Bluepad | Bluepad
Bluepad
'गणपतीपुळे'
दीप्ती
दीप्ती
13th May, 2022

Share

"मोरपीस"
' गणपतीपुळे '
'गणपती' प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचे श्रद्धास्थान... आराध्यदैवत.. मग ते अष्टविनायक असो की अष्टगणपती.असच एक सुप्रसिद्ध आणि जागृत असलेले गणपतीचे स्थान म्हणजे कोकणातले गणपतीपुळे ....
खूप लहान असताना गणपतीपुळ्याला जायचा योग आला.तेव्हा पुरातन मंदिर होते..आधुनिकतेचा लवलेश ही नव्हता..लाल परीने मजल दरमजल करत काही तासांनी करत गणपतीपुळ्याला पोचलो तेव्हा,तिन्ही सांजा झाल्या होत्या.उतरताच अंगाला खारा वारा झोंबू लागला .समुद्राची गाझ सातत्याने ऐकू येत होती.लाल मातीचा धुरळा उडवत लाल परी मार्गस्थ झाली.सभोवार नजर टाकली तर घनदाट हिरवी झाडी स्वागतासाठी सज्ज होतीच .लाल मातीची नागमोडी पायवाट त्या झाडीतून पुढे जाऊन कुठेतरी लुप्त झालेली.थोडे अंतर चालून गेल्यावर MTDC चे सुसज्ज सुशोभित असे विश्रामस्थान लागले.परंतु ते कार्याल्याची वेळ संपल्याने बंद होते.तेव्हा राहण्याची व्यवस्था मंदिराच्या भक्तनिवासात केली...
.... काळोख गडद होऊ लागला.सायंकाळचे सात वाजून गेले.मंदिर बंद झाले परंतु आमचे दर्शन झाले.प्रदक्षिणा मात्र घालता आली नाही.कारण तो मार्ग एका टेकडीशेजारुन जातो जो घनदाट जंगलाने वेढलेला होता.आणि जंगली जनावरे असल्याने सकाळी पुन्हा दर्शन घ्यायचे असे ठरवले.खाणावळ ही लवकर बंद होते असे समजले. मग आम्ही खाणावळ शोधली.खाणावळीपर्यत पोचायला 20 मिनिटे लागली. तिथे घरगुती पद्धतीचे साधेच परंतु रुचकर जेवण मिळाले.तिथून भक्तनिवासात यायला निघालो.आता अधिकच अंधारुन आले होते.वरती काळे आकाश... श्वेतवर्णी चांदण्या... किर्र किर्र नाद करणारे रातकीडे... कानावर सातत्याने पडणारी समुद्राची गाझ... आणि रस्त्यावरून आम्ही 6 7 जण......आम्ही आमच्याच पायरवाने दचकत होतो....
एखाद्या मराठी चित्रपटात शोभेल असे वातावरण होते.मनाला अतिशय शांतता देणारे....इतक्या तासांचा प्रवास करुन शिणलेले....आळसावलेले .....आणि जेवून तृप्त झालेली आमची शरीरे...जडावलेले डोळे घेऊन पाय रेटत होतो... भक्तनिवासातील आमच्या खोल्यांमध्ये येऊन केव्हा निद्रादेवीच्या अधीन झालो ते समजलेही नाही...
....पहाटे लवकर उठून,शुचिर्भूत होऊन पुन्हा मंदिरात गेलो.कोकणच्या समुद्रकिनारी वसलेले अत्यंत साधे, सुगठित मनाला भावणारे मंदिर....मंदिराला लागूनच असलेला स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा ... दोन दिवस खूप छान गेले ....मनात या सर्व सुखद आठवणींची शिदोरी घेऊन घरी परतलो...
'गणपतीपुळे'
✍©️®️☆ दीप्ती दावलभक्त ( याज्ञसेनी )

195 

Share


दीप्ती
Written by
दीप्ती

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad