजा आहे ना ती कशातच नाही. म्हणूनच मी सुरुवातीला म्हणालो होतो की स्वतःसाठी जगा तुम्हाला खूप आनंद मिळेल. रोज ऑफिस मधला मशीन मधील चहा पिण्यापेक्षा एक दिवस वेळ काढून टपरी वरील चहा आणि मस्त झणझणीत वडापाव खाऊन बघा तुम्हाला खूप मजा येईल. लहान मुलांसारखा बोबडे बोलून बघा, आरशामध्ये एकटक स्वतः कडे बघत राहा, मोकळ्या मैदानावर स्वतःशीच पळण्याची स्पर्धा लावा, अनोळखी व्यक्तीची मदत करून बघा, मांजराच्या पिल्लाला जवळ घ्या आणि त्याच्याशी तासन्तास खेळा, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्हाला इतका आनंद मिळेल की तुम्हाला आठवडाभर काम करण्याची नवीन ऊर्जा मिळेल आणि तुम्ही अधिक जोमानं काम करू शकाल. एखाद्या झाडावर चढून आंबे तोडून बघा, गुलाबाच्या रोपट्याला पाणी घालून बघा तुम्हाला तुमचे जूने बालपणीचे दिवस आठवतील. बघा शक्य झाले तर एक दिवस आठवणीने स्वतःसाठी काढा आणि स्वतःसाठी जगा नुसते जगू नका तर मनमुराद जगा.
आज आपण जन्माला आलो आहे माहित नाही उद्या आपल्याला जन्म मिळणार की नाही म्हणूनच म्हटलं हसत हसत जगा आणि स्वतःसाठी जगा.