जत्रेमध्ये एक आरशांची खोली असायची. वेगवेगळ्या प्रकारचे आरसे. त्यांच्यासमोर उभं राहीलं की मजेदार प्रतिबिंब दिसायची. जाडी, बारीक, उंच, ठेंगणी, तोंड वाकडं झालेली, मान लांब झालेली. बघताना हसायला यायचं. आणि हसत खिदळत आपण त्या खोलीबाहेर पडायचो. ती प्रतिबिंब बघून आपल्याला कधी नैराश्य नाही आलं. मी केवढी जाडी आहे किंवा मी किती बुटका आहे किंवा माझा चेहरा वेडावाकडा आहे असं वाटून आपण दुःखी नाही झालो. कारण आपण कसे दिसतो ते आपल्याला माहीत होतं. त्या आरशांनी आपल्याला दाखवलेलं आपलं प्रतिबिंब हे त्या आरशांच्या प्रकारावर अवलंबून आहे हे आपल्याला कळत होतं. आपल्या आजूबाजूची माणसं सुद्धा या आरशांसारखी असतात. त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीनुसार, त्यांच्या परिस्थितीनुसार ते आपल्याला आपलं प्रतिबिंब दाखवत असतात. लेबल लावत असतात. आपल्या एखाद्या कृतीवर चार लोकांची चार वेगळी मतं येऊ शकतात ते यामुळेच. पण आपण मात्र त्या मतांमुळे निराश होतो. खचून जातो. कारण आपण कसे आहोत याबद्दल आपल्यालाच खात्री नसते.म्हणूनच स्वतः ला ओळखाव.तटस्थपने स्वतः च मूल्यमापन करावं.आवश्यक तिथे योग्य बदल स्वतः मध्ये करावा.मग त्यानंतर भलेही कोणी कोणताही आरसा आपल्या समोर धरला किंवा कोणतंही लेबल लावलं तरी त्याचा विचार न करता पुढे चालत राहावं.. अगदी बिनधास्तपणे.