आजचं युग हे स्पर्धेचं युग मानलं जात. अगदी प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी स्पर्धा केली जाते.आता स्पर्धा म्हटलं की समोरच्यापेक्षा अधिक काहीतरी करायची उर्मी आली. त्याबरोबरच कळत - नकळत निर्माण होते ती इर्षा. समोरच्या व्यक्तीकडे जे काही आहे ते आपल्याकडे नाही याचा सतत त्रास होत राहणे, त्यातून मग त्या व्यक्तीबद्दल वाईट विचार करणे, त्या व्यक्तीला पूर्ण खोटे ठरवणे अशा अनेक गोष्टी घडतात. यातून काही चांगल साध्य होत नाही कारण नकारात्मक भावना , विचार कोणत्याही productive कामाला वाव देत नाहीत त्याउलट मुळात असलेली उर्जा, क्षमता weak होऊन जातात. याहूनही वाईट म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल ही नकारात्मकता असते तिच्यापर्यंतही याची झळ पोहोचते. ज्यामुळे तिचीही कार्यक्षमता कमी होते.कारण इतकी नकारात्मकता सर्वांना हाताळता येतेच असं नाही. मग अशी स्पर्धा काय कामाची ज्यामुळे फक्त नुकसानच होणार.
काय करायचं अशा वेळी? नुसता त्रास करून घ्यायचा का? त्यापेक्षा असं काही करता येईल का ज्यामुळे आपल्याला हवं ते ध्येय साध्य होईल आणि कोणाला काही त्रासपण होणार नाही.
अशावेळी या इर्षेला सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न करायचा. मान्य करायचं की समोरच्याकडे जे आहे ते माझ्याकडे नाही आणि ते शक्यही नाही कारण प्रत्येक व्यक्ती unique असते. पण म्हणून रडत बसायचं का? नाही. अशावेळी आपल्या क्षमता काय आहेत, आपल्या आवडी काय आहेत याचा विचार करायचा. या सर्वाचा माझ्या इच्छित ध्येयासाठी कसा उपयोग होईल ते पाहायचं. असं केल्याने आपल्याला हवं ते सर्व मिळतं. किंबहुना त्यापेक्षा जास्त मिळतं. त्यामुळे समोरच्या व्यक्तीकडे किती आहे याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला आपल्या पद्धतीने आणि विशेषतः चांगल्या मार्गाने त्या गोष्टी कशा मिळवता येतील याचा विचार करावा. सर्व आपोआप मिळतं.