Bluepad | Bluepad
Bluepad
ध्येय निश्चिती करण्यासाठी ५ सोप्पे मार्ग..
R
Rohit Pawar
13th May, 2022

Share

आयुष्यात प्रत्येकाचेच काही ना काही ध्येय नक्कीच असते. काहींना आपल्या ध्येयाकडे वाटचाल कशी करायची हे माहिती असते तर काहींना ध्येय कसे ठरवायचे हेच माहिती नसते. थोडक्यात असे लोक संभ्रमात असतात. तर ध्येय निश्चित कसे करायचे हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल तर आजच्या लेखात या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल.

१. भविष्यात कोणते परिणाम पाहायचे आहेत त्यांचा विचार करा.
जर तुम्ही तुमचे ध्येय ठरवले की तुम्हाला अमुक एक करायचे आहे तर त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे याची आधीच माहिती करून घेणे गरजेचे आहे. ध्येय तुमचे भविष्य ठरवत असते. त्यामुळे जे ध्येय ठरवत आहोत त्याने आपल्या व आपल्यामुळे इतरांच्या आयुष्यावर कोणते परिणाम होतील हे समजून घ्यायला हवे. जर एकापेक्षा अधिक उद्दिष्टं साध्य करण्याची तुमची इच्छा असेल तर त्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागतील, किती मेहनत घ्यावी लागेल हे पाहणे आवश्यक असते. एकापेक्षा अधिक ध्येय निश्चित करायचे झाल्यास कोणते उद्दिष्ट आत्ता पूर्ण करणे गरजेचे आहे हे ठरवायला हवे व त्यावर काम करण्याला प्राधान्य द्यायला हवे. म्हणजे तुम्हाला करिअर म्हणून इंजिनिअर व्हायचं आहे आणि सोबत संगीतही शिकायचं आहे. तर यात सर्वात महत्त्वाचं काय आहे, ते ठरवा. कारण एका वेळी दोन्ही गोष्टी केल्या तर तुमच्या कुटुंबीयांवर सुद्धा आर्थिक भार पडेल. पण जर तुम्हाला दोन्ही गोष्टी करायच्या असतील दोघांसाठी लागणारा पैसा आणि वेळ याचं योग्य नियोजन करा.

२. स्मार्ट ध्येय ठरवा.
लोक नेहमी ध्येय ठरवण्याच्या बाबतीत एक चूक करतात ती म्हणजे ते कोणताही मागचा पुढचा विचार न करता ध्येय ठरवतात. त्यामुळे ध्येय ठरवताना सुद्धा स्मार्ट पद्धतीने ठरवायला हवे. म्हणजे ध्येय पूर्ण करण्याच्या पद्धती, त्याचे निकष हे योग्य असले की ध्येय देखील योग्यरितीने पूर्ण होते. उदाहरणार्थ, तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे आहे. परंतू तुम्हाला किती किलो वजन कमी करायचे आहे हेच ठरवले नसेल तर त्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहचणार नाही. त्यामुळे एक निश्चित अंक ठरवून जर वजन कमी करण्यासाठी प्रयत्न चालू केले तर तुमचे ध्येय पूर्ण होऊ शकते.

३. कृतीयोजना तयार करा.
नुसतेच ध्येय ठरवले आणि ते पूर्ण झाले असे होत नाही. ध्येय पूर्ण करण्यासाठी जशी मेहनत व प्रयत्न करण्याची गरज असते तशीच ते पूर्ण करण्यासाठी नक्की काय काय कृती करायची आहे हे ठरवणे आवश्यक आहे. कृतीयोजना तयार केल्याने तुम्हाला तुमच्या ध्येयाचा अंदाज येईल. त्यासाठी कृतीचा आराखडा तयार केल्यास लहान लहान उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यास चालना मिळते व त्यातून तुम्ही कार्य करण्यासाठी देखील सक्रिय व्हाल.

ध्येय निश्चिती करण्यासाठी ५ सोप्पे मार्ग..

४.ध्येय पूर्ण करण्यासाठी वेळ निश्चित करा.
तुमच्या कृती योजनेचा भाग म्हणून, तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी भूमिका, कार्ये, टप्पे आणि अंतिम मुदतीची कल्पना करण्यात मदत करण्यासाठी वेळापत्रक बनवा. एकदा तुम्ही त्या तारखा सेट केल्यावर, त्या तंतोतंत पाळा. ठराविक वेळेत ठराविक काम झालंच पाहिजे अशी स्वत:लाच शिस्त लावा. यामुळे तुम्हाला काम आणि आराम अशा दोन्हीसाठी पुरेपूर वेळ मिळेल आणि तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी मदत होते.

५. आपल्या प्रगतीचे मूल्यांकन करा.
ध्येय निश्चत केल्यानंतर तुम्ही कितपत कार्य करून त्या ध्येयाजवळ पोहचला आहात हे पाहणे आवश्यक आहे. जेव्हा आपण आपल्या ध्येयाचे मूल्यमापन करतो त्यावेळी आपण किती ध्येय पूर्ण केले आहे किंवा कितपत पोहचलो आहोत याचा अंदाज येतो. शिवाय सतत मूल्यमापन केल्याने प्रगतीचा अंदाज येऊन कार्य करायला उत्साह येतो व आवश्यक त्या तडजोडी तसेच योजना आखण्यास मदत होते. नीरज चोप्राने जेव्हा भालाफेक सुरु केली तेव्हा त्याचा भाला जास्तीत जास्त किती लांब जातो, त्यासाठी त्याला स्वत:ची ताकद किती वाढवण्याची गरज आहे, त्याची धाव कशी आहे, तो किती वेळात हे करू शकतो याचे मुल्यांकन तो आपल्या सरावादरम्यान करत होता. त्यामुळे आज तो ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळवू शकला.

या सर्व उपायांचा वापर करून आपण आपले ध्येय निश्चित तर करूच शकतो पण त्याशिवाय त्या ध्येयाकडे होणारी आपली वाटचाल देखील योग्यरितीने चालली आहे किंवा नाही हे बघणे शक्य होते. ध्येय निश्चित केल्याने व्यक्तीच्या भविष्याला आकार येतो. कारण ध्येयाविना जीवन जगण्याला काहीच अर्थ नसतो व असे अर्थहीन आयुष्य जगण्यापेक्षा या उपायांचा वापर करून आपले ध्येय ठरवा व ध्येपूर्तीसाठी वाटचाल करा.

530 

Share


R
Written by
Rohit Pawar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad