Bluepad | Bluepad
Bluepad
एडमिन...
चंद्रशेखर दातार
चंद्रशेखर दातार
13th May, 2022

Share

एडमिन.....
एडमिन म्हणजेच एडमिनीस्ट्रेटर किंवा प्रशासक याचं प्रचलित आणी संक्षिप्त रुप. पूर्वी यांची संख्या फारच कमी असायची, म्हणूनच यांना विशेष महत्त्वही होतं. आता मात्र व्हाट्सअप नामक खेळामुळे एडमिनच्या संखेत एकाएकी प्रचंड प्रमाणात वृध्दी झाल्याचे पहायला मिळते. तसं पाहता टोळके (group) जन्माला घालणारा हा प्रमुख एडमिन, हवं तर याला टोळक्याचा पंतप्रधान म्हणा, पुढे काही दिवसांनी पंतप्रधानपद हे काटेरी मुकुट आहे हे कळल्यावर तो टोळक्यातील ईतर काही जणांची एडमिन म्हणून नियुक्ती करतो. राजकारणाप्रमाणेच, टोळक्याच्या मुख्य एडमिनला कोणतीही विशेष पात्रता आवश्यक नाही. फक्त टोळकं जन्माला घालायची पात्रता हवी. यानंतर तो टोळक्यात ईतर समविचारी सदस्यांची भरती करायला सुरवात करतो. व काही सम्मिलीत सदस्य यात आपल्या ओळखीच्या पण एडमिनसाठी लुप्त असलेल्या सदस्यांची माहिती पुरवण्यास सुरवात करतात. व टोळक्यातल्या वाढत्या टाळक्यांबरोबर एडमिनची जबाबदारी वाढते. कधीकधी एखादा सदस्य ईतर दोन तीन ईच्छुकांचे भ्रमणध्वनी क्रमांक देऊन एड करायची विनंती करतो, तेव्हा दोन्ही क्रमांकांची बेरीज करून त्या बेरजेला एड करायचा प्रयत्न करणारे किंवा त्यांना एड करून त्यांचे मीन काढणारे एडमिनही पहायला मिळतात!. बरं तसे हे एखाद्या एकत्रित धाग्याला ओवलेले असले तरी कोणत्या ना कोणत्या कारणावरून या टोळक्यात अंतर्गत कलह उफाळून येतो. या कलहात, कोणालाही न दुखवता, टोळकं टिकवण्याची प्रमुख जबाबदारी एडमिनचीच. एडमिनने न्यायाधीशाप्रमाणे दिलेल्या तहकुबीच्या निर्णयावर ईतर सदस्य पसंती नसेल तरी हमी भरतात, आणी तात्पुरता का होईना, पण समंजसपणे तह घडवून आणला जातो, वेळप्रसंगी आणीबाणी जाहीर करून सर्व सदस्यांच्या पोस्टींची गळचेपी करण्याचा विशेषाधिकार फक्त एडमिनलाच.
एडमिनने खरं तर टोळीनरेश, टोळकंसम्राट असायला पाहिजे, पण काही एडमिन टोळभैरव असल्यासारखे वागतात. आजकाल एकच माणूस अनेक टोळक्यात पहायला मिळतो तसेच एक एडमिन हा अनेक टोळक्यांचा एडमिन म्हणून कार्यरत असलेला दिसतो. एका व्यक्तीने किती टोळक्यात एडमिन रहावे, या संखेवर सध्या तरी कोणतेही आणी कोणाचेही बंधन नाही. आजकाल प्रमुख एडमिनला, ईतर सहाय्यक एडमिनची नियुक्ती करता यायला लागल्यापासून, एडमिनची जबाबदारी किंचीत हलकी झाली आहे.मला खात्री आहे, की एकत्रित सदस्यसंख्येपेक्षा एडमिनची संख्या जास्त ठरेल. हे ईतर एडमिन, टोळक्याच्या गैरवर्तणुकीत प्रशासनाद्वारे भागीदारही ठरवले जातात. ईतर एडमिन हे लोकसभेतील नियुक्त कोट्यातील खासदारांप्रमाणेच स्वीकृत असल्याने त्यांनाही टोळक्याच्या कार्यक्रमात सहभागी न होता, एडमिन पदाचे महात्म्य अनुभवायला मिळते.
हल्ली कार्यालयातील साहेबही आपल्या कर्मचारी वर्गाची अशीच टोळी बनवतात व कर्मचा-याच्या ईच्छेशिवाय वा संमतीशिवाय त्याला यात ओढतात. यात साधारणपणे साहेबच एडमिन असल्याने, इतरांनी होयबा व्हावे, चुप बसावे किंवा साहेबांची स्तुती करावी एवढीच माफक अपेक्षा असते.
व्हाट्सअप नविन असतांना, पूर्वी जेव्हा नवलाई होती,तेव्हा रिकामटेकडे लोक *"एड मी नं* please" म्हणून मनधरणी करत यांच्या मागे फिरत असावेत, त्यामुळे कदाचित त्यांची भरती करणा-याला एडमिन म्हणत असावेत, किंवा सर्व सदस्यांचा "मीन"पणा एड केल्यावर तो त्याच्याजवळ आढळतो, बहुधा त्या टोळक्याचा तोच एडमिन असतो. जशी "शितावरून भाताची परिक्षा" होते तद्वतच एडमिनवरून टोळक्याची परिक्षा करता येऊ शकते.
हे एडमिन पुराण तुर्तास थांबवणे योग्य, कारण मी देखील काही टोळक्यांचा एडमिन असून, ब-याच टोळक्यांचा सदस्य आहे. या लाॅकडाउनच्या कालखंडात आपण सारेच एडमिनच्या कृपेनेच सुसह्य जीवन जगत आहोत. आणी त्याकरताच एडमिनचे विशेष धन्यवाद....🙏
*एडमिनम् शरणम् गच्छामि*
- चंद्रशेखर दातार

171 

Share


चंद्रशेखर दातार
Written by
चंद्रशेखर दातार

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad