Bluepad | Bluepad
Bluepad
तेजोपुरूष छ. संभाजी महाराज
Rajendra Ghadge
Rajendra Ghadge
14th May, 2022

Share

*|| तेजोपुरूष छ. संभाजी महाराज ||*
छत्रपती संभाजीराजे जसे वीर पराक्रमी योध्दे होते तसेच ते संस्कृतचे गाढे अभ्यासक आणि थोर ग्रंथकर्ते होते. संभाजीराजांचे आजोबा म्हणजे शहाजीराजे हे संस्कृत भाषेचे जाणकार होते. फारसी, कन्नड, तेलगू, मराठी इ. भाषा त्यांना ज्ञात होत्या. संभाजीराजे या आपल्या आजोबांचाच वारसा पुढे चालवित होते. त्यांचेही पाली, भोजपुरी, फारसी व संस्कृत अशा अनेक भाषांवर प्रभुत्व होते. संभाजीराजांनी अगदी कुमार वयातच "श्री बुधभूषणम्" नांवाचा संस्कृत ग्रंथ लिहिला. बुध म्हणजे शहाणा किंवा बुध्दिने थोर. आणि भूषण म्हणजे दागिना किंवा अलंकार. अर्थातच, बुधभूषण म्हणजे "विद्वानांचा अलंकार." संभाजीराजांनी याशिवाय नायिकाभेद, नखशिखा आणि सात-सतक असे ग्रंथ भोजपुरी हिंदी भाषेत लिहिले. गागाभट्टांसारख्या प्रती व्यास समजल्या जाणा-या महान पंडीताचीही प्रशंसा त्यांनी प्राप्त केली. संभाजी राजांची विद्वत्ता ही अशी थोर होती .
संभाजीराजांच्या विनंतीवरूनच गागाभट्टांनी "समयनय" हा ग्रंथ लिहिला. आणि विशेष म्हणजे या थोर पंडीताने तो ग्रंथ लिहून संभाजीराजांनाच अर्पण केला होता. यातच संभाजीराजांचे थोरपण सिध्द होते. तसेच संभाजीराजांनी ऐन तारुण्यात ग्रंथ लिहून त्या अनुषंगाने त्यांनी उद्भोदित केलेले सुविचार पाहिले की, या युवा राजास जाणीवपूर्वक व्यसनी, दुराचारी, राज्यबुडवा, विवेकशुन्य, विलासी असे संभोदून त्यांना बदनाम केले. हे एखाद्या पवित्र देवतेच्या मूर्तीवर घाण टाकून त्याची विटंबना करण्यासारखेच आहे.
शंभूराजांचे निष्कलंक व्यक्तिमत्व समजण्यासाठी त्यांनीच लिहिलेला 'बुधभूषणम्' हा ग्रंथ आपण सर्वांनी वाचला पाहिजे. राजा कसा असावा आणि राजनीती म्हणजे काय याविषयीचे अत्यंत समर्पक व सुयोग्य विवेचन हे स्वतः संभाजीराजांनी बुधभूषणम् या ग्रंथात केले आहे. आणि त्याप्रमाणेच त्यांनी आपले स्वत:चे आचरणही ठेवले होते. हे फार महत्वाचे ठरते.
राजाचे खरे शत्रू कोण हे सांगताना संभाजीराजे लिहितात की, राजाचे दुर्गुण हेच त्याचे सर्वात मोठे शत्रू असतात. राजे एवढंच सांगत नाहीत, तर राजाचे दोष किंवा दुर्गुण कोणते हे देखिल ते स्पष्ट करतात. क्र. ४२२ चा श्लोक ॥ अध्याय दुसरा ॥ हा त्यादृष्टीने मैलाचा दगड ठरावा.
*व्यसनानि च सर्वाणि भूपतिः परिवर्जयेत् ।*
*सप्तदोषा सदा राजा हातच्या व्यसनोदयाः ॥४२२*
राजाने सर्व दोष टाळले पाहिजेत असे सांगताना संभाजीराजे विशेष्वत्वाने सात दुर्गुण राजाचा पराभव किंवा सर्वनाश करु शकतात असे सांगतात. आणि ते सात गुण कोणते तर -
१.वाग्दंड म्हणजे दुस-यास टोचून बोलणे.
२.पारुष्य - म्हणजे कठोर बोलून दुस-याचा अपमान करणे.
३. दूरयातंच - म्हणजे संरक्षणाशिवाय राजाने स्वतः फार दूर जाणे.
४.पान- म्हणजे राजाने मद्यपान करणे, व्यसनाधीन होणे
५. स्त्री- म्हणजे राजाने परस्त्रीशी संगत ठेवून स्त्रीलंपटपणाने वागणे.
६. मृगया - म्हणजे अकारण गरीब प्राण्यांची शिकार करणे आणि
७. द्यूत - म्हणजे राजाने जुगार खेळणे.
या दोषांचे किंवा दुर्गुणांचे परिणाम राजाच्या सर्वनाशाला कारणीभूत होतात याची जाण संभाजीराजांना होती. मग प्रश्न पडतो की, राजे स्वतः अशा दोषांना बळी पडतीलच कसे? आणि तसं असतं तर हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी या स्वराज्यवीरानं आपलं बलिदान तरी दिलं असतं का? ते मृत्यूला इतक्या धैर्यानं सामोरं गेले असते का?
म्हणजेच, वरील सर्व दुर्गुणांपासून संभाजीराजे दूरच होते हेच सिध्द होते. संभाजीराजांवर स्त्रीलंपटपणाचा आरोप करण्यात आला, तो सुध्दा धांदात खोटाच आहे. अतिशय विद्वान, संस्कृतचा गाढा अभ्यासक असे हे युवराज संभाजीराजे राज्यकारभारात कडक शिस्तीने वागणारे होते. हे भ्रष्ट मंत्र्यांना रूचत नव्हते. म्हणूनच ते कटकारस्थान रचत होते. संभाजीराजांची बदनामी करीत होते. खरं तर स्वत: शिवाजी महाराज माणसं पारखण्यात चाणाक्ष होते. स्वतःच्या मुलास त्यांनी स्वतः व जिजामातेसारख्या थोर आजीने घडविले होते. सुसंस्कृत केले होते. पण जन्मापासूनच संभाजीराजे दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकत राहिले. आणि अखेर मृत्युनेही त्यांना शांतपणे मुक्ती दिली नाही. तरीही आपल्या ज्वाज्ज्वल्य पराक्रमामुळे व बलिदानामुळे संभाजी महाराज इतिहास प्रेमींच्या मनात अत्यंत आदराचे स्थान प्राप्त करून राहिले. त्यांच्या अतुलनीय त्यागाला, धैर्याला व शौर्याला त्रिवार मुजरा! जय शंभूराजे.
लेखक (c): राजेंद्र घाडगे, सातारा.
संदर्भ :
1) छ. संभाजी महाराज : वा. सी
तेजोपुरूष छ. संभाजी महाराज
. बेंद्रे
2) सं.बुधभूषण: डॉ.प्रभाकर ताकवले
3) छ.संभाजी एक चिकित्सा : डॉ. पवार जयसिंगराव

61 

Share


Rajendra Ghadge
Written by
Rajendra Ghadge

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad