"तेरे हाथ मैं मेरा हाथ हो, सारी जन्नते मेरे साथ हो
तु जो साथ हैं फिर क्या ये जहाँ, तेरे प्यार मैं हो जाऊं फनाह !"
या गाण्यातील ओळी जशा आपल्या मनावर छाप सोडतात. तसेच त्यातील अर्थ थेट हृदयाला भिडतो. एकमेकांचे हात हातात घेतल्यावर प्रेमाबद्दल मिळणारा विश्वास हा संपूर्ण जगापुढे कितीतरी मोठा असतो हा विचार खरोखरीच मनाला भावतो. हातात हात असणे ही खूपच रोमँटिक गोष्ट समजली जाते. रस्त्यावरून जोडपे असे छान हातात हात घालून चालताना दिसले की त्यांच्यातील अतूट प्रेम समजून येते.
आपल्या देहबोलीतून विशेषतः आपल्या हाताच्या स्पर्शातून आपण कितीतरी गोष्टी व्यक्त करत असतो. प्रियकराने आपल्या भावना मांडताना हळूच प्रेयसीचा हात हातात घेऊन प्रेम व्यक्त केले की त्याच्या हातातील आपला हात त्या प्रेयसीला सोडवत नाही. कारण त्याच्या हातातील प्रेमाची ऊब तिच्या काळजाला भिडलेली असते आणि नात्यातील विश्वासार्हता देखील तिला उमगलेली असते. अशाप्रकारे हाताचे स्पर्श हे प्रत्येक नात्यातील बंध हळुवारपणे उलगडत असतात.
पाळण्यातील तान्ह्या बाळाला स्पर्शाची भाषा तरी समजत असेल का हो? पण तरी देखील आपण त्याच्याशी बोलू लागलो की ते बाळ आपले इवलुसे हात हलवू लागते. आपल्या हाताला स्पर्श करण्यासाठी ते आसुसलेले असते. म्हणजे हातात हात देऊन केवळ स्पर्शाने भावना व्यक्त करण्याची प्रक्रिया ही नैसर्गिक असून ती आपल्याला जन्मतःच मिळालेली असते असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. कितीतरी मनातील गोष्टी ज्या आपण शब्दांतून व्यक्त करू शकत नाहीत त्या केवळ हातात हात देऊन समोरच्याला समजतात. किती कमालीची गोष्ट आहे ना ही. एखादा दुःखाचा प्रसंग आला, जवळची व्यक्ती गेली किंवा मोठे संकट समोर उभे राहिले की त्या व्यक्तीला आपण कसा धीर द्यायचा हे समजत नाही. सगळं नीट होईल असे बोलून देखील ती व्यक्ती परिस्थितीतून सावरत नाही. मग अशावेळी तिच्या हातात हात देऊन मी तुझ्यासोबत आहे ही भावना समोरच्या व्यक्तीला लगेच समजते.
कधी खूप आनंद झाला. मनासारखी गोष्ट घडली की आपण आपल्या मैत्रिणीकडे किंवा मित्राकडे जाऊन त्यांना मिठी मारण्याआधी हातात हात देऊन आपण खुश असल्याचे सांगतो. तुमच्या हाताच्या स्पर्शानेच तुमचा आनंद त्यांच्यापर्यंत पोहोचतो. असेच जर कधी ब्रेकअप झाले तर मग हेच फ्रेंड्स आपला हात हातात घेऊन काही न बोलताच त्यांच्या स्पर्शातून सांगतात "ये नहीं तो दुसरा सही" मग त्यांच्या हातात हात घेण्यानेच तुटलेलं हृदय जोडायला मदत होते. बाबांना एखादी गोष्ट सांगायची असेल तर आपण आतून घाबरून जातो. आता काय होईल या चिंतेत असतानाच जेव्हा आई हातात हात घेऊन डोळ्यातून सांगते "मी आहे ना" तेव्हा खूप जास्त विश्वास निर्माण होतो. तसेच बाबा कन्यादान करताना डोळ्यातील अश्रूंनी कधी आपल्या भावना सांगू शकत नसतील. मात्र त्यावेळी बाबांनी घेतलेला हातात हात पुढचे आयुष्य सुकर होण्यासाठी पुरेसा असतो. त्यांच्या हातातील माया मनातील दुःख त्यावेळी सांगत असते.
नवरा बायकोतील सुंदर नाते हे प्रेमाने जास्त फुलते. नवीन लग्न झाल्यानंतर जेव्हा सोबत चालताना तो नवरा हातात हात घेतो तेव्हा तो स्पर्श बायकोला हवाहवासा वाटतो. त्या स्पर्शामध्ये तिला निखळ प्रेम जाणवते. रस्ता ओलांडताना जेव्हा नवरा घट्ट हात हातात घेतो तेव्हा त्याला आपल्यासाठी वाटणारी काळजी यातून व्यक्त होते. प्रणयाच्या वेळी नवऱ्याने घेतलेला हातात हात त्या बायकोला मनातील प्रेम ओठांवर आणण्यास भाग पाडतो. आणि जेव्हा ऐंशी नव्वद वर्षांचे आजीआजोबा हातात काठी न घेता एकमेकांचे हात घेऊन चालतात तेव्हा या स्पर्शाची जादू आपल्याला समजते.
अशी आहे हातात हात असण्याची किमया. तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीला हा लेख जरूर पाठवा आणि त्यांचा हात कधीही सुटू देऊ नका.